आध्यात्मिक

‘पास्ट लाईफ थेरपी’-सत्य, मिथ्य की अर्धवट तथ्य?

अनेक पॅथींनाही दाद न देणार्‍या असाध्य विकारांवर इलाज करण्यासाठी जगभरात ‘अल्टरनेट हिलींग मेथड’ अर्थात पर्यायी उपचार पध्दतीचा वापर वाढीस लागला आहे. या संदर्भात गतजन्म चिकित्सा अर्थात ‘पास्ट लाईफ थेरपी’ अत्यंत उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. मानवी मनाचे असंख्य पापुद्रे उकरून काढत एखाद्याच्या मागील जन्मांमध्ये जाणे शक्य आहे का? गत जन्मांमधील कर्मांचा या जन्मातल्या समस्यांशी काही संबंध असतो का? मनोस्वास्थ कायम राखत ही चिकित्सा शक्य आहे का? या अनेक प्रश्‍नांचा घेतलेला हा धांडोळा.

मला स्वत:ला या विषयामध्ये रस कसा निर्माण झाला हे सर्वप्रथम सांगतो. ओशोंच्या प्रवचनांमध्ये अनेकदा गतजन्माचा संदर्भ माझ्या वाचण्यात आला होता. अर्थात त्यांनी याच्या आध्यात्मिक आयामावर जास्त विवेचन केले आहे. याचसोबत ‘लाईफ पॉझिटीव्ह’ या मासिकात ‘पास्ट लाईफ थेरपी’वर हैदराबाद येथील डॉ. न्यूटन कोंडावेत्ती यांचा लेख वाचून या विषयात मला रस निर्माण झाला. त्यांच्या लेखाचा संदर्भ घेत मी त्यांना ई-मेल करून या चिकित्सेविषयी माहिती विचारली. त्यांनी यावर सविस्तर उत्तर दिले. यानंतर झालेल्या संवादवहनातून मी ही थेरपी करण्याचे ठरविले. डॉ. न्यूटन यांनी पाच जण चिकित्सा करत असतील तर आपण भुसावळ वा जळगाव येथे येण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र माझ्यासकट तीनच जण तयार झाल्याने ही योजना बारगळली. अर्थात यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. दरम्यान गतजन्म, पुनर्जन्म, ध्यान आदी विषयांवर अनेक ग्रंथांचे अध्ययन झाले. या विषयाबाबत एक ठाम मत तयार झाले. २००९ साली ‘राज पीछले जनम का’ हा कार्यक्रम एका दुरचित्रवाणी वाहिनीवर आल्याने याबाबतची उत्सुकता पुन्हा चाळली गेली. मात्र सर्वात जास्त थरार डॉ. ब्रायन वेस यांच्या ‘मेनी लाईव्हज मेनी मास्टर्स’ हे जगविख्यात पुस्तक वाचून आला. डॉ. वेस हे गतजन्म चिकित्सेचे जागतिक पातळीवरील मान्यवर नाव. त्यांच्या पुस्तकाने मला झपाटून टाकले. यानंतर जाणीवपूर्वक या विषयाचे अध्ययन केले. या क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा केली. यातील सार आपल्याला सादर करत आहे.

पुनर्जन्म आणि गत जन्माचे स्मरण हे अत्यंत वादग्रस्त विषय आहेत. वैश्‍वीक पातळीवरील प्रमुख धर्मांचा विचार करता; ख्रिश्‍चन, इस्लाम आणि ज्यू धर्मियांनी पुनर्जन्माची संकल्पनाच मान्य नाही. मात्र पुनर्जन्म ही हिंदू, बौध्द व जैन आदी पौवात्य धर्मांची एक प्रमुख संकल्पना होय. आपण या पृथ्वीवर अगोदरही अस्तित्वात होतो अन् पुढेही राहणार ही कल्पनाच किती रोमांचक आहे. अर्थात जन्मापूर्वी अन् मृत्यूनंतर नेमके काय होते? हा मानव जातीला पडलेला आदीम प्रश्‍न आहे. प्राचीन ग्रीक-रोमन साम्राज्यांमध्ये यावर काही प्रमाणात विवेचन करण्यात आले आहे. प्राचीन इजिप्शीयन संस्कृतीतही याचे संदर्भ आढळतात. तिबेटी बौध्द संस्कृतीत पुर्नजन्माला महत्वाचे स्थान आहे. विशेष बाब म्हणजे दलाई लामा हे सर्वोच्च धर्मगुरू आपला पुढील जन्म कुठे होणार याचे भाकीत करतात. यानंतर त्याच ठिकाणी जन्माला येणारे मुल हे गतजन्मातील आठवण सांगते अन् नवीन दलाई लामांची घोषणा होते. तिबेटमध्ये मृत्यूपंथाला लागलेल्या व्यक्तीवर शेवटचे धार्मिक संस्कार (बारदो) करण्यात येतात. यामुळे त्याचा शेवटचा प्रवास आणि आगामी जन्म सुखकर होतो अशी समजूत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार केला असता हिंदू, बौध्द आणि जैन या तिन्ही धर्मांमध्ये पुनर्जन्माबाबत गहन चिंतन झाले आहे. हे तिन्ही धर्म कर्माचा नियम मानतात. हा सिध्दांत अत्यंत सुलभ पण तितकाच गहन आहे. सर्वसाधारणपणे ‘जसे कर्म तसे फळ’ ही या सिध्दांताची संकल्पना आहे. ख्रिस्ती, इस्लामी आणि ज्यू धर्मग्रंथांमध्ये ईश्‍वर-मानव, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक अशा संकल्पना आहेत. भारतभूमिवर फुललेल्या धर्मांमध्ये याला तर स्थान आहेच मात्र याचसोबत कर्माच्या सिध्दांतालाही मानण्यात आले आहे. यामुळे आपल्या आजच्या जन्मातील बर्‍यावाईट गोष्टी या गतजन्मातील कर्माशी थेट संबंधीत असल्याचे मानण्यात आले आहे. अर्थात पुनर्जन्म आल्यानंतर याच्याशी संबंधीत इतर बाबीही आल्याच.

