Featured साहित्य

उघड्या डोळ्यांचे सगंधीत स्वप्न

Written by shekhar patil

स्वप्न कोण पाहत नाही हो? प्रत्येक जण पाहतो. अगदी कोमल हृदयी व संवेदनशीलच नव्हे तर कठोरातील कठोर व्यक्तीही नेहमी स्वप्ने पाहत असतो. मात्र सर्वसामान्यांची स्वप्ने आणि प्रतिभावंतांच्या स्वप्नांमध्ये खूप ङ्गरक असतो. सर्वसामान्यांची स्वप्ने ही अबोध, निसर्गसुलभ असतात; तर सृजनशील व्यक्ती जगाला सौदर्य प्रदान करण्यासाठी स्वप्न पाहतो. कलावंताची हीच जागेपणीची स्वप्ने रसिकांना मोहित करत असतात. याच पध्दतीने जगाला आपल्या प्रतिभाशक्तीने चकीत करणार्‍या दिवंगत कवयित्री परवीन शाकीर यांचा आज जन्मदिवस यानिमित्त त्यांच्याबाबत दोन शब्द.

खरं तर परवीन शाकीरच नव्हे तर उर्दूतील तमाम आवडत्या शायरांबद्दल लिहण्याचा मानस कधापासूनच असला तरी माझी गत ‘हजारो ख्वाहिशे ऐसी’ अशी झालेली आहे. चारही बाजूंनी जीवनाला कवेत घेण्याच्या प्रयत्नात वेळ मुठीतल्या पाण्यागत अलगदपणे कसा गळून पडतोय हे समजतही नाही. यामुळे कितीही व्यस्त असलो तरी परवीन शाकीर यांचा वाढदिवस ‘मिस’ करायचाच नाही हे कधीपासूनच ठरविले होते. हा संकल्प आता सिध्दीस जात आहे. उर्दूचे अजोड सौंदर्य आपल्याला मोहित करते. यामुळे अनेक शायर हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनले आहेत. यात अर्थातच भारत-पाक सीमारेषाही ङ्गारशा महत्वाच्या नाहीच. यामुळे ङ्गैज, ङ्गराज आदींसारख्या पाकिस्तानी मान्यवर कविंसोबत परवीन शाकीर यांदेखील आपल्या भाव जीवनाच्या अविभाज्य घटक बनल्या आहेत.

परवीन आज हयात असत्या तर ६४ वर्षांच्या असत्या. ऐन भरात असतांना वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी या प्रतिभासंपन्न कवयित्रीचे अपघाती निधन झाले. मात्र आपल्या अल्प आयुष्यातच त्यांनी उर्दू शायरीच्या इतिहासात स्वत:चे स्थान निर्माण केले. २४ नोव्हेंबर १९५२ साली कराचीच जन्मलेल्या परवीन यांना बालपणापासूनच लिखाणाची आवड होती. अत्यंत हुशार विद्यार्थीनी म्हणून त्या ख्यात होत्या. त्यांचे अकॅडमीक करियर अत्यंत यशस्वी होते. त्यांनी तीन विषयांमध्ये स्नातकोत्तर पदवी संपादन केल्या होत्या. प्रारंभी शिक्षिका म्हणून कारकिर्द सुरू केल्यानंतर त्यांची पाकिस्तानी नागरी सेेवेशी संलग्न खात्यात निवड झाली. यातील एक किस्सा तर अङ्गलातून असाच आहे. या सेवेसाठी मुलाखत घेणार्‍यांनी त्यांना परवीन यांना त्यांच्या स्वत:च्याच शायरीबाबत प्रश्‍न विचारला. हा एक अत्यंत दुर्मिळ असाच सन्मान होता. त्यांचा एका डॉक्टरशी विवाह झाला. त्यांना मुलगाही झाला. मात्र त्यांचे वैवाहिक जीवन ङ्गारसे समाधानकारक नव्हते. याचे प्रतिबिंब त्यांच्या सृजनातूनही उमटले. १९८७ साली त्यांनी तलाक घेतला. उर्दू शायरीच्या विश्‍वात त्यांच्या नावाचा दबदबा प्रस्थापित झाला. त्यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यातही आले. मात्र २६ डिसेंबर १९९४ रोजी त्यांच्या कारला बसने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. अल्प वयातही ही महान कवयित्री परलोकी निघून गेली.

