चालू घडामोडी विज्ञान-तंत्रज्ञान

आहे सुंदर तरीही…!

पिचाई यांच्या वैयक्तीक यशाच्या पलीकडे पाहिले असता तंत्रज्ञान व विशेषत: ‘टेक व्हेन्चर्स’मध्ये भारतीयांना मोठा पल्ला गाठावयाचा असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

गुगल या तंत्रज्ञानातील आघाडीच्या कंपनीने नुकतीच केलेली फेररचना ही अनेकांना बुचकळ्यात टाकणारी ठरली आहे. मात्र नव्याने उदयास आलेल्या ‘अल्फाबेट’ समुहातील गुगलची धुरा सुंदर पिचाई यांच्या हातात देण्याची घोषणा ही भारतीयांना उभारी देणारी ठरली आहे. यामुळे सिलीकॉन व्हॅलीतील भारतीय सीईओंचा दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. हा निश्‍चितच भारतीय गुणवत्तेचा सन्मान आहे. मात्र पिचाई यांच्या वैयक्तीक यशाच्या पलीकडे पाहिले असता तंत्रज्ञान व विशेषत: ‘टेक व्हेन्चर्स’मध्ये भारतीयांना मोठा पल्ला गाठावयाचा असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

विसाव्या शतकाच्या पुर्वार्धात जगभरात अमेरिकेचा दबदबा प्रस्थापित झाल्यानंतर हा देश संधीची खाण असल्याचे मानले गेले. यातून ‘ग्रेट अमेरिकन ड्रीम’ उदयास आले. याची भारतीयांनाही भुरळ पडणे स्वाभाविक होते. यथावकाश तेथील व्यापार, उद्योगापासून ते विविध क्षेत्रांमध्ये भारतीयांनी हळूहळू आपली पकड बनविली. आज अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांनी विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती केली आहे. अगदी ‘नासा’पासून ते विविध विद्यापीठे, प्रयोगशाळा, व्यापार आदींमध्येच नव्हे तर राजकारणातही भारतीय ठसा उमटत आहे. अगदी बॉबी जिंदल यांचे नाव भावी राष्ट्रपतीपदासाठी आल्यामुळे अमेरिकेतील भारतीय समुदायाची ताकद आधीच सिध्द झाली आहे. तंत्रज्ञानातही भारतीय आघाडीवर होतेच. नव्वदच्या दशकातील माहिती तंत्रज्ञान क्रांती, इंटरनेटचा विकास आणि महत्वाचे म्हणजे भारतातील उदारीकरणाच्या शुभारंभामुळे भारतीय तरूणाईला अमर्याद संधी उपलब्ध करून दिल्या. अमेरिकेतल्या सिलीकॉन व्हॅलीत हजारो भारतीय तंत्रज्ञ दाखल झाले. त्यातील अनेकांनी आपल्या गुणवत्तेची छाप पाडली. सुंदर पिचाईदेखील यापैकी एक होत. आज त्यांच्याकडेच आयटीतल्या एका मातब्बर कंपनीची सुत्रे आली आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अगदी शेवटच्या घटकापासून ते सीईओपर्यंत भारतीय कार्यरत आहेत. सुंदर पिचाई यांच्या निमित्ताने मायक्रोसॉफ्टचे सत्या नादेला, मास्टरकार्डचे अजित बंगा यांच्यापासून ते डझनवारी आघाडीच्या कंपन्यांचे सीईओ हे मुळचे भारतीय असल्याचा उल्लेखही ओघाने आलाच. ही बाब निश्‍चितच आपल्याला अभिमानास्पद आहे. मात्र यातील कोणतीही कंपनी भारतीयांनी स्थापन केलेली नसल्याची बाब आपल्याला विसरता कामा नये. भारतीयांकडे गुणवत्ता, नाविन्याचा ध्यास, कल्पकता, धाडस आदी सर्व बाबी आहेत. मात्र आजवर एकाच क्षेत्रात आपण पीछाडीवर आहोत ती म्हणजे आंत्र्यप्रुनरशीप! सुंदर पिचाई यांच्या नियुक्तीनंतर भारतीय गुणवत्तेचे गौरवगान करतांना हा मुद्दादेखील लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