ज्योतिषशास्त्राच्या पध्दतीने आपण भविष्य कथन करू शकतो. याच प्रकारे कोणत्या तरी पध्दतीचा वापर करून काळाच्या उदरात मागे जाऊन गतजन्म पाहणे शक्य असल्याचे भारतीय धर्मांमध्ये अनेक दाखले आहेत. महर्षी पतंजली यांच्या योगसुत्रांमध्ये ‘प्रतिप्रसव’ पध्दतीचा आलेला उल्लेख हा ‘पास्ट लाईफ थेरपी’चाच प्रकार असल्याचे आता मान्य झाले आहे. भगवान गौतम बुध्दांनी तर आपल्या अनेक मागच्या जन्मांविषयी माहिती दिली आहे. याच ‘जातक कथा’ म्हणून विख्यात झाल्या आहेत. अनेक योनींमधून सत्कर्म करून ते मानवी जन्मात येऊन पुर्णत्वाला कसे पोहचले याचे व्यापक दर्शन आपणास या कथांमधून होते. जैन धर्मामध्ये यालाच ‘जाती स्मरण’ असे संबोधण्यात आले आहे. या विधीच्या माध्यमातून मागच्या जन्मांविषयी ज्ञान प्राप्त होते. याचा आध्यात्मिकदृष्ट्या उपयोग करून कैवल्यावस्थेत प्राप्त होणे शक्य असल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे. जन्म-मरणाचे चक्र तोडून मोक्ष प्राप्तीची संकल्पना भारतीय संस्कृतीत मानली गेली आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे.

भारतीय संस्कृतीतेतर धर्मांमधील काही पंथांनाही पुनर्जन्माचा सिध्दांत मान्य आहे. यात इस्लाममधील सुफी पंथ महत्वाचा आहे. दगड-धोंड्यांपासून फुल-वनस्पती ते पशु-प्राणी व मानव असा कुणाचाही जन्मप्रवास असल्याचे मानले जाते. काही ख्रिस्ती संप्रदायांचीही याला मान्यता आहे. डॉ. ऍनी बेझंट आणि मॅडम ब्लाव्हटस्की यांनी स्थापन केलेल्या ‘थिऑसॉफिकल सोसायटी‘च्या माध्यमातून पाश्‍चात्य राष्ट्रांमध्ये पुनर्जन्माचा सिध्दांत परिणामकारक पध्दतीने पोहचला. यामुळे या विषयी उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले. यावर वैज्ञानिकदृष्ट्या संशोधन करण्यात आले. विसाव्या शतकाच्या पुर्वार्धात एडगर केसी यांनी आपल्याकडील अतिंद्रीय शक्तीच्या सहाय्याने अडीच हजारावर रूग्णांना कोणतेही उपचार न करता बरे केले. विशेष बाब म्हणजे या सर्व रूग्णांचा ‘केस स्टडी’ तयार करण्यात आला असून तो आजही अध्ययनासाठी उपलब्ध आहे. केसी हे अनेकदा उन्मनी (ट्रान्स) अवस्थेत समोरच्या रूग्णाचा मागचा जन्म पाहून त्याच्या वर्तमानातील समस्या सोडवत असत. १९५० नंतर कर्माचा सिध्दांत, पुनर्जन्म, गतजन्म चिकित्सा या बाबींचे वैज्ञानिक कसोटीवर गहन संशोधन करण्यात आले. यातूनच जन्माला आली ‘पास्ट लाईफ थेरपी’! डॉ. इयान स्टीव्हन्सन, ब्रायन वेस, कॅरोल बोमन, डॉ. ब्रूस गोल्डबर्ग यांनी या पध्दतीला विकसित करण्यात मदत केली. मात्र या आधी उल्लेख केलेल्या डॉ. ब्रायन वेस यांच्या ‘मेनी लाईव्हज मेनी मास्टर्स’ या पुस्तकाने खर्‍या अर्थाने या पध्दतीला अत्यंत व्यापक मान्यता मिळवून दिली.