आज परवीन शाकीर जाऊन दोन दशकांपेक्षा कालखंड उलटला तरी त्यांचा लौकीक कायम आहे. किंबहुना एकविसाव्या शतकातही त्यांच्या सृजनाची महत्ता तसूभरही कमी झालेली नाही. परवीन यांच्या काव्यात नेमके असे काय होते? याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला भारतीय उपखंडातील महिलांच्या स्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. भारत, पाक, बांगलादेश आदी देशांमधील सामंतवादी आणि पितृसत्ताक मानसिकता जवळपास समान आहे. यामुळे पाकिस्तानसारख्या तुलनेत अधिक परंपरावादी राष्ट्रात जन्मलेल्या परवीन या कितीही उच्चशिक्षित असल्या तरी त्यांच्यावर महिला म्हणून बंधने होतीच. त्यांच्या लिखाणात महिलांच्या व्यथा आणि प्रेम या दोन भावना प्रामुख्याने आढळतात. मात्र त्याच्या अभिव्यक्तीत बंडखोरपणा नव्हता. येथे तुलना अप्रस्तुत वाटेल. मात्र परवीन या त्यांच्या आधीच्या पिढीतील अमृता प्रितम अथवा नंतरच्या पिढीतील तस्लीमा नसरीन यांच्याइतक्या विद्रोही वृत्तीच्या नक्कीच नव्हत्या. त्यांच्या लिखाणात पुरूषी मनोवृत्तीचा अनेकदा धिक्कार केलेला असला तरी स्त्रीसुलभ कोमलतेने त्यांची अलवार अभिव्यक्ती झाली आहे. वर नमुद केल्यानुसार त्यांचे वैवाहिक जीवन ङ्गारसे सुखकर नव्हते. मनाजोगता जोडीदार न मिळाल्याबद्दलची घालमेल त्यांच्या सृजनातून अनेकदा स्पष्ट झाली आहे. मात्र त्याच ङ्गारसा कडवटपणा नाही. किंबहुना त्या अगदी सोशीकपणे हा सर्व प्रकार सहन करत असल्याचेही अनेकदा दिसून येते. पुरूषी दर्प, त्याचा बाहेरख्यालीपणा, बेङ्गिकिरी ही तिला बोचते, अस्वस्थ करते. यातूनच तिच्या व्यथांना घुमारे ङ्गुटतात. मात्र आपला साथीदार अथवा याचसोबत समस्त पुरूष जातीविषयी तिच्या मनात कटुता नक्कीच नाहीय. यासाठी ती समाजासोबत दोन हात करण्यासही तयार नाही. या सर्व बाबींचा विचार करता परवीन ही अस्सल भारतीय स्त्री वाटते. हे सारे होत असतांना खरे प्रेम मिळावे म्हणून सुरू असलेली आपली धडपडही ती लपवत नाही. पुरूष हा प्रेमात अधिकार गाजवतो तर स्त्री समर्पणाला प्राधान्य देत असल्याचे मानले जाते. परवीनही आपल्या सृजनातून प्रियकरासमोर पूर्णपणे समर्पित होत असल्याचे दिसते. याचमुळे ती सहजपणे-

जिंदगी मेरी थी लेकीन अब तो
तेरे कहने मे रहा करती है

असे म्हणू शकते. अथवा-

क़ैद में गुज़रेगी जो उम्र बड़े काम की थी
पर मैं क्या करती कि ज़ंजीर तिरे नाम की थी

या शब्दांमधून ‘त्याच्या’ नावाच्या बेड्यादेखील ती स्वीकारण्यास तयार आहे. यात ती आपल्या प्रियतम व्यक्तीसमोर पूर्णपणे समर्पित झाल्याचे स्पष्ट होते. मात्र अनेकदा हे परिपूर्ण सर्मपण आणि उत्कट प्रेम काही कामाचे नसल्याबद्दल तिचा भ्रमनिरासही होतो. आपण अगदी प्राणपणाने एखाद्यावर प्रेम करत असलो तरी आपल्याइतकी सच्चाई त्याच्याकडे नसल्याचे तिला जाणवते.

