चालू घडामोडी राजकारण

आम्हालाही लाज वाटतेय मोदी साहेब !

Written by shekhar patil

आजवर गारूडी, डोंबारांचा देश म्हणून बदनाम झालेला भारत आता महासत्ता बनण्याच्या दिशेने आगेकुच करतोय हे महत्वाचे! आणि देशाच्या प्रगतीचे सारथ्य करण्याचे ‘स्कील’ आपल्यात आहे हे कुणी नाकारू शकत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरियात केलेल्या एक वर्षाआधी लोकांना भारतीय असल्याबद्दल लाज वाटत असल्याच्या वक्तव्याने उगाच खळबळ उडाली राव! खरं तर अमुक-तमुक जातीचा-धर्माचा, भाषेचाच नव्हे तर शहर, गाव, वॉर्डाचा असल्याबद्दल अभिमान, गर्वच नव्हे तर ‘माज’ असल्याचे संदेश सोशल मीडियात अनेक जण टाकत असतात. यामुळे पंतप्रधानांनी याच्या अगदी उलट कटू सत्य सांगितले तर त्यात वाईट वाटण्याचे काही एक कारण नाही. नेमके हेच कारण घेऊन आज पंतप्रधानांना पत्र लिहावेसे वाटले.

आदरणीय मोदीसाहेब…१६ मे २०१४ रोजी भारत देश खर्‍या अर्थाने स्वतंत्र झाला. यापुर्वी सारा गोंधळच. मध्यंतरी अटलबिहारी वाजपेयी यांची केंद्रात सहा वर्षांची राजवट होती. तसेच आजवर अनेक राज्यांमध्ये भाजपची राज्य होते वा आहे. या सर्व भागातील जनतेलाही ‘लाज’ वाटत होती काय? असा प्रश्‍न काही नतद्रष्ट उपस्थित करत आहेत. करूद्या…विरोधकांचे ते कामच आहे. आता आपण मंगोलियाच्या संसदेला संबोधित करतांना भाजपच्या ‘कमळ’ या निशाणीचा उल्लेख केला यात गैर काय? अहो राहूलबाबांपासून ते ग्रामपंचायत पातळीवरील कॉंग्रेसचा कार्यकर्ता हात हलवून जनतेला अभिवादन करत ‘पंजा’ मिरवतोच की नाही! यामुळे आता या अभिवादनावर बंदी आणणार काय? मग राष्ट्रवादीचे घड्याळ, समाजवादीची सायकल, ‘आप’चा झाडू आदी चिन्हे कॉमन असल्याने त्यांच्यावरही बंदी घालावी लागेल. असो. आपण कॅनडातील दौर्‍यात कॉंग्रेसवर निशाणा साधला. तेथेच आपण सुचक रितीने भारत आधी ‘स्कॅम इंडिया’ म्हणून कुख्यात होता असे बोलले यात गैर काहीच नाही. हो कॉंग्रेस नेत्यांनी खूपच भ्रष्टाचार केला. त्यांनी देशाला लुटले. अर्थात बंगारू लक्ष्मण, येडियुरप्पांपासून ते व्यापम घोटाळ्यापर्यंत हे सर्व ‘स्कॅम’ नसून तांत्रिक चुका होत्या हे लोक समजूनच घेत नाहीत. आजवर गारूडी, डोंबार्‍यांचा देश म्हणून बदनाम झालेला भारत आता महासत्ता बनण्याच्या दिशेने आगेकुच करतोय हे महत्वाचे! आणि देशाच्या प्रगतीचे सारथ्य करण्याचे ‘स्कील’ आपल्यात आहे हे कुणी नाकारू शकत नाही.

