Featured साहित्य

आल्विन टॉफलरकृत ‘फ्युचर शॉक’

future संपूर्ण जगातील साहित्याचा विचार केला तर ललीत वाड:मय तसेच सस्पेंस थ्रिलर्स ‘बेस्ट सेलर्स’च्या यादीत जास्त संख्येने असतात, पण आपल्या बुध्दीला चालना देणारे साहित्य सुध्दा बर्‍याचदा लोकप्रिय ठरते. ऑल्विन टॉफलर यांचे ‘फ्युचर शॉक’ हे पुस्तक याच वर्गवारीत बसणारे आहे. वरवर पाहता हे पुस्तक समाजशास्त्राशी निगडीत वाटते पण हे पुस्तक इतर पुस्तकांप्रमाणे रुक्ष नसून मनोरंजक आहे. हे पुस्तक संपूर्ण वाचले असता लेखकाने लिखाणासाठी घेतलेले अफाट कष्ट स्पष्ट दिसतात. समाजशास्त्र, मानसशास्त्र, विज्ञान, तत्वज्ञान, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल यांच्यासह चालू घडामोडीचे गहन अध्ययन करुन लेखकाने स्वत:चा वैशिष्टपूर्ण सिध्दांत जगासमोर मांडून प्रचंड खळबळ उडवून दिली. जागतिक स्तरावर गाजलेले हे पुस्तक म्हणजे आपल्या बुध्दीला पौष्टीक खुराक आहे. अगदी समर्पक बोलायचे तर बौध्दीक व्यायाम (इंटेलॅक्चुअल एक्झरसाईज) होय!

या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखकाने ‘फ्युचर शॉक’ ही त्याची संकल्पना स्पष्ट केली आहे. लेखकाच्या मते जग (हे पुस्तक लिहलेय 1969 साली!) इतक्या प्रचंड वेगाने बदलत आहे की सामान्य माणसे त्याचा स्विकार करु शकत नाही. अत्यंत गतिमानतेशी ज्याला जमवून घेता येणार नाही. त्याला भविष्याचा धक्का (फ्युचर शॉक) बसण्याची शक्यता आहे. प्रत्येक क्षणाला विविध अंगानी बदलणार्‍या जीवनातील बदलांचे जो खुलेआम स्वागत करु शकणार नाही तो मानसिक दृष्ट्या रुग्ण होऊन ‘फ्युचर शॉक’चा बळी ठरेल. भूतकाळ ते चालू वर्तमानकाळाचा संदर्भ घेवून व मानवजातीचा विविध अंगांनी अभ्यास करुन त्याची तीव्र गतीने बदलणार्‍या जगाचा आढावा घेतला आहे. वर्तमान काळातील गतिमानतेमुळे समाजात कशी रुग्णता वाढीस लागत आहे? ही रुग्णता निकटच्या भविष्यकाळात कोणते रुप धारण करेल? त्या रुग्णतेचा भविष्य कालातील गतिमानतेशी काय संबंध असेल? भविष्यकाळातील तीव्र गतिमानतेशी कसे जुळवून घ्यावे लागेल? इ. विविध प्रश्‍न लेखकाने प्रचंड तपशील व संदर्भासह सहा विभागात हाताळलेले आहेत.

पहिला विभाग ‘डेथ ऑफ पर्मनन्स’ हा आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत जगात स्थायीपणाला महत्व होते. मानवाचा गेल्या ५० हजार वर्षाचा इतिहास लक्षात घेतला तर मानवाची वर्तमानपिढी गुंतागुंतीचे तीव्रतर जीवन जगत आहे. प्राचीन काळी एका ठिकाणी युध्द झाले तर त्याच्या काही मैल अंतरावर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. आज जगात कोठे काही खट्ट झाले तरी संपूर्ण जगभर विविध क्षेत्रात त्याचे प्रतिसाद उमटतात. जग हे एकजिनसी झालेले आहे. जग हे जगव्याळ यंत्रासारखे असून ते नियमीत आहे, हा न्युटनप्रणीत सिध्दांत मोडीत निघाला आहे. मानवी जीवनात कृषी क्रांती, औद्योगिक क्रांती व महा औद्योगिक क्रांती घडून आलेली आहे. कृषी क्रांती हजारो वर्ष टिकली तर औद्योगिक क्रांती काही शतकातच महाऔद्योगिक क्रांतीकडे वाटचाल करु लागलेली आहे. प्राथमिक (कृषी) व दुय्यम (औद्योगिक) क्षेत्रापेक्षा तृतीय (सेवा क्षेत्र) क्षेत्र सुध्दा झपाट्याने वाढत आहे.

