साहित्य

आत्म्याची आर्त हाक अल्ला हू…अल्ला हू…!

Written by shekhar patil

आज विश्‍वविख्यात दिवंगत सूफी गायक उस्ताद नुसरत फतेह अली खान यांच्या अत्यंत गाजलेल्या आणि माझ्या हृदयाला भिडलेल्या अल्ला हू…अल्ला हू या कव्वालीविषयी.

आज विश्‍वविख्यात दिवंगत सूफी गायक उस्ताद नुसरत फतेह अली खान यांच्या अत्यंत गाजलेल्या आणि माझ्या हृदयाला भिडलेल्या अल्लाहू…अल्लाहू या कव्वालीविषयी.

बहुतांश गाणी शरिराला आंदोलित करतात. संगीताचे हे पार्थिव रूप होय. आजचे लोकप्रिय वर्गवारीतील तसेच बहुतांश चित्रपट संगीतही याच प्रकारातील आहे. हे गाणे आपल्याला ठेका धरायला लावते. या गीत-संगीतामुळे आपल्या शरीर लहरी उत्तेजीत होतात. अर्थात ही ‘पॉप’ वर्गवारी. दुसरा प्रकार मनाच्या पातळीवरचा. हे संगीत आपल्या मनाला स्पर्श करते, आपल्याला भावविभोर करते. उत्तम गेयता, चपखल शब्द आणि तेवढ्याच तोलामोलाचे संगीत याची एकत्रित सरमिसळ असणारा हा प्रकार अभिजात म्हणून गणला जातो. तिसरा प्रकार आत्म्याला स्पर्श करणार्‍या संगीताचा. हे शरीर अन् मनाला नव्हे तर आपल्या थेट काळजाला स्पर्श करते. जगाच्या विविध भागांमध्ये डिव्होशनल, भक्तीसंगीत आदी नावांनी हे विपुल प्रमाणात आपल्याला आढळते. मात्र आज सूफी संगीतातील सरताज म्हणून ख्यात असणार्‍या गिताविषयी.

सूफी संगीताचा उल्लेख आल्याबरोबर उस्ताद नुसरत फतेह अली खान यांचीच पहिल्यांदा आठवण होते. तसे तर असंख्य गायकांनी सूफी कलामला आवाज दिला आहे. मात्र याचे बादशहा नुसरत फतेह अली खानच! त्यांनी आपल्या हयातीत शेकडो गाणी म्हटली आहेत. यापैकी किमान तीस-चाळीस मी अधून-मधून ऐकतो. मात्र यातील मुकुटमणी शोभणारे अर्थातच अल्ला हू…अल्ला हू हेच होय. खरं तर हे शेकडो वर्षांपासून म्हटले जाणारे पारंपरिक सूफी गीत आहे. याचे अनेक ‘व्हर्शन्स’ आहेत. याला डझनवारी गायकांनी म्हटले आहे. नुसरत यांच्या पश्‍चातही अनेकांनी म्हटलेय. मात्र त्यांच्याइतके याला कुणी न्याय दिला नाही हे निश्‍चित.

एखादे गाणे आपण कधी पहिल्यांदा ऐकले हे कुणाच्या लक्षात राहत नाही. मात्र आजही याला पहिल्यांदा अनुभवल्याचा प्रसंग माझ्यासमोर जसाचा तसा उभा आहे. मी अनेकदा पुणे येथील ‘ओशो कम्युन इंटरनॅशनल’मध्ये गेलोय. यातील पहिल्याच वारीत हा किस्सा घडला. दुपारचे भोजन आटोपल्यानंतर मी निवांतपणे ‘बुध्दा हॉल’च्या बाजूला फिरत होतो. त्या वेळेस मौनात असणार्‍या एका गौरवर्णीय प्रौढ व्यक्तीने माझे लक्ष वेधून घेतले. त्याच्यासोबत एक तरूण होता. मी त्याच्याशी वार्तालाप करू लागतो. ते दोन्ही जर्मनीतले असल्याचे कळले. मौनात असणारा व्यक्ती हा मोठा शास्त्रज्ञ असून तो तरूण त्याच्यासोबत आलेला होता. आता तो जर्मन तरूण आणि मी आम्हा दोघांचे इंग्रजी सारखेच ‘दिव्य’(!) असल्याने संवाद कसा तरी चालू होता. इतक्यात मला बाजूच्या ‘बुध्दा हॉल’मधून संगीताचे विचित्र सुर ऐकू आले. एखाद्या मैफिलीच्या प्रारंभी तबलची वगैरे मंडळी जशा प्रकारे वाद्यांचा मेळ बसविण्याचा प्रयत्न करतात तसे हे ध्वनी भासले. मात्र काही क्षणात थेट काळजाला भिडणारा गंभीर शब्द कानांवर आले अन् मीच नव्हे तर तो जर्मन तरूणही लागलीच हॉलमध्ये गेलो. आणि बघतो तो काय….

