Featured slider साहित्य

आयुष्यभराची शिदोरी

Written by shekhar patil

विख्यात लेबनानी लेखक मिखाईल नेमी ( यांच्या आडनावाचा उच्चार नईमा अथवा नईमी असाही करतात ) यांचा आज स्मृती दिन. आत्मोन्नतीपर साहित्यातील उत्तुंग व्यक्तीमत्त्व म्हणून ख्यात असणारे नेमी यांचे ‘द बुक ऑफ मीरदाद’ (संपूर्ण नाव- The Book of Mirdad: The Strange Story of a Monastery Which Was Once Called the Ark ) हे पुस्तक अनेकांच्या जीवनात दीपस्तंभ बनले आहे. फ्रान्सीस बेकन यांची ग्रंथांबाबतची प्रसिध्द उक्ती आपल्याला ज्ञात असेल. त्यांच्या मते Some books are to be tasted, others to be swallowed, and some few to be chewed and digested. तथापि, मोजक्या पुस्तकांना आपण बेकनची फुटपट्टी लाऊ शकत नाही. किंबहुना हे ग्रंथ याच्या पलीकडे असतात. ही पुस्तके दरवेळेस वाचतांना आपल्याला नवीन अर्थ कळत जातो. यातच ‘द बुक ऑफ मीरदाद’चा समावेश आहे.

मिखाईल नेमी हे लिजंडरी लेखक खलील जीब्रान यांचे जीवश्‍चकंठश्‍च मित्र. नेमी यांनीच जिब्रान यांचे चरीत्र लिहले आहे. दोन्ही लेबनॉनमधील रहिवासी, दोघांनी अरबी साहित्याला नवीन उंची प्रदान केली आणि दोन्हींच्या लिखाणात रहस्यवाद (मिस्टीसिझम) आढळून येतो. ‘द बुक ऑफ मिरदाद’ हे पुस्तक खलील जीब्रान यांच्या प्रचंड गाजलेल्या ‘द प्रॉफेट’च्याच शैलीत लिहलेले आहे. दोघांमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. याची विविधांगी समीक्षादेखील करण्यात आली आहे. या दोन्ही रचना आपापल्या जागी श्रेष्ठ आहेतच. मात्र, मीरदाद हे प्रॉफेटपेक्षा कितीतरी पटीने सरस असल्याचे बहुतेकांचे मत आहे. (खरं तर या दोन्ही पुस्तकांवर अमीन रिहानी या दिग्गज लेखकाच्या ‘द बुक ऑफ खालीद’चा प्रभाव असल्याचे मानले जाते. तथापि, मी याला अद्याप वाचले नसल्यामुळे याबाबत भाष्य केले नाहीय.) ‘मीरदाद’ला ओशोंमुळे जागतिक पातळीवर लोकप्रियता लाभली आहे. त्यांनी यातील खरे सौंदर्य उलगडून दाखविले आहे. ओशो हे वाचनावर निस्सीम प्रेम करणारे होते. त्यांच्या प्रवचनांमध्ये अक्षरश: हजारो पुस्तकांचे संदर्भ येतात. यात प्राचीन धर्मग्रंथांपासून ते मॉडर्न क्लासीक्सचा समावेश होता. त्यांनी वाचलेल्या हजारो पुस्तकांमधून त्यांच्या आवडीच्या ग्रंथांचे अतिशय रसाळ शब्दांमध्ये निरूपण केले आहे. ‘बुक्स आय हॅव लव्ह्ड’ या नावाने त्यांचे स्वतंत्र पुस्तकच आहे. या यादीत त्यांनी ‘द बुक ऑफ मिरदाद’ला पहिल्या पाचात स्थान दिल्याचे वाचल्यानंतर मी (सुमारे १५ वर्षांपूर्वी) हे पुस्तक विकत घेतले. पुस्तक चाळले आणि उडालोच. प्रथमदर्शनी पाहिल्यावर या पुस्तकात काहीच ‘दम’ वाटला नाही. मला ते फ्रान्सीस बेकनच्या उक्तीतील पहिल्या प्रकारातील पुस्तक वाटल्यामुळे अर्थातच बाजूला पडले. मात्र अधून-मधून एक-दोन पाने वाचल्यावर यातील अर्थ समजू लागला. तथापि, माझ्या वाचनाच्या वेगाचा आणि अर्थातच आकलनशक्तीच्या वृथा अभिमानाचा फुगा या पुस्तकाने फोडून टाकला. कोणतेही पुस्तक ‘स्टार्ट टू फिनीश’ वाचण्याचा शिरस्ता मी कायम पाळत असतो. मात्र आजवर मी हे पुस्तक कधीही सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत वाचू शकलो नाही. अर्थात, जेव्हाही मी याचे कोणतेही पान उलटतो तेव्हा काही तरी गवसल्याची जाणीव होते. जीवनाच्या विविध आयामांवरील म्हटले तर गुढ आणि म्हटले तर अतिशय सुलभ असे भाष्य यात करण्यात आले आहे.