आदरणीय मोदीसाहेब…खरं तर भाजपच्या आधीच्या नेत्यांनी केलेल्या चुका आपण दुरूस्त करत आहात. म्हणजे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आयटी क्रांतीविरोधात अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेवर बैलगाडी मोर्चा काढला होता. तुम्ही मात्र या आयटी क्रांतीवर स्वार होत कॉंग्रेसलाच धुळ चारली. कॉंग्रेसचेच पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहा राव यांनी उदारीकरण सुरू केल्यानंतर आपल्या ‘परिवारा’तील संघटनांनी ‘स्वदेशी’ बुडणार असल्याचा गळा काढला होता. आता आपण स्वत: विविध देशांमधील उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करत आहेत. यातून दुहेरी लाभ होत आहे. एक तर भारतात परकीय गुंतवणूक तर येतच आहे पण अडाणी-अंबानी यांच्यासारखे आपले बांधव हे बहुराष्ट्रीय कंपन्यांना धुळ चारण्यासाठी सरसावले आहेत. यामुळे कुणाला पोटदुखी होत असेल तर नाईलाज आहे. खरं तर कॉंग्रेसने देशाचा सत्यानाश केलाच पण गतकालातील भाजप नेत्यांनीही देश फारसा कुशलतेने न चालवला नाही ही उघड बाब आहे. यामुळे मोदी साहेब आपण आपल्या मनातील खदखद व्यक्त केली तर त्यात गहजब होण्यासारखे आहे तरी काय?

आदरणीय मोदीसाहेब, लाज तर भारतीय जनतेला अजूनही वाटायला हवी. एक तर आपल्याला स्पष्ट बहुमत दिले तरी ते दोन तृतीयांश इतके नाही. यातच राज्यसभेत बहुमताची अडचण येतच आहे. आता आपल्या हातात चार वर्षे उरलीत. या कालखंडात आपण जाणीवपुर्वक राज्यसभेतही भाजपचे बहुमत आणणार यात शंकाच नाही. यातच २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही मतदार आपल्याला अजून दणदणीत पध्दतीने विजयी करणार. म्हणजे फक्त विचार करा- लोकसभेत भाजपला दोन तृतीयांश बहुमत, राज्यसभेतही बहुमत आणि देशातील बहुतांश राज्यांमध्येही आपलीच सत्ता! मग राम मंदिर, कलम-३७० रद्द करणे आदी कामे चुटकीसरशी होतात की नाही ते पहा! अर्थात काश्मिरचा प्रश्‍नही निकालात निघालेला असेलच. तिथपर्यंत प्रत्येक भारतीयाच्या नावावर असणार्‍या काळ्या धनाची रक्कम २५ लाखांवर गेलेली असेल. तेदेखील आमच्या नावावर जमा होतील. दाऊद इब्राहिम, लखवी आदींसारख्या दुश्मनांचा खात्मा झालेला असेल. पाकसह तमाम शत्रूराष्ट्र आपल्याशी नमून वागतील. आपली अर्थव्यस्था इतकी मजबूत झालेली असेल की, एक डॉलर हा एक रूपयापर्यंत खाली आलेला असेल, पेट्रोल २५ रूपये लिटर दराने मिळेल, कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य असेल, भ्रष्टाचार समाप्त झालेला असेल, तमाम भ्रष्टाचारी गजाआड असतील, दहशतवाद/नक्षलवाद तर शोधूनही सापडणार नाही…आणि हो! अमेरिका, चीनसारख्या बलाढ्य देशांना मागे फेकून भारत महासत्ता झालेला असेल. भारतातील प्रत्येक हाताला रोजगार असेल. शेतकर्‍यांकडेही आबादीआबाद असेल. एकाच शब्दात सांगावयाचे तर भारत हा पुन्हा ‘सोने की चिडीया’ झालेला असेल. यामुळे आम्ही लज्जाग्रस्त भारतीय आपल्याला पुढील वेळेस प्रचंड बहुमतांनी जोपर्यंत निवडून देत नाहीत तोपर्यंत भारतवासियांना खर्‍या अर्थाने ‘अच्छे दिन’ येणार नाहीच हे निश्‍चित.
narendra_modi1

About the author

shekhar patil

3 Comments

Leave a Comment