वैज्ञानिक शोध व त्याचा मानवासाठी नियमीत वापर या कालावधीत आश्‍चर्यकारकरित्या कमी कालावधी होत आहे. अत्याधुनिक समाजात राहणार्‍या व्यक्तींना बदलणार्‍या परिस्थितीशी जुळवून घेणे कठीण वाटत आहे. विज्ञान, मानसशास्त्र, अर्थशास्त्रासह ज्ञानाच्या विविध शाखेत प्रचंड बदल होत आहेत. मानवी इतिहासात अशी अभूतपूर्व परिस्थिती कधीच आली नव्हती. शहरीकरण, स्थलांतर, वांशिक संघर्ष, हिंसक उद्रेक, प्रचंड वेगाने होणारे औद्योगिकरण या बाबी वेगाने घडत आहेत. मानवी जीवनावर परिणाम करणारे विविध घटक प्रत्येक क्षणाला बदलत आहेत. या परिस्थितीपासून येणार्‍या भविष्यात सतत होणारे बदल अर्थातच ‘क्षणभंगुरत्व’ हेच सत्य राहणार आहे. आधुनिक जगात स्थायीत्वाचा अंत झालेला असून भविष्यात प्रत्येक व्यक्तीला ‘क्षणभंगुरत्वा’शी सामना करावा लागणार आहे. लेखकाने अत्यंत माहितीपुर्ण विवेचन करुन वरील संकल्पनांचा विस्तार पहिल्या भागात केलेला आहे.

स्थायित्वाच्या अंतानंतर मानवी इतिहासात बदल प्रचंड गतीने होवू लागलेले आहेत. आधुनिक समाजात मानवाचे भौतिक वस्तुंचे संबंधसुध्दा क्षणिक होत आहेत. ‘बॉर्बी’या सुप्रसिध्द बाहुलीचे उदाहरण लेखकाने दिलेले आहे. बार्बीच्या उत्पादक कंपनीने जुनी बॉर्बीच्या बदलात नव्या सुधारीत बॉर्बी ग्राहकांना देतांना विशेष सुट दिली व त्याची लोकप्रियता कायम ठेवली. अत्याधुनिक समाजात विविध भौतिक ‘ब्रॅन्डस्’ नेहमी बदलत असतात. साधारणत: दुसर्‍या महायुध्दाच्या नंतर ‘स्थायीत्वाचा अंत’ भौतिक वस्तूंच्या उत्पादनात सुध्दा दिसून येऊ लागला. वर्षानुवर्ष टिकाणारी उत्पादने बाजारातून अदृष्य होवू लागली कारण ग्राहकांची मानसिकता सुध्दा बदलली. मानवाची एकाच उत्पादनाशी जो बंध अगोदर बनायचा त्याचा कालावधी कमी झाला. काही दिवस वस्तु वापरल्यानंतर ती फेकून द्यावी व नव्या वस्तूचा उपभोग घ्यावा अशी मानसिकता बळावू लागल्यानंतर चलाख उत्पादकांनी त्याचा फायदा उठविला व भौतिक वस्तूंच्या उत्पादनात अभूतपूर्व क्रांती सुरु झाली.
वर्तमानात टिकावू वस्तूंपेक्षा ‘वापरा व फेकून द्या’ (यूज एंड थ्रो) ही प्रवृत्ती वाढल्यामुळे उत्पादकांनी आपली उत्पादने सुध्दा त्याच प्रकारची बनविण्यास सुरुवात केली. अत्याधुनिक समाजात जास्तीत जास्त वस्तू ‘यूज एंड थ्रो’ या प्रकारात मोडणार्‍या आहेत. बाजारात टिकून राहण्यासाठी लोकप्रिय उत्पादनांना सुध्दा ग्राहकांची मानसिकता लक्षात घेवून बदलावे लागले आहे. आधुनिक युगाचे पडसाद बांधकाम व्यवसायात सुध्दा पडलेले आहेत. हजारो वर्षापासून आपले स्वत:चे घर असावे ही मानवाची आपले स्वत:चे घर असावे ही मानवाची इच्छा होती. आधुनिक युगाच्या तीव्र गतीत ही इच्छा काहीशी मागे पडल्यासारखी वाटत आहे. महानगरामध्ये गगनचुंबी इमारतीमध्ये राहण्याचे ठिकाण वारंवार बदलावे ही प्रवृत्ती वाढलेली आहे. यामुळे बांधकाम व्यवसायत आमूलाग्र बदल होत आहेत.