‘द बुक ऑफ मीरदाद’ मध्ये लोकप्रियतेसाठी आवश्यक असणारे कोणतेही घटक नाहीत. कारण यात नायक-नायिका-खलनायक आदींसारखी आवश्यक पात्रेे; प्रेम, बदला, सेक्स, हिंसा, सस्पेन्स आदींसारख्या कोणत्याही हुकमी बाबी नाहीत. हा फिक्शन, नॉन-फिक्शन अथवा सेल्फ हेल्प यापैकी कोणत्याही प्रकारातील ग्रंथ नाही. तर यात सोपी जीवनसूत्रे आहेत. एक मठाधिपती आणि त्यांच्या शिष्यांमधील हा संवाद कधी मौनाच्या तर कधी आत्यंतीक कोलाहलाच्या पातळीवर जातो. तर यातील भाषा ही कधी अत्यंत सुलभ तर कधी आत्यंतीक गुढ वळण घेणारी आहे.निखळ सौंदर्याने युक्त असणार्‍या या ग्रंथातील बोध आपल्याला भारून टाकतो. जीवनाचे नव्याने आकलन करून देतो. आणि अर्थातच अगदी सुलभपणे जगूनही आयुष्याचा खरा आनंद कसा घ्यावा याचे सोपे सूत्र आपल्याला सांगतो. आध्यात्म, तत्वज्ञान, काव्य, प्रेम, साधना, दैवी अनुभूती आणि एकंदरीतच मानवी जीवनाच्या सार्थकतेबाबत यात निरूपण करण्यात आले आहे. यासाठी मानवी जीवनातील सर्व आयामांचा वापर करण्यात आला आहे. यात जीवनातील घटनांची पुनरावृत्ती, तारूण्य-वार्धक्य, जीवन-मृत्यू, गरीबी-श्रीमंती, निती-अनिती, मिलन-विरह, अमरत्व-क्षणभंगुरत्व आदींचा समावेश आहे. या द्वंदाच्या पलीकडे जात शाश्‍वत जीवनाचा स्वाद घेण्याचा संदेश या ग्रंथातून आपल्याला मिळतो. मिखाईल नेमी यांनी १९४८ साली आपला हा ग्रंथ पहिल्यांदा इंग्रजीत लिहला. आणि त्यांनी स्वत:च याचा अरबीत अनुवाद केला. आज जगातील ५० पेक्षा जास्त भाषांमध्ये याला अनुवादीत करण्यात आले आहे. दिल्ली येथील ‘सायन्स ऑफ द सोल रिसर्च सेंटर’ या संस्थेने याचा हिंदी अनुवाद केला असून तो राधास्वामी सत्संगतर्फे अत्यल्प मूल्यात उपलब्ध करण्यात आला आहे. तथापि, याच्या मुळ आवृत्तीची सर या अनुवादाला नाही.

‘द बुक ऑफ मीरदाद’बाबतचा एक अनुभव सांगतो. सुनील चौधरी हा माझा एक मित्र जबरी पुस्तकबाज आहे. अभियंता असणार्‍या या अवलीयाला अनेक विषयांमध्ये गती आहे. आम्ही वाचनाबाबत एकमेकांना फॉलो करतो. तर झाले असे की, मी त्याला ‘द बुक ऑफ मीरदाद’ दिले. दोन दिवसानंतर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘तू काही बी देतो बे वाच्याले!’ अर्थात त्यानेही ते पुस्तक बाजूला ठेवले होते हे सांगणे नकोच. यानंतर बर्‍याच दिवसांनी तो हातात तेच पुस्तक घेऊन अत्यंत प्रसन्न मुद्रेत आला. ‘काय मस्त आहे बे हे!’ म्हणत त्याने यावर जे बोलणे सुरू केले ते मी अवाक होऊन ऐकत बसलो. अजूनही या ग्रंथाच्या विविध आयामांवर आम्ही सातत्याने बोलत असतो. अर्थात आम्हाला याचे आजवर पूर्ण आकलन झाले नाही. येथेच बेकन अपुरा पडतो. काही ग्रंथ हे आयुष्यभराची शिदोरी असतात. ‘द बुक ऑफ मीरदाद’ हे त्यातीलच एक ! आणि याचा रचयिता असणारे मिखाईल नेमी हे याचसाठी मला महान वाटतात.

About the author

shekhar patil

Leave a Comment