ओशो कम्युनमध्ये तेव्हा दुपारी साडेतीनला नादब्रह्म ध्यान सुरू होण्याआधी दररोज एखाद्या नवीन ध्यान प्रकाराचा डेमो दाखवला जात असे. त्या दिवशी नेमके ‘दरवेश व्हर्लींग’चे प्रात्यक्षिक होते. सूफी दरवेशी फकीर हा पारंपरिक विधी करतात. यातील प्रमुख भाग म्हणजे लहान मुलासारखा स्वत:भोवती गिरकी घेण्याचा असतो. आता गिरकीमध्ये आध्यात्मीक शक्ती असू शकेल यावर आपला विश्‍वास बसणार नाही. मात्र सूफी परंपरेत शेकडो वर्षांपासून या माध्यमातून दिव्यत्वाशी जुळण्याची साधना करण्यात येत आहे. यानुसार जवळपास पाच हजार साधकांच्या बसण्याची क्षमता असणार्‍या ‘बुध्दा हॉल’मध्ये सुमारे १०० स्त्री-पुरूष सुफी दरवेशींच्या वेशभुषेत उपस्थित होते. त्यांच्या भोवती माझ्यासह शेकडो लोक गोल रिंगण करून उभे होते. मी सभागृहात आल्यानंतरही ते गाणे अजून संथ गतीने पुढे सरकत होते. परिणामी प्रात्यक्षिक दाखविणारे साधकही हळूवारपणे स्वत:भोवती फिरत होते. मात्र अचानक गायकाने उच्च स्वरात अल्लाहू…अल्लाहू म्हटले अन् मी शहारलो. थेट आत्म्याचा भेद घेणारे बोल, संगीत आणि चाल तसेच समोर यावर गिरक्या घेणारे साधक मी अनिमिष नेत्रांनी पाहू लागलो. गायकाने उच्च स्वर गाठताच त्यांच्या गिरक्याही शिखरावर पोहचल्या. माझ्या संपुर्ण अस्तित्वाला भारून टाकणारे, मला मंत्रमुग्ध करणारे काहीतरी माझ्या समोर घडत होते. मी आपल्यासमोर ते शब्दात साकार करण्यास असमर्थ आहे. मात्र आयुष्यात प्रथमच मी असले काही तरी मानवी जीवनाच्या पलीकडील अनुभवत होतो. कदाचित ही माझ्या ‘ट्रान्स’ची स्थिती असेल. जणू काही उन्मनीच! गाणे लांबलचक असले तरी ते कधी थांबू नये असे वाटत होते. अर्थात जवळपास थोड्या वेळाने ते थांबले अन् गिरक्या घेणारे साधकही अलगदपणे जमीनवर कोसळले (खरं तर कोसळणे हा योग्य शब्द नव्हे…ते अगदी स्लो मोशनमध्ये जमीनीवर आले.) अर्थात मला भानावर येण्यासाठी बराच वेळ लागला. मी लागलीच ऑडिओचे संचलन करणार्‍यांकडे जात ते गाणे आणि गायकाविषयी माहिती विचारली. आता ते कदाचित अमेरिकन असल्याने मला त्यांचे उच्चार समजेना. दोन-तीनदा विचारल्यानंतर गाणे अल्लाहू आणि गायक नुसरत फतेह अली खान असे शब्द लक्षात आले. नंतर मी जळगाव-भुसावळमध्ये याचा शोध घेतला. नुसरत यांची दुसरी गाणी मिळाली तरी हे मिळत नव्हते. मात्र इंटरनेटवर मला ते गवसले. प्रारंभी संगणकावरच याचा आनंद घेतला. नंतर ते डाऊनलोडही केले. अर्थात आजवर असंख्य वेळेस या गीताला मी अनुभवले आहे.