या युगात स्वत:चे वाहन असणे ही प्रतिष्ठा नसून गरज बनलेली आहे. दुचाकी, चारचाकी वाहनामुळे महानगरे भरुन गेल्यासारखी वाटत आहेत. समाजात विविध भौतिक ‘ब्रॅन्डस्’ नेहमी बदलत असतात. साधारणत: दुसर्‍या महायुध्दाच्या नंतर ‘स्थायीत्वाचा अंत’ भौतिक वस्तूंच्या उत्पादनात सुध्दा दिसून येऊ लागला. वर्षानुवर्ष टिकणारी उत्पादने बाजारातून अदृष्य होऊ लागली कारण ग्राहकांची मानसिकता सुध्दा बदलली. मानवाची एकाच उत्पादनाशी जो बंध अगोदर बनायचा त्याचा कालावधी कमी झाला. काही दिवस वस्तू वापरल्यानंतर ती फेकून द्यावी व नव्या वस्तूचा उपभोग घ्यावा अशी मानसिकता बळावू लागल्यानंतर चलाख उत्पादकांनी त्याचा फायदा उठविला व भौतिक वस्तूंच्या उत्पादनात अभूतपूर्व क्रांती सुरु झाली.

वर्तमानात टिकावू वस्तूंपेक्षा वापरा व फकून द्या (यूज एंड थ्रो) ही प्रवृत्ती वाढल्यामुळे उत्पादकांनी आपली उत्पादने सुध्दा त्याच प्रकारची बनविण्यास सुरुवात केली. अत्याधुनिक समाजात जास्तीत जास्त वस्तू ‘यूज एंड थ्रो’ या प्रकारात मोडणार्‍या आहेत. बाजारात टिकून रहाण्यासाठी लोकप्रिय उत्पादकांना सुध्दा ग्राहकांची मानसिकता लक्षात घेवून बदलावे लागले आहे. आधुनिक युगाचे पडसाद बांधकमा व्यवसायात सुध्दा पडलेले आहेत. हजारो वर्षापासून आपले स्वत:चे घर असावे ही मानवाची इच्छा होती. आधुनिक युगाव्या तीव्र गतीत ही आकांक्षा काहीशी मागे पडल्यासारखी वाटत आहे. महानगरांमध्ये गगनचुंबी इमारतीमध्ये राहण्याचे ठिकाण वारंवार बदलावे ही प्रवृत्ती वाढलेली आहे. यामुळे बांधकाम व्यवसायात आमूलाग्र बदल होत आहेत.

या युगात स्वत:चे वाहन असणे ही प्रतिष्ठा नसून गरज बनलेली आहे. दुचाकी, चारचाकी वाहनामुळे महानगरे भरुन गेल्यासारखी वाटत आहेत. अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थेमुळे साधारण मनुष्य सुध्दा दरवर्षी हजारो मैलांचा प्रवास करत आहे. कार्यक्षेत्राच्या विस्तारामुळे काही व्यक्ती नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने दरवर्षी लाखो मैल प्रवास करतात त्यांचे व्यावसायीक जीवन व खाजगी जीवन यांचा ताळमेळ सुध्दा व्यवस्थित बसतोय. ‘कार्पोरेट जिप्सी’ ही नविन संकल्पना समोर आलेली आहे. घरापासून दूर पर्यटनाला जावे ही प्रवृत्ती वेगाने वाढलेली आहे. वेगाने होणारे शहरीकरण अपरिहार्य आहे. त्यामुळे मात्र परकेपणा व मानवी संबंधामध्ये खंडीतपणा वाढला आहे. करीअरमध्ये सुध्दा प्रचंड उलथापालथ घडून येत आहे. एकाच करियरपेक्षा ‘सिरीयल करियर’ हि संकल्पना मान्यता पावत आहे. मानवी नातेसंबंध व मैत्रीचा कालावधी खूप कमी होतोय.

विविध व्यावसायीक व सरकारी संघटनांमध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. कायमस्वरुपी नोकरीपेक्षा करारावरती अल्प कालावधीसाठी काम करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. नोकरशाहीच्या पोलादी चौकटीचा वरचष्मा कमी होत असून संघटना व व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये बदल होत आहेत. सध्याचे युग प्रचंड माहितीचे असून या क्षेत्रातील जाहिरात, लेखन, चित्रपट, संगीत या क्षेत्रात प्रचंड गतीने बदल होत आहेत. भाषामध्ये नवनवीन शब्द व संकल्पना येत असून काही कालबाह्य होत आहेत. अशा प्रकारे वर्तमानात मानवी जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये स्थायित्वाचा अंत झालेला असून क्षणभंगुरत्वाकडे वाटचाल तीव्र गतीने सुरु आहे हे या विभागात स्पष्ट केलेले आहे.

नावीन्य– स्थायीपणा असलेली मानवी जीवनाची चौकट मुळापासून उखडत असून त्याची क्षणभंगुरत्वाकडे वाटचाल सुरु झालेली आहे व एक नवीन मानवी समाजाची स्थापना होत आहे. वर्तमान काळ हा एक संक्रमणाचा काळ आहे. युवा क्रांती, विज्ञान क्रांती, वसाहतवाद, वांशिकवाद, कामुक क्रांती, आर्थिक क्रांती व सर्वात महत्व असलेली विज्ञान क्रांती आदींमधून समाज महाऔद्योगिक क्रांतीकडे वाटचाल करीत आहे. क्रांतीचा मार्ग सरळ नसतो आजवर असलेले सर्व समज गैरसमज क्रांतीमुळे बदलतात. नावीन्य हा क्रांतीचा मुख्य परिणाम आहे. भविष्यकाळात मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नावीन्य असेल.