डॉ. वेस हे संमोहनशास्त्रज्ञ आहेत. कॅथरीन या आपल्या एका रूग्णाला संमोहनावस्थेत नेऊन काही सकारात्मक सुचना (सजेशन) देण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ही महिला आपल्या मागच्या जन्मातील काही घटना कथन करत असल्याचे डॉ. वेस यांच्या लक्षात आले. प्रारंभी त्यांना हा प्रकार म्हणजे कॅथरीनच्या कल्पनेचा विलास वाटला. मात्र काही वेळानंतर ती स्त्री डॉ. वेस यांच्या मृत झालेल्या आप्तांविषयीदेखील फक्त त्यांनाच माहित असणार्‍या बाबी सांगू लागली तेव्हा ते हादरले. त्यांना या प्रकारात तथ्य असल्याचे वाटू लागले. कॅथरीनला वारंवार याच प्रकारे गतजन्मात नेऊन तिने दिलेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी वरील पुस्तक लिहले. या पुस्तकाला जगभरातील वाचकांनी डोक्यावर घेतले. यामुळे जगात गतजन्म जाणून घेण्याची उत्सुकताही वाढीस लागली. डॉ. वेस यांनी ‘पास्ट लाईफ रिग्रेशन’ पध्दतील नवीन आयाम दिला. याशिवाय त्यांनी शेकडो थेरपिस्टही तयार केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लक्षावधी स्त्री-पुरूषांनी या पध्दतीचा वापर केला आहे. आता जगात या चिकित्सा पध्दतीला मान्यता मिळाली असून यावर सखोल संशोधनही सुरू आहे.

कुणालाही आपल्या मागच्या जन्मात डोकावून पाहण्याची आवश्यकता काय? हा प्रश्‍न कुणाच्याही मनात उपस्थित होणारच. याचे उत्तर एकाच शब्दात देणे अवघड आहे. मात्र आपल्या जीवनात अनेक अतर्क्य घटना घडतात. कोणतेही कारण नसतांना येणारी गंडांतरे, आकस्मिकपणे निर्मित झालेले शत्रूत्व, कोणत्याही बाबींविषयीचा भयगंड, न्यूनगंड, नैराश्य, अकारण वाटणारी भिती, असाध्य आजार, अपघात, नातेसंबंधांमधील तणाव, प्रियजनांचा वियोग, विपन्नावस्था आदी बाबी प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी येतातच. यातील प्रत्येक घटना ही गत जन्मातील कोणत्या तरी घटनेशी संबंधीत असते. उदाहरणार्थ एखाद्याला आपण गेल्या जन्मात त्रास दिला असल्यास तो कर्माच्या सिध्दांतानुसार आपणास या जन्मात छळणारच! हे एक चक्र असते. या चक्राला भेदायचे असल्यास आपणास गतजन्म चिकित्सेचा उपयोग होऊ शकतो. ‘पास्ट लाईप थेरपी’ अनेक पध्दतीने शक्य आहे. मात्र

* पास्ट लाईफ रिग्रेशन

* ब्रिज मेथड

* सजेशन

* मेडिटेशन

आदी याचे प्रमुख प्रकार आहेत. यापैकी ‘पास्ट लाइफ रिग्रेशन’ हा प्रकार सुलभ, परिणामकारक आणि सर्वमान्य असा आहे. या लेखात ‘पास्ट लाईफ थेरपी’ हा शब्द ‘पास्ट लाईफ रिग्रेशन’ला समानार्थी वापरण्यात आला आहे.

