चालू घडामोडी राजकारण

उपद्रवमुल्य संपले

एके काळी केंद्रात वट असणार्‍या अनेक मातब्बरांचे उपद्रवमुल्य संपल्याचे सध्या तरी स्पष्ट झाले आहे. उध्दव ठाकरे यांनी बदललेल्या हवेचा रोख फार लवकर ओळखला इतकेच!

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आज केंद्रात सत्तारूढ होत असून नरेंद्र मोदी हे आपल्या सहकार्‍यांसह आपल्या पदाची शपथ घेत आहेत. खरं तर या निवडणुकीत मोदी यांच्या प्रचारतंत्रापासून ते धक्कातंत्रापर्यंतच्या अनेक बाबी गाजल्या. आज शपथविधीच्या कार्यक्रमात शिवसेना व एमडीएमके या मित्रपक्षांच्या तसेच अण्णाद्रमुक व तृणमुल कॉंग्रेससारख्या मातब्बर प्रादेशिक पक्षांच्या आदळआपटीला भीक न घालण्याचा मोदी यांचा पवित्रादेखील नव्या राजकीय शक्तीतून आलेला कणखरपणा दर्शविणारा आहे.

सोळाव्या लोकसभा निवडणुकीने भारताच्या राजकीय इतिहासामध्ये एक विभाजनरेषा आखलेली आहे. निवडणुकीपुर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्यापासून ते सर्वाधीक अत्याधुनिक प्रचारतंत्राचा वापर करण्यापर्यंतच्या बाबी यातून प्रामुख्याने अधोरेखित झाल्या आहेत. याचप्रमाणे या निवडणुकीच्या निकालातूनही नवीन समीकरण उदयास आले आहे. एक तर तब्बल ३० वर्षानंतर जनतेने केंद्रात एकाच पक्षाला स्पष्ट कौल दिल्याने प्रादेशिक पक्षांचे उपद्रवमुल्यदेखील समाप्त झाले आहे. आज होत असलेल्या शपथविधीच्या कार्यक्रमातून भाजप कुणाच्या दबावाला भीक घालणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नरेंद्र मोदी यांनी भल्याभल्यांचा अंदाज चुकवीत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह ‘सार्क’ सदस्य राष्ट्रप्रमुखांना शपथविधीला आमंत्रित केले. या मुत्सद्देगिरीचे बरेवाईट परिणाम भविष्यात दिसणारच आहे. मात्र यातून मोदी यांनी आपल्या सहकारी पक्षांसह अन्य प्रादेशिक पक्षांच्या विरोधाला झुगारून लावले आहे. शिवसेना हा भाजपचा सर्वात विश्‍वासू सहकारी मानला जातो. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या यापुर्वीच्या सरकारांमध्येही हा पक्ष सहभागी होता. अर्थात कै. बाळासाहेब ठाकरे यांनी वेळेवेळी भाजपवर ठाकरी प्रहार केले होते. यात या पक्षाला अगदी ‘कमळाबाई’ म्हणून हिणवण्यापासून ते केंद्रीय नेतृत्वावर जाहीर टिकास्त्र सोडण्याचे प्रकार सर्रास झाले. असे प्रकार झाल्यानंतर कै. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आदी मान्यवर मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न करत. नजीकच्या काळात नितीन गडकरी, एकनाथराव खडसे आणि देवेंद्र फडणवीस आदी नेतेदेखील ‘डॅमेज कंट्रोलर’ची भुमिका निभावत असल्याचे जगाने पाहिले आहे. भाजप नेत्यांना शिवसेनेची मुजोरी खुपत असली तरी महाराष्ट्रात युती अपरिहार्य असल्याने ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करण्यापलीकडे कुणी काही करू शकत नव्हते.