भविष्यात समुद्र मानवी जीवनावर प्रभाव टाकणारे सर्वात महत्वाचे ठिकाण असेल. पृथ्वीच्या आकारमानाच्या २/३ इतका प्रचंड महासागरी भाग आजपर्यंत थोडासा अपेक्षितच राहिलेला आहे. भविष्यात शास्त्रज्ञांचे लक्ष महासागराकडे असेल. समुद्र केवळ खाद्यान्न किंवा खनिजतेल व इतर धातू यांचा स्त्रोत नसेल. भविष्यात पृथ्वीवर लोकसंख्या प्रचंड वाढल्यानंतर मानवी वसाहतीसाठी भुभाग कमी पडेल त्यावेळी महासागरावर किंवा त्यांच्या तळाशी मानवी वसाहती उभारल्या जातील. महासागरातून पुरवठा होणारा खाद्यान्न व खनिजांचा साठा वाढविता येईल. महासागरातील भूखंडमंच भुखंड उतार आदी विविध भाग खूप महत्वाचे म्हणून ओळखले जातील. समुद्र तळाशी वसाहती उभारल्या जातील. मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये पाण्याचा प्रभाव जाणवेल. मानवी इतिहास कृषि संस्कृती ते पाणीसंस्कृती (ऍग्रीकल्चर ते ऍक्वाकल्चर) अशी वाटचाल करेल.

भविष्यात जैविक क्रांती घडून येईल. सुक्ष्म जीवशास्त्रात सखोल संशोधन घडून येईल. पृथ्वीवरील विविध प्राण्यांमध्ये जीवशास्त्राच्या मदतीने आमूलाग्र बदल घडू शकतात. जैवीकशास्त्र ज्या देशात प्रगत राहील तो आघाडीचा म्हणून गणला जाईल. डी.एन.ए.चा आराखडा जगासमोर आल्यानंतर जेनेटिक्स मध्ये तीव्रगतीने संशोधन सुरु झालेले आहे. जेनेटिक्सच्या सहाय्याने आपण विविध वर्णाची किंवा एकाच वर्णाची मानवजात निर्माण करु शकू. जेनेटिक्सच्या सहाय्याने आपण मानव जातीला रोगमुक्त करु शकू. जेनेटिक्सचा सर्वात आकर्षणाचा विभाग म्हणजे ‘क्लोनिंग’ होय. प्राण्याचे व अगदी मानवाचे क्लोनिंग सुध्दा शक्य होईल. ‘क्लोनिंग’ हा फक्त वैज्ञानिक विषय न रहाता त्याचे नैतिक, सामाजिक, राजकीय व मनोवैज्ञानिक परिणाम मानवावरती होतील. भविष्यात जैविक तंत्रज्ञान अत्यंत महत्वाची भुमिका बजावेल. विविध मानवी अवयवांचे प्रत्यारोपण शक्य होईल. काही मानवी अवयवांची कार्यक्षमता वाढविता येईल. प्रत्येक तंत्रज्ञानाप्रमाणे चांगल्या बरोबर वाईट सुध्दा अपरिहार्यतेने येणार. जैविक तंत्रज्ञान जर मानवाच्या भल्यासाठी वापरले नाही तर भविष्यात ‘जैविक हिरोशीमा’ सारखी दु:खद घटनापण शक्य आहे.
भविष्यकाळात अर्थशास्त्रातही नाविन्य असेल. आज अत्याधुनिक राष्ट्रांमध्ये प्राथमिक (कृषि), द्वितीयक (उद्योग), क्षेत्रांपेक्षा तृतीय (सेवा) क्षेत्रांचा विस्तार झपाट्याने होत आहे. भविष्यात सेवा क्षेत्राला सुध्दा मर्यादा पडतील व सेवा क्षेत्र पश्‍चात अर्थशास्त्र नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश करेल. आजपर्यंत जग भांडवलशाही व समाजवादी या दोन प्रकारच्या अर्थ व्यवस्थेमध्ये विभागले गेलेले होते. भविष्यात मात्र अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल होतील. सेवाक्षेत्राची जागा ‘अनुभवाधिष्ठीत उद्योग’ घेतील. आज कोणतेही उत्पादन जर ग्राहकांसमोर आणायचे असेल तर उत्पादक जाहीरातीचे वेगवेगळे प्रकार वापरुन या उत्पादनाला एक विशिष्ट मानसिक आयाम प्रदान करत असतो. भविष्यात या प्रकारांमध्ये प्रचंड वाढ होईल. मानवी जीवन सुखी व्हावे म्हणून विविध मानसिक तंत्राचा वापर होवून अनुभवाधिष्ठीत उद्योगाची वाढ होऊन अर्थ व्यवस्थेमध्ये एक नवीन युग सुरु होईल.