मैं सच कहूंगी मगर फिर भी हार जाउंगी
वो झूठ बोलेगा और लाजवाब कर देगा

आपला प्रेमी काहीही बहाणे सांगून आपल्याला निरूत्तर करतो याची टोचणी तिच्या मनाला नक्कीच आहे. ती दु:खी होते, तिला रागही येतो. काही वेळा तर ती आपल्या साथीदाराच्या रूक्षपणामुळे व उपेक्षेने संतापते. यातून तिच्या लेखणीतून आपोआपच स्त्री मनाचा सूक्ष्म वेध घेणार्‍या ओळी झरतात…

टूटी है मेरी नींद मगर तुमको इससे क्या
बजते रहें हवाओं से दर, तुमको इससे क्या

औरों के हाथ थामो उन्हें रास्ता दिखाओ
मैं भूल जाऊँ अपना ही घर, तुमको इससे क्या

ही गजल पूर्णपणे अनुभवण्यात मजा आहे. इतरांसाठी उमदा, मदतीसाठी कायम हात पुढे करणारा सखा माझ्या साध्या-साध्या समस्या का समजून घेत नाही? या प्रश्‍नाचे कोडे परवीनला पडते. मात्र असे असूनही आपल्या आयुष्यातील सर्वाधीक मौल्यवान आणि खरं तर जीवन जगण्याचे मूळ कारण हे प्रेम असल्याचेच तिच्या सृजनातून वारंवार अधोरेखित झाले आहे. अल्हड वयातील अबोध स्वप्नांपासून ते प्रेयसी, पत्नी, माता आणि समाजातील एक प्रतिष्ठित स्त्री अशी विविध रूपे तिच्या काव्यातून अत्यंत मनमोहक अशा शब्दांमधून साकार झाली आहेत. विशेष म्हणजे आधुनिक युगातील नोकरीपेशा महिलांच्या समस्यांनाही तिने हात घातला आहे. उर्दू शायरीत अनेक सर्वमान्य प्रतिके आहेत. यात चंद्र, सूर्य, तारे आदींसह समस्त चराचरातील घटकांचा समावेश आहे. परवीनच्या सृजनातही ही रूपके येतात. निसर्गाची अनेक विलोभनीय रूपे तिने शब्दबध्द केली आहेत. यात अगदी निखळपणे या शाश्‍वत सौदर्याचा आनंद उपभोगण्याची तिची रसिकता तर आहेच पण, आपल्या मनोदशेला सुसंगत अशा नैसर्गिक प्रतिमांचा वापरदेखील तिने विपुल प्रमाणात केला आहे. यात खिन्न संध्याकाळ, सख्याविना आलेला पाऊस, त्याच्या आठवणीत उसासे टाकत व्यतीत केलेली रात्र, उदास चंद्र आदींना अत्यंत कुशलपणे तिने शब्दांमध्ये गुंफले आहे. याच्या जोडीला अनेकदा तिच्या काव्यात उत्तुंग झेप आढळून येते.

कॉंटों में घिरे फूल को चूम आयेगी तितली
तितली के परों को कभी छिलते नहीं देखा

या ओळी त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणाची ग्वाही देणार्‍या आहेत. परवीनच्या काव्यातून वारंवार येणारी प्रतिमा ही ‘खुशबू’ची आहे. याचमुळे तिला अनेकदा ‘खुशबू की शायरा’देखील म्हटले जाते. तिच्या एका काव्यसंग्रहाचे हे नावदेखील आहे. परवीन ही खरं तर गंधवेडी ! या प्रतिमा तिच्या सृजनातून वारंवार आणि त्यादेखील विविध मनोदशांना दर्शवत येतात. यातील सर्वात विख्यात गजल तर आपण सर्वांना माहित आहेच.

तेरी खुशबू का पता करती है
मुझ पे एहसान हवा करती है

खरंच हवेची किती हो कृपा! तो परवीनच्या सख्याच्या अस्तित्वाच गंध तिच्यापर्यंत पोहचवतो ना. याचप्रमाणे ती एका गजलमध्ये-

अक्स-ए-ख़ुशबू हूँ बिखरने से ना रोके कोई
और बिखर जाऊं तो मुझको ना समेटे कोई

असेही म्हणते. या प्रतिमेचा सुगंध परवीनच्या काव्यात अनेक ठिकाणी दरवळलेला आहे. हा खरं तर लौकीक गंध नव्हेच. अनेक समीक्षकांच्या मते या माध्यमातून परवीनने आपल्या आयुष्यातील अनेक घटनांना एक रूपक प्रदान केले आहे. एखाद्या फुलाप्रमाणेच जगाला सौदर्य प्रदान करूनही त्याची दखल कुणी घेत नसल्याची सल ही तिच्या आयुष्याशी संबंधीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. या संदर्भात तिचा एक शेर अतिशय समर्पक असाच आहे.