या लोकसभा निवडणुकीतही भाजपला कोंडीत पकडण्याचे प्रकार शिवसेनेने केले. यात नरेंद्र मोदी यांच्या नावाला विरोध करण्यापासून ते अगदी अन्य राज्यांमध्ये भाजपच्या विरूध्द उमेदवार उभे करण्याच्या गर्जनाही करण्यात आल्या. अर्थात राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांनी भेट देऊन याला अप्रत्यक्ष उत्तर दिले. यातच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला गळती लागल्याने या पक्षाच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होण्याचे संकेत होते. मात्र मोदी लाटेत शिवसेनेने उज्ज्वल यश संपादन केले. यातून शिवसेनेला अक्षरश: नवसंजीवनी मिळाली. निकालानंतर मंत्रीवाटप हे जुन्या सुत्रानुसार करण्याची मागणी या पक्षाने रेटून धरली तरी मोदी यांनी याला फारसे महत्व दिले नाही. भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने शिवसेनेची या क्षणाला त्यांना गरज नाही. यातच शिवसेनेचा पाकविरोध सर्वश्रुत असतांना मोदी यांनी नवाज शरीफ यांना शपथविधीसाठी आमंत्रित केले. यावर शिवसेना काय पवित्रा घेणार याबाबत उत्सुकता लागून होती. अगदी शिवसेनेचे खासदार या कार्यक्रमाला दांडी मारतील यापासून ते नंतर शपथ घेतील असे अनेक अंदाज वर्तविण्यात आले. मात्र काल सायंकाळी या संदर्भात झालेल्या बैठकीत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शपथविधीत आपल्या सहकार्‍यांसह स्वत:देखील सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ठाकरे यांचा हा निर्णय अगतिकतेतून आल्याचे प्रथमदर्शनी वाटत असले तरी त्यांनी काळाची पावले ओळखल्याचे स्पष्ट झाले आहे. आज केंद्रात स्थिर सरकार असल्याने राज्यात शिवसेनेने कुरापत काढणे बंद न केल्यास भाजप हा पक्ष मनसेसारख्या पर्यायाचाही विचार करू शकतो ही बाबदेखील त्यांनी लक्षात घेतली असावी.

शिवसेनेचा पाकला विरोध असला तर तामिळी नेत्यांचा श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष राजपक्षे तर ममता बॅनर्जी यांचा बांगलादेशच्या सत्ताधार्‍यांना उघड विरोध आहे. जयललिता व ममता यांनी यापुर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये असतांना तत्कालीन पंतप्रधान यांना खूप वेळा ब्लॅकमेलिंग करून जेरीस आणल्याचे प्रकार घडले होते. १९९९ साली जयललिता यांनी पाठींबा काढल्यानेच अटलजींचे सरकार फक्त एक मताने पडले होते. सध्या त्या ‘रालोआ’मध्ये सहभागी नसल्या तरी त्यांचे मोदी यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. यामुळे त्या सरकारला बाहेरून पाठींबा देण्याची शक्यता आहे. मात्र श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महेंद्र राजपक्षे यांना मोदी यांनी आमंत्रित केल्याने त्यादेखील संतापल्या आहेत. यातून त्यांचे सदस्य आज शपथविधीला दांडी मारण्याचे संकेत आहेत. इकडे भाजपचा मित्रपक्ष असणार्‍या ‘एमडीएमके’ला एकही जागा मिळाली नसली तरी या पक्षाचे नेते वायको यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आपला विरोध प्रकट केला आहे. त्यांनी थेट दिल्लीतच राजपक्षे यांच्या विरोधात प्रदर्शन केले आहे. अर्थात या थयथयाटाकडेही मोदी यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. ममता यांनीही मोदींच्या शपथविधीत सहभागी होण्याऐवजी आपल्या सहकार्‍यांना पाठविण्याचा निर्णय घेऊन आपली नाराजी दाखवून दिली आहे. मात्र शिवसेना, अद्रमुक आणि तृणमुल कॉंग्रेसच्या नेत्यांनी कितीही नाराजी प्रकट केली तरी केंद्रात भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने नरेंद्र मोदी यांनी त्यांना जराही भाव दिला नसल्याचे दिसून आले आहे. यापुढे अगदी साध्या-साध्या कारणावरून आजवर विविध आघाड्यांच्या सरकारांना वेठीस धरणार्‍या प्रादेशिक पक्षांची केंद्रातील सद्दी संपल्याचेही हे संकेत आहेत.

केंद्रात स्पष्ट बहुमत नसल्याने अंतर्गत कारभारापासून ते पराष्ट्रीय धोरणांपर्यंत प्रादेशिक पक्षांची लुडबुड सहन करावी लागत असे. नरेंद्र मोदी यांचे आसन पाच वर्षे तरी स्थिर राहणार आहे. यामुळे त्यांनी अगदी शपथविधीच्या कार्यक्रमातूनच शिवसेनेसारख्या विश्‍वासू मित्रपक्षासह अद्रमुक तसेच तृणमुलसारख्या बलाढ्य प्रादेशिक पक्षांच्या दबावाकडे साफ दुर्लक्ष केले. येत्या पाच वर्षात हाच कणखरपणा दाखवून त्यांनी भारताला प्रगतीपथावर न्यावे हीच देशवासियांची इच्छा आहे. अर्थात निरंकुश सत्तेचा गैरवापर केल्यास जनता धडा शिकवू शकते हेदेखील त्यांनी विसरता कामा नये. एके काळी केंद्रात वट असणार्‍या अनेक मातब्बरांचे उपद्रवमुल्य संपल्याचे सध्या तरी स्पष्ट झाले आहे. उध्दव ठाकरे यांनी बदललेल्या हवेचा रोख फार लवकर ओळखला इतकेच!
11

About the author

shekhar patil

Leave a Comment