भविष्यात मानवी नाते संबंधामध्ये सुध्दा नाविन्य अवतरेल. आजपर्यंत कुटूंबसंस्था म्हणजे समाजातील आघात सहन करण्यासाठी अत्यावश्यक बाब मानली जात होती. (जायंट शॉक ऍब्सॉर्बर) भविष्यात कुटूंब संस्था मोडकळीस येऊन केंद्रक कुटूंब (न्युक्लीअर फॅमिली) पध्दत अस्तित्वात येईल. कुटूंबामध्ये लहान मुलांच्या संगोपनासाठी विविध पध्दती अस्तित्वात येतील. गर्भ भाड्याने मिळू शकेल एकाच बालकाचे जैविक बालक आणि संगोपन करणारे पालक वेगळे असू शकतील. विवाह पध्दतीमध्ये आमूलाग्र बदल होतील. तात्पुरते विवाह समलैंगिक विवाह करायचे विवाह आदी नवीन बाबी जगासमोर येतील. मानवाचे नातेसंबंध अस्ताव्यस्त होतील व मानवी कुटूंबसंस्था जणू अपघातग्रस्तच बनेल (फॅ्रक्चर्ड फॅमिली)

विविधता– कृषी क्रांतीकडून औद्योगिक क्रांतीमध्ये मानव समाजाने वाटचाल केल्यानंतर प्रचंड बदल झालेत. औद्योगिक क्रांतीमुळे मानवजातीच्या उपयोगासाठी विविध उत्पादने प्रचंड प्रमाणावर तयार होऊ लागली. अगदी एकसारखीच असणारी विविध उत्पादने मानवजातीच्या मनावर विशिष्ट परिणाम करुन गेली. मानवजातीच्या ‘एकजीनसीकरण’ करण्याकडे या उत्पादनांचा उपयोग होईल असे वाटत होते पण…. महा औद्योगिक क्रांतीकडे वाटचाल करत असतांनाच यामध्ये पुन्हा बदल घडून येत आहेत. अगदी औद्योगिक क्रांतीच्या काळात सुध्दा लोकप्रिय ब्रॅन्डस्चे उत्पादन लाखोच्या संख्येने होत होते. संक्रमणाच्या आजच्या काळात मात्र आमूलाग्र बदल घडून येत आहेत. लोकप्रिय ब्रॅन्डसना देखील लोकप्रियता टिकविण्यासाठी नवनवीन ट्रिक्स कराव्या लागत आहेत. विविध उत्पादने काही कालावधीतच लोकप्रियता गमावत आहेत. मानवाच्या इतिहासात प्रथमच इतके ‘बहुविकल्प’ त्याच्यासमोर आहेत.

मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बहुविकल्प वाढत आहेत. उद्योग, वित्त, कला, सामाजिक चळवळी, वृत्तपत्रे, यांच्यात तीव्र बदल घडून येत आहेत. मानवी जीवन एकजीनसीपणा कडून बहुजीनसीपणाकडे वाटचाल करत आहे. या बहुजीनसीपणा अनेक उपसंस्कृत्या (सब कल्चर्स) व उपपंथ (सबकल्ट) मध्ये सुध्दा आढळून येत आहे. स्वत:चे विशिष्ट वैशिष्ट जोपासणारे विविध छोटे-मोठे गटांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वेगवेगळ्या आयुवर्गातील विविध उपपथ उदयास येऊन लगेच नष्ट होत आहेत. बीटल्स, हिप्पी, समाजवादी गट यांचा उदय होऊन ते नष्ट सुध्दा झालेले आहेत. जग एका उपपंथ विस्फोटाकडे (सबकल्ट एक्सप्लोजन) कडे वाटचाल करीत आहे. मानवी मनाला मोहविणारे नवनवीन धाडसी खेळ लोकप्रिय होत आहेत. उत्तेजीत अवस्थेत रोमांचकारी अनुभव मिळवून देण्यासाठी खास मनोरंजन विशेषज्ज्ञ (फन स्पेशालिस्ट) नवनवीन क्लुप्त्या लढवत आहेत. मानवी नातेसंबंधामध्ये आमुलाग्र बदल घडून येत आहेत. घटस्फोटाचे प्रमाण वाढून समाजात कामूक क्रांती सुरु झालेली आहे.