Sundar_pichai

इंटरनेटच्या आगमनानंतर अमेरिकेच्या सिलीकॉन व्हॅलीत अब्जावधी डॉलर्स गुंतवणुकीचा ओघ आला. नव्वदच्या दशकाच्या शेवटी तर येत्या काही वर्षात जगातील बहुतांश व्यवहार हे इंटरनेटकेंद्रीत असतील अशी हवा पसरली. यातून हजारो कंपन्या उदयास आल्या. मात्र ‘डॉटकॉम बबल’ या नावाने ओळखली गेलेला हा फुगा फुटला तेव्हा या कंपन्यांचा मागसुमही उरला नाही. अर्थात काळाचा वेध घेऊन काही कंपन्यांची वाटचाल सुरू केली. यानंतरच्या कालखंडातही बर्‍याच कंपन्या नाविन्यता घेऊन आल्याने टिकल्याच नाही तर बहरल्या. यातील बहुतांश व्हेन्चर्स या हिकमती तरूणांनी अगदी मर्यादीत साधनसामुग्रीसह सुरू केलेल्या होत्या. यात गुगल, अमेझॉन, फेसबुक, ट्विटर आदींचा समावेश होता. आजही अनेक नवनवीन संकल्पनांना यश लाभत आहे. मात्र यात भारतीय आहेत कुठे? सिलीकॉन व्हॅलीत संकल्पनांवर पैसा लावला जातो. यामुळे अनेक स्टार्टप्स अर्थात नवजात कंपन्यांची वाटचाल सुकर होते. खरं तर सिलीकॉन व्हॅलीत अनेक भारतीय गुंतवणूकदार आहेत. यातील विनोद खोसला हे आघाडीचे व्हेन्चर कॅपिटलिस्ट म्हणून ओळखले जातात. मात्र यातून भारतीयांनी मोठ्या संख्येने आंत्रप्रुनरशीपचे स्वप्न पाहिले नाही ही बाब लक्षणीय आहे. नाही म्हणायला साबीर भाटीया यांनी ‘हॉटमेल’ ही प्रथम मोफत ई-मेल सेवा सुरू केली. मात्र मायक्रोसॉफ्टने याला ४० कोटी डॉलर्समध्ये खरेदी केले. यानंतरही कुणा भारतीयांचे व्हेन्चर हे एखाद्या मोठ्या कंपनीत परिवर्तीत झाल्याचे चित्र नाही.

काही दिवसांपुर्वीच इन्फोसीसचे सहसंस्थापक नारायणमुर्ती यांनी भारतातील मुलभुत संशोधनाची वानवा असल्यावर बोट ठेवले होते. मात्र याच्याच सोबत माहिती तंत्रज्ञानातही आपण बोटांवर मोजण्याइतके अल्प अपवाद वगळता ‘ग्लोबल ब्रँड’ तयार करू शकलो नाहीत हे कटू सत्य विसरता कामा नये. इंटरनेटच्या विकासातील प्रत्येक टप्प्यातील संधी ही भारतीयांनी हेरून तिचे सोने केले. मात्र जगाला झपाटून टाकणारी एखादी संकल्पना मांडत तिला व्यावसायिक पातळीवरही यशस्वी करण्याची कला भारतीयांना जमली नाही. यामुळे सीईओ म्हणून सुंदर पिचाई वा सत्या नादेला यांच्यासारख्या प्रतिभावंतांची कारकिर्द कितीही उज्ज्वल असली तरी त्यांना स्वत:चा ‘ब्रँड’ प्रस्थापित करणे जमले नाही हेदेखील तितकेच खरे. दरम्यानच्या कालखंडात चिनसारख्या देशातून अनेक कंपन्यांनी जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला ही बाब लक्षणीय आहे. सॉफ्टवेअरप्रमाणे हार्डवेअरसह अन्य क्षेत्र तसेच ई-कॉमर्समध्ये चिनी उद्योजकांनी जोरदार मुसंडी मारली. ते स्मार्टफोन क्रांतीच्या लाटेवरही सहजगत्या स्वार झाले. यामुळे अलीबाबा, एसर, लेनोव्हो, वन प्लस, शिओमी, डीजेआय, बायडू आदी चिनी ‘ब्रँड’ जगभरात प्रस्थापित झाले आहेत. अलीबाबा कंपनीने तर अमेरिकन शेअर बाजारात लिस्टींग करतांना जगातील सर्वात मोठा टेक आयपीओ म्हणून विक्रम प्रस्थापित केला. आज ही कंपनी भारतासह अमेरिकेच्या ई-कॉमर्स क्षेत्राला धडक देण्याच्या तयारीत आहे. शिओमी व वन प्लस सारख्या कंपन्यांनी तर ऍपल व सॅमसंगसारख्या आघाडीच्या स्मार्टफोन उत्पादकांच्या तोंडाला फेस आणला आहे. जगभरात ड्रोनची लोकप्रियता वाढत असतांनाच डीजेआय या चिनी कंपनीने या क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली आहे. या सर्वांच्या तुलनेत भारतीय टेक ब्रँडस स्पर्धेत टिकणारे नाहीत हे उघड आहे.