‘पास्ट लाईफ रिग्रेशन’मध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक (थेरपिस्ट) हा संबंधीत व्यक्तीला शांत, सुमधुर संगीताच्या सहाय्याने सुचना करत शिथिल अवस्थेत घेऊन जातो. यानंतर त्याला काल-परवा, गेल्या वर्षातच्या घटनांची माहिती विचारली जाते. यानंतर त्याला बालपणातील आठवणी विचारल्या जातात. येथपावेतो ‘ट्रान्स’च्या स्थितीत गेलेल्या व्यक्तीच्या अवचेतन मनातील पापुद्रे निघू लागतात. तो अगदी भ्रृणावस्थेत जाऊन गेल्या जन्मात जाऊन पोहचतो. यानंतर तो गेल्या जन्मातील आठवणी भराभरा सांगू लागतो. साधारणपणे या आठवणी एखादे स्वप्न पाहिल्यागत समोर येतात असा यात सहभागी झालेल्यांचा अनुभव आहे. एकदाचा हा व्यक्ती मागच्या जन्मात गेला की मग थेरपिस्ट त्याला आवश्यक असणारे विशिष्ट प्रश्‍न विचारतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला अगदी असह्य डोकेदुखी असल्यास शक्य आहे की गेल्या जन्मी त्याला डोक्याला भयंकर जखम झालेली असावी! एखाद्याला सापाविषयी भय वाटत असल्यात त्याचा एखाद्या जन्मात सर्पदंशाने मृत्यू झाला असणे शक्य आहे. त्याला पाण्याविषयी भिती वाटत असल्यात तो कोणत्या जन्मात तरी बुडून मेलेला असावा. या सर्व बाबी संबंधीत व्यक्ती अनुभवतो. यानंतर थेरपिस्टच्या सुचनेनंतर तो व्यक्ती पुन्हा सामान्य अवस्थेत येतो. आता हा सर्व प्रकार झाल्यानंतर यात चित्तथरारक मनोरंजन वगळता नाविन्य काय? हा प्रश्‍न उपस्थित होणे साहजीक आहे. यासाठी विवेचन आवश्यक आहे. आपल्या विद्यमान जन्मातील एखाद्या भयंकर समस्येचे मूळ हे गतजन्मातील एखाद्या कृत्याशी जुडले असल्याचे आपणास याद्वारे दिसून येते. या माध्यमातून कर्माच्या एका श्रुंखलेशी या बाबी बांधल्या गेल्याचे आपणास ज्ञात होते. यामुळे आपले दु:ख कमी होते. आपण जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहू शकतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे जीवन ही एक ‘लिला’ असल्याचे आपल्याला समजते. तो आपल्यावरील संकटे अथवा जडलेल्या व्याधी यासाठी दुसर्‍यांना दोष देणे टाळतो. यातून मानवी जीवनातील क्षणभंगुरत्वाबद्दल शोक करणे व्यर्थ असल्याचेही आपल्याला समजून येते. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे आपण जाणीवपूर्वक मागच्या जन्मात जाऊन घटनांना पाहिले तर त्याची या जन्मातील तीव्रता बराचशी कमी होते. या उपचारपध्दतीतून गेलेल्या बहुतांश स्त्री-पुरूषांना आपल्या जीवनात सकारात्मक बदल झाल्याचे आढळून आले आहेत. याहूनही महत्वाची बाब म्हणजे या माध्यमातून गेल्या जन्मातील संदर्भ आठवल्यानंतर या जन्मातील त्याचा ‘इफेक्ट’ बराचसा कमी होतो.

उदाहरणार्थ एखाद्याला सध्याच्या जन्मात एखादी असाध्य व्याधी जडली आहे. यावर उपचार सुरू असले तरी त्याला त्या व्यक्तीचे शरीर प्रतिसाद देत नाही आहे. यावर तो व्यक्ती गतजन्म चिकित्सेतून गेल्यास त्याचे शरीर उपचाराला प्रतिसाद देऊ शकते. अशी असंख्य उदाहरणे आढळून आली आहेत. या चिकित्सेचा नातेसंबंधांवरही परिणाम होतो. एखाद्या व्यक्तीला आपण पहिल्यांदा भेटूनही त्याला आपण खूप जवळून ओळखत असल्याचा भास होतो तर नेहमी भेटणार्‍याला वा जवळच्या आप्ताला न कळत आपण कोणत्याही कारणाविना घृणा करत असतो. या सर्वांची मुळे हे गत जन्मात असतात. यामुळे या जन्मातील बिघडलेले नातेसंबंध आणि त्यामुळे आलेला ताणतणाव निवळण्यासाठीही ही थेरपी अत्यंत उपयुक्त सिध्द झाली आहे.

साधारणत: अर्धा तास ती तीन तासापर्यंतचे सेशन्स यासाठी घेण्यात येतात. काहींना पहिल्याचा सेशनमध्ये परिणाम दिसतो तर काहींना अजून आवश्यकता भासते. ढोबळपणे कुणीही मागच्या एका जन्मात सहजपणे जाऊ शकतो. मात्र काही जण अनेक जन्म मागे जाऊ शकतात. मागच्या जन्मामधील आठवणी या साधारणपणे स्वप्नासारख्या दिसतात. यावरून थेरपीस्ट त्या व्यक्तीला विचारणा करत असतो. या सर्व प्रकाराची आवश्यकता भासल्यास रेकॉर्डींगही करण्यात येते. याच्या उत्तम परिणामासाठी संबंधीत व्यक्तीच्या विचाराचा खुलेपणा जितका आवश्यक असतो तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त थेरपीस्टचे कौशल्य महत्वाचे असते. आपल्याला मागच्या जन्मामध्ये घेऊन जाणारा थेरपीस्ट हा साधारणपणे मैत्रीपूर्ण मध्यस्थाची भूमिका बजावत असतो. तो त्या व्यक्तीला बोलते करून गत जन्मातील आठवणींच्या प्रदेशातून भ्रमंती करून आणतो. यानंतर या माहितीचे विश्‍लेषण करून त्याची विद्यमान जन्मातील समस्या सोडवण्याची जबाबदारीही त्याचीच असते. याचमुळे उत्तम संभाषण कौशल्य, मानवी मनाचे गहन ज्ञान, संयमी व ध्यानी वृत्ती असल्याशिवाय कुणी चांगला पास्ट लाईफ थेरपीस्ट बनू शकत नाही. असो. आता आपण या पध्दतीवर होणार्‍या आक्षेपांकडे वळू या!