वर्तमानकाळात मानवाच्या जीवनशैलीत सुध्दा विविधता आढळून येत आहे. मानवाची जीवनशैली कशा प्रकारे असावी? हे ठरविणारे ‘विशेषज्ञ’ आहेत. विशिष्ट उत्पादने लोकप्रिय करण्यासाठी सिनेमातील अभिनेते, खेळाडू, कलावंत, राजकारणी आदींचा वापर करण्यात येतो. यांच्या प्रतिमा त्या उत्पादनांसह ‘प्रोजेक्ट’ करण्यात येतात व सामुदायिक संमोहनाचा प्रकार घडून ते विशिष्ट उत्पादन किंवा जीवनशैली लोकप्रीय करण्यात येते. विशिष्ट शैली किंवा उत्पादन लोकप्रिय करण्यासाठी समाजातील प्रतिष्ठितांना नायक करण्यात येत आहे किंवा नवीन नायकांचा शोध करण्यात येते आहे. विविध फॅशन्स प्रचंड लोकप्रिय होऊन अचानक लुप्त होत आहेत. अशा प्रकारे मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विविधता वाढीस लागलेली आहे हे या विभागात स्पष्ट करण्यात आलेले आहे.

स्विकार्य क्षमतेच्या मर्यादा (लिमीट्स ऑफ अडॉप्टाबिलीटी) – पुस्तकातील हा एक सर्वात लहान विभाग आहे. पण यात अत्यंत महत्वपूर्ण मुद्यांचे विवरण करण्यात आलेले आहे. आतापर्यंत लेखकाने प्राचीनकाळ ते वर्तमानकाळ असा विविध विषयांचा आढावा घेतला आहे. या विभागात सुरुवातीलाच फ्युचर शॉक ही संकल्पना स्पष्ट करण्यात आलेली आहे. लेखकाच्या मते, मानवाची स्विकार्यक्षमता व निर्णयक्षमता यांच्यात अतितणाव निर्माण झाला तर जी शारीरिक किंवा मानसिक रुग्णता निर्माण होते तोच ‘फ्युचर शॉक’ होय दुसर्‍या शब्दात ‘फ्युचर शॉक’ म्हणजे अति उत्तेजनाला मिळालेला मानवी प्रतिसाद होय.

फ्युचर शॉकला बळी पडलेले लोक विभिन्न प्रकारे त्याला प्रतिसाद देतात. त्यामुळे भिन्न प्रकारची शारिरीक व मानसिक रुग्णता वाढीस लागते. यानंतर लेखकाने क्लिष्ट शरीरशास्त्र व मानसशास्त्राचा आधार घेतलेला आहे. अमेरीकन शास्त्रज्ञांनी व्यक्तीच्या जीवनात घडणार्‍या शारिरीक व मानसिक बदलांचा अभ्यास हजारो माणसांवरती केला त्यावेळी त्यांना विचित्र बाब आढळून आली की एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील बदलांचा वेग त्याच्या आरोग्याशी संबंधित असतो. मानवाची बचाव क्षमता व बदलांचा वेग समतोल प्रमाणात असतात त्यामुळे बदलांचा वेग वाढला तर रुग्णता निर्माण होते. मानवी मेंदू विविध प्रकारच्या उत्तेजनांना वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतो. जर मानवी मेंदूला नेहमी नवनवीन व अनपेक्षीत उत्तेजनांना सामोरे जावे लागले तर त्याचे शारीरिक व मानसिक स्तरावर परिणाम जाणवतात. त्याचे परिणाम मज्जासंस्थेवरती होतात; यामुळे शारीरिक स्तरावर हार्मोन्समध्ये बदल घडून येतात व मानसिक स्तरावर न्युरोसिस होतो. या बदलांमुळे व्यक्तीवरती एकत्रीतपणे गंभीर परिणाम घडून येतात. चिडचिडेपणा, नैराश्य, हिंसक व कामुक वृत्ती यासारखे मानसिक व अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधी यामुळे निर्माण होतात.

‘फ्युचर शॉक’ शारीरिक व मानसिक अशी एकत्रित रुग्णता असल्याने त्याविरुध्द प्रतिबंधात्मक उपाय कठीण आहेत. त्यामुळे मानवी निर्णय क्षमतेवर परिणाम होत आहे. इतिहासामध्ये प्रथमच निर्णय क्षमतेवर परिणाम होत आहे. इतिहासामध्ये प्रथमच निर्णयक्षमता इतकी जटील बनलेली आहे. या रुग्णतेचे प्रतिबिंब मानवी संस्कृतीच्या विविध अंगावरती पडत आहेत. रुग्णतेच्या सत्यापासून अत्याधुनिक राष्ट्रातील हजारो व्यक्ती पलायन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारांचा सहारा घेत आहेत. विचित्र फॅशन्स, मादक पदार्थ, सेक्स, विविध पंथ, उपपंथ, विविध चळवळी आदींचा सहारा घेतला जात आहे. पण ‘फ्युचर शॉक’ची तीव्रता वर्तमानकाळातच थोडीफार जाणवू लागलेली आहे. भविष्यकाळात त्याचे अत्यंत गंभीर स्वरुप जगासमोर येईलच. मानवी मेंदूला विविध उत्तेजना स्विकारण्याच्या मर्यादा नक्कीच आहेत. यामुळेच संपूर्ण मानवजात ‘फ्युचर शॉक’ला बळी पडणारच आहे.