वर नमुद केल्याप्रमाणे सिलीकॉन व्हॅली व खरं म्हटले तर संपुर्ण अमेरिकेतच ‘व्हेन्चर कॅपिटल’ ही संकल्पना चांगलीच रूजली आणि बहरली आहे. नवीन कंपन्यांना भांडवल उभारणीची सर्वात मोठी अडचण असते. भांडवल बाजारात उतरण्याचा अवाका नसणार्‍या आणि बँकेसह अन्य वित्तीय संस्थांकडे कर्ज मागण्यासाठी पत नसणार्‍या नवजात कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात तसा फार मोठा धोका असतो. अर्थात या जोखीमीत उत्तम परताव्याची संधीदेखील असते. यामुळे तेथे नवीन कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची एक प्रणाली विकसित झाली आहे. यात एखाद्या संकल्पनेच्या विकासापासून तिला मोठ्या कंपनीत परिवर्तीत होतांना विविध टप्प्यांवरील गुंतवणुकीचा यात समावेश आहे. अगदी एखाद्या कंपनीने भांडवल बाजारात पदार्पण करण्याचे ठरविल्यानंतर व्हेन्चर कॅपिटलीस्टने यातून कसे ‘एक्झीट’ व्हावे याचेही नियम ठरविण्यात आले आहे. तसेच विविध व्हेन्चर्समधील गुंतवणुकीच्या टप्प्यांचाही (राऊंडस) यात अंतर्भाव आहे. अलीकडच्या काळात ‘क्राऊडफंडिंग’च्या माध्यमातून सामूहिक भांडवलही उभे केले जात आहे. यासाठी ‘किकस्टार्टर’सारखे ऑनलाईन मंचही विकसित झाले आहेत. या पार्श्‍वभुमिवर भारतात तुलनेत उशीरा व्हेन्चर कॅपिटल हा प्रकार आलाय. अलीकडेच ‘सेबी’ने याला विकसित करण्यासाठी पावले उचलली असली तरी हा प्रकार आपल्याकडे बाल्यावस्थेत आहे. यामुळे भारतातून एखादी नाविन्यपुर्ण संकल्पना मोठ्या कंपनीत कधी परिवर्तीत होईल याचे उत्तर कुणी अचूकपणे देऊ शकणार नाही. सध्या अनेक भारतीय कंपन्यांमध्ये जगभरातून गुंतवणुकीचा ओघ वाढलाही ही त्यातल्या त्यात आशाजनक बाब होय. स्नॅपडील, फ्लिपकार्ट, ओला, मायक्रोमॅक्स आदींसारख्या भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणुकदारांचा रस वाढतोय ही बाब भारतीय टेक कंपन्यांचे भवितव्य आशादायक असल्याचे दर्शवत आहे. मात्र भारतातून वा अमेरिकेतल्या भारतीयांकडून जागतिक दर्जाच्या कंपन्या कधी उदयास येणार? याचे उत्तर काळाच्या उदरातच दडलेले आहे.

नव्वदच्या दशकातील भारतीय आयटी तंत्रज्ञांना ‘सायबर कुली’ म्हणून हेटाळण्यात आले होते. इन्फोसीस वा विप्रोसारख्या भारतीय कंपन्यांचा व्यवसायही बहुतांश आऊटसोर्सींगवर अवलंबून असल्याने एकंदरीतच भारतीय आयटी क्षेत्र हे परप्रकाशित असल्याचे मानले जात होते. सुदैवाने यात हळूहळू का होईना बदल होतोय. आयटी लाटेतील पहिला टप्पा हा भारतीय तंत्रज्ञांचा होता. दुसरा टप्पा भारतीय सीईओजचा आहेय. मात्र तिसरा टप्पा आयटी आंत्रप्रुनर्सचा असावा ही अपेक्षा आहे. भविष्यातील सुंदर पिचाई वा सत्या नादेला हे स्वत:च्या संकल्पनेतून अमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आदींप्रमाणे एखाद्या संकल्पनेने जगाला झपाटून टाकतील अन् यातून एखादा ‘ग्लोबल ब्रँड’ तयार होईल तो दिवस आयटीतल्या भारतीय गुणवत्तेसाठी खर्‍या अर्थाने अत्युच्च क्षण असेल.

जाता-जाता:- आजच स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून भाषण करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टार्ट अप इंडिया-स्टँड अप इंडिया’ हा नारा दिलाय. यानुसार देशातील सव्वा लाखांपेक्षा जास्त बँकांनी जिल्हा पातळीवर महिलांसह दलित व आदिवासी तरूणांना नव्या उद्योगासाठी कर्ज देण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांची ही घोषणा स्वातगार्ह आहे. मात्र शासकीय योजनांचा पुर्वानुभव पाहता यापासून नव उद्योजकांना खर्‍या अर्थाने मदत होईल ही अपेक्षा बाळगणे भाबडेपणाचे ठरणार आहे.

About the author

shekhar patil

2 Comments

Leave a Comment