पुनर्जन्म, गत जन्मातील आठवणी या जन्मात स्मरणे आदी बाबींवर एकमत नसले तरी जगाच्या सर्व कोपर्‍यांमध्ये अशा घटना नेहमीच आढळून येतात. यामुळे शास्त्रीय जगतात याविषयी कुतुहल निर्माण होऊन यावर संशोधन सुरू आहे. मानसशास्त्राच्या ‘क्लिनीकल सायकोलॉजी’ या प्रकारामध्ये ‘पास्ट लाईफ थेरपी’ची गणना करण्यात येते. यावर अनेक शास्त्रीय प्रबंध लिहण्यात आले आहेत. मात्र यावर आक्षेपही घेण्यात आले आहेत. संमोहनामध्ये मागच्या जन्मातील स्मृती आठवणे हा संबंधीत व्यक्तीचा कल्पनाविलास असल्याचा नेहमी आरोप करण्यात येतो. बरं असे शक्य झाले तरी मागचा जन्म का पहावा? असा प्रश्‍नही वारंवार विचारण्यात येतो. मागच्या जन्मातील एखादी भयंकर घटना पाहिल्यानंतर त्याचे विद्यमान जन्मात पडसाद उमटण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या संदर्भात ओशोंनी एका प्रवचनात एक उदाहरण दिले आहे. एक महिला आपल्या मागच्या जन्मातील आठवणींमुळे प्रचंड अस्वस्थ होते. कारण ही स्त्री या जन्मात अत्यंत धर्मपरायण आणि पतिव्रता असते. मात्र मागच्या एका जन्मात ती वारांगना असल्याचे तिला दिसते. यामुळे ती काही दिवस प्रचंड अस्वस्थ बनते. यामुळे ध्यानात उंची गाठल्याशिवाय अशा स्वरूपाची थेरपी करू नये असा सल्ला ओशोंनी दिला आहे. ध्यान करतांना अनेकदा गतजन्माच्या स्मृती जागृत होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. अर्थात हा प्रकार नैसर्गिकरित्या घडत असतो मात्र याला फारसे महत्व देऊ नये असे त्यांचे म्हणणे आहे. ‘पास्ट लाईफ थेरपी’ केलेल्या एका तरूणाच्या वडिलांनी मला स्वत: एक धक्कादायक बाब सांगितली आहे. त्यांचा मुलगा एका जन्मात हबशी दरोडेखोर असल्याचे त्याला थेरपीच्या सेशनमध्ये दिसले. यानंतर तब्बल दोन महिन्यापर्यंत त्याचे डोळे तारवटलेले अन् भयंकर विखारी बनले होते. यानंतर हा तणाव निवळल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी त्यांच्या मुलाचे ‘त्या’ कालखंडातील व नेहमीचे छायाचित्रही मला दाखविले. यातील फरक हा कुणालाही दिसून येत होता. अर्थात हा एक बाह्य परिणाम वगळता त्यांच्या मुलास या थेरपीचा लाभ झाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. हे सांगण्याचा हेतू एकच की या चिकित्सेमध्ये आपण आपल्या स्मृतींशी खेळत असतो. अर्थात कुशल थेरपीस्टमुळे असल्या स्वरूपाचे ‘साईड इफेक्ट’ कमी होत असल्याचेही दिसून आले आहे.