अस्तित्वासाठीच्या उपाय योजना (स्ट्रॅटेजीस फॉर सर्व्हायव्हल)– पुस्तकातील हा शेवटचा व अतिशय महत्वाचा विभाग आहे. आतापर्यंत लेखकाने भविष्यकालीन रुग्णता निर्माण होऊन तिची वाढ कशी होत आहे ते प्रतिपादन केले आहे. या विभागात मात्र ‘फ्युअर शॉक’ विरुध्द करावयाच्या उपाय योजनांविषयी माहिती दिलेली आहे. लेखकाच्या मते प्राथमिक स्वरुपाचे बदल नियंत्रक (चेंज रेग्युलेटर्स) हे व्यक्तीगत व सामाजिक स्तरावर चांगली भुमिका निभावू शकतात. घडून येणार्‍या बदलांना अंधपणे स्विकारु नये तसेच अंधपणे विरोध देखील करु नये यातूनच आपण तीव्रपणे होणारे बदल योग्यरितीने नियंत्रीत करु शकतो. यासाठी मात्र समाजामध्ये आघात सोसणार्‍या संस्था किंवा व्यक्तीसमूह यांची नितांत आवश्यकता आज आहे. वैयक्तीक स्तरावर व्यक्ती त्याचे काही स्थिरता क्षेत्र (स्टॅबिलीटी झोन्स) बनवू शकते. व्यक्तीच्या जीवनाच्या विविध आयामांमध्ये जर तीव्रतर बादल होत असतील तर त्या व्यक्तीने आपल्या ‘स्थिरता क्षेत्रात’ मानसिक वा भौतिक स्तरावर एक किंवा अनेक घटकांशी स्थिरत संबंध स्थापित करायला हवे. हे आपण सामाजिक स्तरावरपण करु शकतो. मानसशास्त्राचा आधार घेऊन ‘फ्युचर शॉक’ पासून वाचण्यासाठी सल्लागार व विशेषज्ञ हे सुध्दा एक उत्तम पर्याय म्हणून समोर येऊ शकतात. समूहमनाशी संबंधित विविध स्थिर घटनांमध्ये (उदा.सण, राष्ट्रीय उत्सव वगैरे) आपण अजून काही नवीन सुट्टी, सण वगैरे घटना किंवा प्रसंग स्थिर करुन स्थिरतेची संकल्पना वाढवू शकतो. आपल्या शिक्षणपध्दतीमध्ये सुध्दा आमूलाग्र बदल घडून आले पाहीजे. आजपर्यंत शिक्षण म्हणजे फक्त भाषा, विज्ञान, गणित, इतिहास, भुगोल, समाजशास्त्र आदी विषयांशी संबंधित होते. भूतकाळावर आधारित शिक्षण वर्तमानकाळात विद्यार्थ्यांना देऊन त्यांना भविष्यासाठी तयार करायचे अशी विचित्र शिक्षणपध्दत आज सर्वत्र आढळून येत आहे. विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण व त्यांचा वास्तविक जीवनाशी संबंध याबद्दल गंभीरतेने विचार व्हायला हवा. केंद्रीय स्तरावर ‘भविष्य परिषद’ (काऊंसिल ऑफ फ्युचर) यासारखी संस्था निर्मीत करायला पाहिजे या परिषदेद्वारा भविष्याशी संबंधित व भविष्यात उपयोगी पडू शकेल असे शिक्षण आपल्याला निर्मित करता येईल. या परिषदेद्वारे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक साधनसामुग्री व मानस शास्त्राच्या आधारे जीवनाच्या विविध आयामातील शिक्षण देण्यात येईल. हे शिक्षण परंपरागत शिक्षणासारखे रहाणार नाही. शिक्षणाचे विकेंद्रीकरण करण्यात येऊन ‘फिरते शिक्षण’ (मोबाईल एज्युकेशन) ही संकल्पना समोर येईल. नवीन शिक्षण पध्दतीमध्ये न लिहीता वाचता येणारा व्यक्ती निरक्षर समजला जाणार नाही. तर जो व्यक्ती कसे शिकावे हे शिकू शकत नसेल तो अज्ञानी म्हणून गणला जाईल. शिकवण्यासाठी विद्यार्थ्याला विविध मानसशास्त्रीय पध्दतीतून जावे लागेल. त्यांच्या अभ्यासात भरपूर माहितीचा साठा तसेच भविष्यकालीन वागणुकीचे शिक्षण यांचा समावेश त्यात असेल भविष्य काळावर आधारित साहित्य (विज्ञान कथा, इ.) सिनेमा, टीव्ही, कार्यक्रम, संगणकीकृत खेळ, इ.चा वापर करुन विद्यार्थ्यांना भविष्य काळाची ओझरती ओळख करुन द्यावी लागेल. विद्यार्थ्यांची भविष्य विषयक ‘दृष्टी’ स्वस्थ बसून त्यांना ‘भविष्यकालीन रुग्णता’ येऊ द्यायची नसेल तर शिक्षण हे भूत व वर्तमानापासून भविष्याकडे बदलले पाहिजे. ‘फ्युचर शॉक’ला उपाय म्हणून आपली सामाजिक राजकीय व विज्ञान दृष्टी सुध्दा बदलावी लागेल. येणारे नवे तंत्रज्ञान भविष्यात उपयुक्त ठरेल अशाप्रकारे नियंत्रीत करावे लागेल. भविष्यकालीन रुग्णता टाळण्यासाठी लेखकाने सामाजिक भविष्यवाद (सोशल फ्युचरिझम) हि संकल्पना वापरली आहे. या संकल्पनेद्वारे आपण बदलांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करु शकू. यसासाठी एक केंद्रीय स्तरावरील ‘भविष्य परिषद’ मार्गदर्शन करु शकेल. आपण एक ‘क्षण भंगरत्व निर्देशक’ बनवू शकतो. भविष्य काळात योजनांचे मानवीकरण झाले पाहिजे. तंत्रज्ञान नेहमी लगेच निकाल अनेक्षित करते पण आपण मात्र येत्या पन्नास वर्षापर्यंतचे नियोजन करण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये भविष्य केंद्र उभारायला हवेत. भविष्यकालीन नातेसंबंध, विज्ञान राजकारण, कला, इ.कसे असेल? हे या विविध केंद्रामध्ये कल्पनाशक्ती व विज्ञानाद्वारे लोकांना दर्शन घडवून त्यांचे भविष्याबद्दलचे विचार व अनुभव सहन करु शकतो. विविध केंद्राद्वारे मानवी संस्कृती औद्योगिक ते महाऔद्योगिक समाजाकडे विनासायास वाटचाल करु शकते.