वो तो खुशबू है हवाओ में बिखर जायेगा
मसला फुल का है फुल किधर जायेगा

यातील शब्दांमधून व्यक्त होणारा सौंदर्यबोध जीवनातील शाश्‍वत सत्याकडे अंगुलीनिर्देश करणारा आहे. जगात उपयुक्ततेवर आधारित वास्तववादाची कठोरता यातून अभिव्यक्त झाली आहे. याच प्रमाणे ती एका गजलमध्ये लिहते-

हर्फ़-ए-ताज़ा नई ख़ुशबू में लिखा चाहता है
बाब इक और मोहब्बत का खुला चाहता है

अर्थात आपल्या सृजनाचे ताजे शब्द हे सुगंधीत असावे अशी उत्कट इच्छा तिने यातून प्रकट केली आहे. या सुगंधीत सृजनातूनच ती प्रेमाची अनुभुती व्यक्त करत आहे. अगदी याचप्रमाणे-

ख़ुशबू है वो तो छू के बदन को गुज़र न जाये
जब तक मेरे वजूद के अंदर उतर न जाये

‘तो’ जरी सुगंध असला तरी फक्त दैहीक पातळीवर नव्हे तर आपल्या संपूर्ण अस्तित्वाच्या शेवटच्या टोकापर्यंत तो पोहचावा अशी तिची आकांक्षा आहे. येथे सुगंधाची अपार्थिव प्रतिमा तिने वापरली आहे. याच प्रतिमा अनेकदा त्यांच्या काव्यात वापरण्यात आल्या आहेत. अर्थात परवीन या फक्त स्त्री अथवा प्रेयसीच नाही तर मातादेखील आहेत. त्यांनी मातृत्वालाही आपल्या सृजनात स्थान दिले आहे. दिवसा काजवे पकडण्याचा हट्ट करणारी मुले काळाने अकालीच प्रौढ केल्याची तक्रार त्या करतात. एका कवितेत त्यांनी आपल्या मुलास संबोधित केले आहे. यात ‘तुला तुझ्या बापाच्या नव्हे तर आईच्या नावाने ओळखले जाते म्हणून लाज वाटू देऊ नको’ असे नमुद केले आहे.

वर नमुद केल्यानुसार उर्दू शायरीच नव्हे तर एकंदरीतच कला,साहित्य वा संस्कृतीत भारत-पाकिस्तान असा भेद कुणी करूच शकत नाही. या पार्श्‍वभूमिवर परवीन शाकीर या अस्सल भारतीय उपखंडाच्या कवयित्री होत्या. त्यांच्या काव्यात हिंदू-मुस्लीम असा भेद नव्हता. त्यांनी अनेक भारतीय प्रतिमा वापरल्या आहेत. यात हजारो वर्षांपासून महिलांचा आवडता सखा अर्थात श्रीकृष्ण तर विविध रंगांमधून त्यांनी सादर केला आहे.

ये हवा कैसे उड़ा ले गई आँचल मेरा
यूँ सताने की आदत तो मेरे घनश्याम की थी

अशा अत्यंत लडीवाळ शब्दांमधून ती कोट्यवधी भारतीय महिलांच्या भावजीवनाशी थेट आपले नाते जोडते तेव्हा शब्दांना देशाच्या सीमा विभाजीत करू शकत नसल्याचेही आपोआपच सिध्द होते. आणि हो सखा कृष्णच नव्हे तर मंदिर, गाभार्‍यातला परमेश्‍वर, घंटा, पवित्र गंगा नदी, सौभाग्य, कन्यादान आदी प्रतिमांचा त्यांनी विपुल वापर केला आहे. अर्थात त्यांच्या सृजनातील सर्वसमावेशकतेमुळे पाकच नव्हे तर भारतातही त्यांना मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग लाभला आहे. उण्यापुर्‍या ४२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या परवीन शाकीर यांना उर्दू शायरीत मानाचे स्थान मिळाले आहे.

मर भी जाऊँ तो कहॉं लोग भुला ही देंगे
लफ़्ज़ मेरे मिरे होने की गवाही देंगे

असे त्या आधीच सांगून गेल्या होत्या. याचनुसार आज परवीन आपल्यात नसल्या तरी आपल्या सृजनाने त्या अजरामर झालेल्या आहेत. परवीन यांच्या अपघाती मृत्यूनंतर तनवीर फुल यांनी लिहलेल्या या ओळी अत्यंत समर्पक आहेत.

सुर्ख फूलों से ढकी तुरबत-ए-परवीन है आज
जिसके लहजे से हर इक सिम्त है फैली खुशबू
फ़िक्र-ए-तारीख-ए-अजल पर यह कहा हातिफ़ ने
फूल! कह दो है यही बाग-ए-अदब की खुशबू

About the author

shekhar patil

Leave a Comment