जगातील कोणतीही पॅथी अर्थात चिकित्सापध्दती परिपूर्ण नाही. अगदी सर्वमान्य अशा ऍलोपॅथीवरही अनेकदा आरोप होत असतात. एका चिकित्सा पध्दतीचा वापर करणारा हा दुसर्‍या पॅथीचे उणेदुणे काढत असतो. यामुळे ‘पास्ट लाईफ थेरपी’वरील आरोप सहज स्वाभाविक आहेत. आधुनिक उपचार पध्दतींमध्ये मानवी शरिराचाच विचार होता. आता मात्र परिस्थिती बदलत आहे. कुणीही व्यक्ती हा केवळ भौतिक शरीरच नव्हे तर शरीर (बॉडी), मन (माइंड), आत्मा (सोल) अन् इमोशन्स (भावना) आदींचा समुच्चय असल्याचे आता आधुनिक चिकित्साशास्त्रही मान्य करत आहे. यामुळे कोणत्याही व्यक्तीला व्याधीमुक्त करावयाचे असल्याचे त्याचे शरीरच नव्हे तर इतर अंगांचाही विचार आता होऊ लागला आहे. यामुळे ‘अल्टरनेट हिलींग’विषयी गांभीर्याने चिंतन होऊ लागले आहे. या दृष्टीने ‘पास्ट लाईफ थेरपी’ ही अत्यंत परिणामकारक ठरत असल्याचे अनेक प्रयोगांनी सिध्द केले आहे. या संदर्भात सखोल अध्ययन केले असता याची परिणामकारकता माझ्या मनाला भावली. मात्र आयुष्य एकदम मजेत, रमतगमत अन् सृजनयुक्त व्यतीत होत असतांना; वाचन, चिंतन, मनन अन् श्रवणाने समृध्द होत असतांना तसेच जीवनातील तणावाकडे तटस्थपणे पाहण्याची दृष्टी लाभली असतांना या फंदात का पडावे? हा प्रश्‍न मनाला वारंवार पडतो. यामुळे या चिकित्सेकडे वळण्याचा विचार मी वारंवार टाळला. मात्र गेल्या रविवारी (९ सप्टेंबर) जळगावात या थेरपीतून गेलेल्या एका मान्यवराशी झालेल्या सखोल चर्चेमुळे मनात हा विचार पुन्हा बळावला आहे. ते म्हणाले ‘‘अरे बाबा मनोरंजनासाठी नव्हे मात्र तुला आतून वाटत असेल तर इच्छा दाबून का ठेवतो?’’ या चर्चेप्रसंगी उपस्थित असणार्‍या माझ्या एका सहकार्‍यालाही हा विचार भावला. पाहू या आता पुढे काय होते ते…!

अधिक माहितीसाठी लिंक्स:-

* पास्ट लाईफ रिग्रेशन

डॉ. ब्रायन वेस

* पास्ट लाईफ रिग्रेशन ऑर्ग

* लाईफ रिसर्च अकादमी

* भारतातील थेरपीस्टची यादी

<<<<<<<=====>>>>>>>>>============<<<<<<<<------->>>>>

परंपरेला विज्ञानाची जोड देणारा रहस्यदर्शी

विख्यात रहस्यदर्शी आणि तत्वचिंतक ओशो रजनीश यांची आज जयंती. एके काळी आपल्या प्रखर क्रांतीकारक विचारांनी संपूर्ण जगातील तमाम ढुढ्ढाचार्यांना हादरवणार्‍या ओशोंना आता जगभर मोठ्या प्रमाणात मान्यता मिळत आहे. त्यांचे विचार, ध्यान प्रणाली आणि तत्वज्ञानाला आत्मसात करण्यासाठी सर्वत्र उत्सुकता दिसून येत आहे. त्यांनी मानवतेला इतक्या विविधांगी रूपाने समृध्द केले आहे की आपली मती अक्षरश: गुंग होते. जीवनाच्या प्रत्येक आयामाला परिसस्पर्श करणार्‍या त्यांच्या रसाळ प्रवचनांची कोट्यवधींना भुरळ पडली आहे. मात्र त्यांची महत्ता केवळ इतकीच नाही. आपल्या तेजस्वी विचारांना त्यांनी आधुनिक ध्यान प्रणालींची जोड दिलेली आहे. याचा उपयोग करून असंख्य स्त्री-पुरूषांनी आपल्या जीवनात समग्र रूपांतरण अनुभवले आहे. त्यांची विचाराधारा आणि चिंतनाची चिकित्सा करावयाची ठरवल्यास हजारो पानेही अपुरी पडतील. अर्थात ते या लेखाचे प्रयोजनही नव्हे. आजच्या युगातील मानवाची जटिल मनोदशा लक्षात घेत, ओशोंनी पारंपरिक ध्यानविधींना अत्याधुनिक मनोचिकित्सेची जोड दिलेली आहे. याचाच संक्षिप्त वेध घेण्याचा हा प्रयत्न.

ओशोंनी सर्वात जास्त भर ध्यानावर दिलेला आहे. एक प्रकारे ध्यान हे त्यांच्या शिकवणीचे सार मानता येईल. अर्थात, त्यांच्या ध्यानपध्दती या परंपरागत विधींपेक्षा खूप वेगळ्या आहेत. जगातील बरेच धर्म, पंथ अथवा उपपंथांमध्ये ध्यानाला महत्व दिलेले आहे. जगातील विविध भागांमध्ये आजवर ध्यानाचे शेकडो प्रकार विकसित करण्यात आले आहेत. हे सर्व प्रकार फारसे परिणामकारक नसल्याचा साधकांचा अनुभव आहे. एक तर बर्‍याच गुरूंनी ध्यान हे चुकीच्या पध्दतीने जगासमोर आणले. याखेरीज, काही उपयुक्त विधींमध्ये कालानुरूप बदल करण्यात आलेले नाहीत. यामुळे बर्‍याच ध्यानविधींमुळे आत्मिक शांततेऐवजी मनोविकार बळावल्याचा अनुभव येतो. जीवनभर चुकीची साधना करणार्‍यांना अंतर्यात्रेत गती मिळण्याऐवजी विक्षिप्तता अथवा वेडेपणा जडल्याच्याही अनेक घटना घडतात. भरीत भर म्हणजे सर्वत्र आजही ध्यानाविषयी अनेक चुकीच्या समजुती प्रचलित आहेत. ‘एकांतात पद्मासनात डोळे मिटून मन एकाग्र करणे म्हणजे ध्यान’, असे तर अगदी तमाम तथाकथित आध्यात्मवाद्यांनाही वाटते. यात कुणाचा दोषही नाही. परंपरेनेच आपल्याला ही शिकवण दिलेली आहे. एकांत आणि एकाग्रता यांच्या माजलेल्या स्तोमामुळे बरेच जण इच्छुक असूनही ध्यानापासून दूरच राहतात. ओशोंनी या सर्व बाबींना जाणून घेत ध्यानाच्या नवीन पध्दती विकसित केल्या.