आज जगात वांशिक भेदभाव, शहरीकरण, युध्दे, लैंगिकता मादक पदार्थांचा तीव्र प्रसार, नैराश्य, हिंसकता प्रचंड गतीने वाढत आहे. भविष्यात ‘फ्युचर शॉक’मुळे जगात शारिरीक व मानसिक विकार वाढू शकतात. यासाठी आपण वर्तमानकाळातच उपाययोजना करायला हवी. भविष्योन्मुख शिक्षण, विज्ञान तसेच बदल नियंत्रण करणारी यंत्रणा आपण उभारायला हवी नाहीतर येत्या काही वर्षातच संपूर्ण जग या ‘शॉक’ला बळी पडले. शेवटी लेखकाने अत्यंत विनम्रतेने नमुद केले आहे की या पुस्तकाचा उद्देश केवळ रोगनिदान हाच आहे. लेखकाच्या सुचविलेल्या उपायांशिवाय सुध्दा नवीन पध्दतीने जग ‘फ्युचर शॉक’चा मुकाबला करु शकेल.
‘फ्युचर शॉक’ या सुंदर पुस्तकाचा त्रोटक परिचय आपण करु घेतला आहे. लेखकाने साडेतीनशेच्या वर विविध विषयावर आधारित ग्रंथांचे संदर्भ घेऊन स्वत:चा असा विशिष्ट निष्कर्ष काढलेला आहे. मनोरंजक बाब अशी आहे की ते पुस्तक १९६९ साली प्रथम प्रकाशित झाले त्या वेळेच्या अमेरिकन समाजासारखीच आज भारतीय मध्यमवर्गाची स्थिती झालेली आहे. (आपण खूप वर्ष मागे आहोतच!) त्यामुळे आजसुध्दा हे पुस्तक आपल्याला ताजे वाटते. टॉफलर यांनी भविष्याबद्दल केलेले बरेचसे विवेचन आज सत्यतेत उतरत आहे. टॉफलर यांनी या पुस्तकात पौर्वात्य व पाश्‍चिमात्य अध्यात्मिकता व त्याचे मानसशास्त्रीय परिणाम याबद्दल थोडे विवेचन केले असते तर तो एक सुंदर वाचनीय अनुभव झाला असता; असो, टॉफलर यांच्याप्रमाणे भारतीय जटील समाज व्यवस्थेवर सुध्दा कोणी मनोरंजक व माहितीपूर्ण लिखाण करु शकतो. आपण तोपर्यंत ‘फ्युचर शॉक’ हे अत्यंत माहितीपूर्ण आणि मनोरंजक पुस्तक मुळातून वाचले तर ते आपला एक अविस्मरणीय अनुभव ठरेल.

(पुर्वप्रसिध्दी नोव्हेंबर २००१)

About the author

shekhar patil

1 Comment

Leave a Comment