विपस्सना आणि अन्य काही विधी या अंतर्यात्रेसाठी अत्यंत उपयुक्त असल्या तरी आत्यंतिक तणावाने ग्रासलेल्या आजच्या मानवासाठी थेट या प्रक्रियेत उतरणे धोकेदायकही ठरू शकते. प्राचीन आणि आजच्या युगातील माणसांमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. आजच्या अत्यंत गतीमान जीवनचक्रातील मानव हा अनेक मनोविकारांनी ग्रस्त आहे. परिणामी, कुणी ध्यानाद्वारे शांतता मिळवण्याचा प्रयत्न करताच परिणाम उलटाच होतो. यामुळे ओशोंनी कॅथार्सिस अर्थात रेचनावर भर दिला. नवीन साधकांनी ध्यानाच्या गहन धारेत प्रवेश करण्याआधी मन आणि शरीराची शुध्दी करण्याचे त्यांनी सुचविले. एव्हढेच नव्हे तर त्यांनी यासाठी ‘सक्रीय ध्यान’ (डायनॅमिक मेडिटेशन) ही क्रांतीकारक पध्दती विकसित केली. यातील प्रथम तीन चरणांमध्ये शारीरिक आणि मनोवेगांचा निचरा झाल्यावर कुणीही साधक ध्यानाच्या खर्‍या (चौथ्या) भागात अगदी सहजगत्या प्रवेश करतो. ध्यान आणि सक्रियता या बाबींचा पारंपरिक दृष्टीकोनातून विचार केला असता त्या एकमेकींशी विसंगत भासतात. ओशोंच्या मते मात्र त्या एकमेकांना पूरक ठरू शकतात. त्यांनी या संदर्भात सविस्तर विवेचनही केले आहे. ध्यान ही अक्रियता असली तरी आजच्या मानवाला याची पूर्वतयारी आत्यंतिक गतीमानतेपासून करावी लागेल असे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले आहे. ‘सक्रिय’चा प्रयोग करणार्‍या कुणालाही याची लागलीच प्रचिती येते. त्यांनी खूप ध्यानपध्दती विकसित केल्या असल्या तरी ‘डायनॅमिक’ची बात काही औरच! एक प्रकारे साधकांसाठी ही रामबाण पध्दतीच होय. याखेरीज, त्यांच्या कुंडलिनी, नटराज, नो-डायमेन्शन, मंडला आदी विधींसह काही ‘थेरपी ग्रुप्स’मध्येही मोठ्या प्रमाणात सक्रियता असून यामागे वैज्ञानिक सिध्दांत आहेत.

विसाव्या शतकात मानवी मनावर अत्यंत सखोल संशोधन झाले. चेतन आणि अचेतन मनातील कोलाहल शमविल्याशिवाय कुणाचेही व्यक्तिमत्व खंडितच असल्याचे मानसशास्त्रज्ञांनी सिध्द केले. समग्र व्यक्तिमत्व अर्थात एकसंघ मनोदशेसाठी मानसिक चिकित्सा तसेच विश्लेषणाच्या विविध पध्दतीही विकसित करण्यात आल्या. मनोचिकित्सेला मानवी चेतनेच्या इतिहासात अत्यंत महत्वाचे स्थान असले तरी याच्या मर्यादाही खूप आहेत. यामुळे ओशोंनी मनोचिकित्सेतील काही घटकांचा पारंपरिक विधींसोबत अफलातून संगम करत नवीन ध्यान प्रकार विकसित केले. खरं तर, मनोचिकित्सा जिथे संपते तेथून ओशोंच्या विधींद्वारे अंतर्यात्रा सुरू होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांनी पौर्वात्य विधींना पाश्चात्य मनोचिकित्सेचा साज चढविला. ध्यान ही अत्यंत वैज्ञानिक प्रक्रिया असल्याने त्यांनी वारंवार प्रतिपादन केले आहे. याचा वर्ण, भाषा, जाती, धर्म अथवा वंशाशी काहीही संबंध नसल्याचेही विचार त्यांनी मांडले. ध्यानावर सर्व मानवजातीचा अधिकार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. ओशोंना विश्वव्यापी मान्यता मिळण्यामागे ही बाबही कारणीभूत आहे. कोणत्याही स्वरूपाचे कर्मकांड, पुजा-अर्चा अथवा तंत्र, मंत्रादी अवडंबर न माजवता ध्यानाद्वारे कुणीही अंतर्यात्रेत गतीमान होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले. यासाठी रूढी-परंपरांना उद्ध्वस्त करत त्यांनी आधुनिकतेचीच कास धरली.

पूर्वी ध्यान म्हणजे काही तरी रूक्ष प्रक्रिया असल्याचा समज होता. ओशोंनी ध्यानाला उत्सवाचा आयाम दिला. त्यांच्या जवळपास प्रत्येक ध्यानविधीच्या शेवटी अस्तित्वाला धन्यवाद देत उत्सव साजरा करण्यात येतो. ‘हंसीबा खेलिबा धरिबा ध्यानम’ हा त्यांचा संदेश आहे. त्यांच्या बहुतांशी ध्यानविधी आपण अगदी सहजगत्या करू शकतो हे विशेष. सच्च्या साधकात ‘बुध्दाचे मौन अन्‌ मिरेचे नर्तन’ यांचा मिलाफ असावा ही शिकवण त्यांनी दिली. ‘अहर्निश जागरूकता म्हणजेच ध्यान’ हे सांगत त्यांनी यासाठी कुणाला संसाराचा त्याग करण्याचीही आवश्यकता नसल्याचे सांगितले. वास्तविक पाहता कोलाहलयुक्त जगामध्ये राहूनच ध्यान साधणे खूप कठीण आहे. यासाठी त्यांनी ‘मेडिटेशन इन मार्केट प्लेस’ या संकल्पनेवर आधारित ध्यानांवरच भर दिला. त्यांनी सर्व स्तरांतील लोकांसाठी पध्दती विकसित केल्या. मानसिक ताणावरील उपायांपासून ते सत्याचा शोध घेण्यासाठी आसुसलेल्या साधकांना उपकारक पध्दती त्यांनी शोधल्या. एक प्रकारे मानवी चेतनेच्या विविध पातळ्यांवर त्यांनी कार्य केले.

ओशोंना अंतर्गत आणि बाह्यरित्या अत्यंत समृध्द जीवन जगणारा मानव अभिप्रेत होता. त्यांच्या मते भौतिक सुबत्ता आणि आध्यात्मिकता यांच्या संगमातूनच नवमानवाची निर्मिती होणार आहे. आपली विशाल प्रवचनसंपदा आणि विविध ध्यानविधींद्वारे त्यांनी जीवनभर हाच प्रयत्न केला. आज ओशोंच्या तत्वचिंतनासोबत त्यांच्या ध्यानसंपदेविषयीदेखील जगभर जिज्ञासा दिसून येत आहे. यावर ठिकठिकाणी व्यापक व सखोल संशोधनही होत आहे. पूर्व आणि पश्चिम, परंपरा आणि आधुनिकता तसेच आध्यात्म आणि विज्ञान हे एकमेकांच्या विरूध्द नसून यांच्या संगमातूनच पृथ्वीवर समग्र व्यक्तीमत्वाचा नवमानव अवतरणार असल्याचे ओशोंनी फक्त सांगितलेच नाही तर यासाठी लागणार्‍या विधीदेखील दिल्या, ही त्यांची महत्ता होय. त्यांना आपल्या जीवनकाळात अनेक वादळांना तोंड द्यावे लागले होते. खरं तर काळाच्या पुढचे क्रांतीकारक विचार मांडल्याचाही तो परिणाम असावा. आता एकविसाव्या शतकातील मानवापाशी सर्व प्रकारची भौतिक सुखे असतांनाही अंतरीचे रितेपण आणि मनोतणावाच्या वेदना त्याला छळत आहे. यावर मात करून चैतन्यमय जीवन जगण्यासाठी ओशोंचे विचार आणि ध्यानविधी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचेही आता जगाच्या लक्षात आलेय. ओशोंची शिकवण आणि ध्यानपध्दतीला जगभरात मिळणारा प्रतिसाद हेच दर्शवतोय.

0000000000000***************00000000000000000**********************

महर्षी महेश योगी यांना आदरांजली.

MAHESH YOGI(LEKH)
(प्रसिध्दी दिनांक 10 फेब्रुवारी 2008)
=====================================================

ओशो रजनीश यांच्या 75व्या जयंतीनिमित्त त्यांचा परिचय.

OSHO
(प्रसिध्दी दिनांक 11 डिसेंबर 2006)</big>
=====================================================

ओशोंच्या ध्यानयोगाची तोंडओळख करून देणारा लेख.

my article on OSHO
(प्रसिध्दी दिनांक 11 डिसेंबर 2007)

1 Comment

Leave a Comment