यानंतर नुसरत फतेह अली खान हा माणूस किती मोठा होता याची जाणीव झाली. अर्थात ते आधीच परलोकी गेले होते. मात्र आपल्या पश्‍चात शेकडो अवीट गोडीच्या संगीताचा खजिना ठेवून गेल्याने त्यांनी मानव जातीवर खूप उपकार करून ठेवल्याची माझी भावना आहे. खरंतर उस्ताद नुसरत फतेह अली खान यांच्या या कव्वालीचे शब्द जितके सहजसोपे आहेत तितकाच अर्थही सुलभ आहे. यात ईश्‍वर हा जगातील सर्वशक्तीमान, परम दयाळू असल्याचे स्तुतीगान आहे. जगातील प्रत्येक भाषेत, प्रत्येक धर्मात या स्वरूपाची ईश्‍वराची आराधना आपल्याला आढळून येते. अल्लाह अर्थात परमेश्‍वर हा अनादी, अनंत, असीम, परम दयाळू, कृपावंत, सर्व चराचरांमध्ये असणारा, कालातीत, अजर-अमर, अविनाशी असल्याचे यात गीतात म्हटले आहे. ‘था भी तू…है भी तू… होगा भी तू ही तू’ या शब्दांमध्ये त्यांनी काळाचा समस्त अवकाश व्यापला आहे. यात अल्लाहचे स्तुतीगान आहे. यातील काही शब्दांचे अर्थ समजून घेण्यात मला खूप अडचणी आल्या. मात्र शब्दांच्या व भावाच्या पलीकडचे हे गीत असल्याचे मला वाटते. कव्वाली हा तसा सामूहिक प्रकार आहे. यामुळे उस्तादजींच्या या गीताच्या यशात त्यांच्या सहकार्‍यांचाही मोलाचा वाटा आहे. सगळी भट्टी अगदी व्यवस्थित जमून आली आहे. हेच गीत अन्य गायकांच्या आवाजातही मी ऐकून पाहिले मात्र मजा आली नाही. खुद्द नुसरत यांनी याची संक्षिप्त आवृत्तीदेखील गायली असली तरी मात्र यात मुळ गाण्याचा गोडवा हरवला आहे. बॉलिवुडवाली मंडळी जगभरातील संगिताची उचलेगिरी करण्यासाठी कुख्यात आहे. नुसरत यांची काही गितेही त्यांनी चोरली. मात्र ही उचलेगिरी अत्यंत निकृष्ट दर्जाची होती. उस्तादजींचे नितांतसुंदर ‘ये जो हलका हलका सुरूर है’ हे गाणे तर अगदी शब्दांसहीत घेण्यात आले. तर अल्लाहू…अल्लाहू हे ‘डिव्होशनल’ गाणे आय लव्ह यू…आय लव्ह यू या थिल्लर रूपात अवतरले. याच प्रमाणे ‘मेरा पिया घर आया’ आदींसह अनेक चालीही उचलण्यात आल्या. नव्वदच्या दशकात नुसरत फतेह अली खान हेच खुद्द बॉलिवुडमध्ये आल्याने ही उचलेगिरी थांबली.

खरं तर मी ऑफिसमध्ये सहकार्‍यांसोबत खूप गाणी ऐकतो. मात्र ही कव्वाली कधी लावत नाही. कारण आपली ही आवड इतरांसाठी ‘भयंकर’ ठरू नाही याची काळजी घेणे भाग आहे. यातील विनोदाचा भाग सोडून दिला तरी एकदम मस्तपैकी फुरसत असतांनाच ‘अल्ला हू’ ऐकणे उत्तम. आजही मी एकट्याने, वडिलांसोबत (त्यांनाही हे गाणे प्रचंड आवडते.) वा मोजक्या मित्रांसोबत याचा आनंद घेतो. अर्थात आई, पत्नी आणि बच्चे कंपनी तेव्हा माझ्याकडे फिरकतही नाही हे सांगायला हवे का? माझ्या काही मित्रांनी इस्लामी गाणे ऐकल्याबद्दल नापसंतीही दर्शविली. मात्र अभंगांसह भक्तीसंगीताचे विविध प्रकार, ख्रिस्ती संगीत, बुध्दीस्ट चांट, शबद-कीर्तन आदी सवर्र् आवडते तर इस्लामी का नको? या माझ्या प्रश्‍नावर ते निरूत्तर होतात. कुणासाठी अल्ला असो गॉड असो की परमेश्‍वर! मला याच्याशी काही देणेघेणे नाही. जे आपल्याला कुठे तरी स्पर्श करते ते पहावे, ते ऐकावे, त्याचेच वाचन करावे व त्याचविषयी बोलावे ही कृतार्थ आयुष्याची माझी सोपी व्याख्या आहे. असो.

सूफी हा इस्लाममधील भक्तीमार्ग. अगदी आपल्याकडच्या भक्ती संप्रदायाप्रमाणे. मात्र याचा कल काहीसह रहस्यवादाकडे (मिस्टिसीझम) आहे. मध्यपुर्वेतील राष्ट्रांसह भारतीय उपखंडात तो बहरला. खरं तर इस्लामच्या शुध्द रूपाचा आग्रह धरणारे सूफी संप्रदायाला प्रारंभीपासूनच नाके मुरडत आहेत. विशेषत: या संप्रदायात संगीत हा परमतत्वाकडे पोहचण्याचा मार्ग आहे. तसेच यात दर्गे, मजार आदींना महत्व असून यालाही विरोध होत असतो. जगभरात वहाबी चळवळ जोर पकडत असतांना सूफी हे ‘अँटी इस्लामी’ असल्याची भावना बळावू लागली आहे. याला मुलतत्ववादाने खतपाणी घातले आहे. पाकिस्तानात गेल्या दहा वर्षांपासून अनेक सूफी स्थळांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. सध्या सिरीया आणि इराकमध्ये ‘इसीस’ ही दहशतवादी संघटनाही सुफींचे मजार आणि दर्ग्यांना उडवत आहेत. यामुळे सूफींचा भविष्यकाळ हा कठीण वाटत आहे. अर्थात भारतासह जगातील अन्य राष्ट्रांमध्ये तरी सूफींना अद्याप कोणताही धोका नाही. अर्थात मन्सूर, राबिया, जलालुद्दीन रूमी, मोईनुद्दीन चिश्ती, निजामुद्दीन औलिया, मुल्ला नसरूद्दीन, शम्स तबरेजी, शाहबाज कलंदर आदींपासून अविरत चालत आलेला हा वारसा सहजासहजी नष्ट होईल असे वाटत नाही. अलीकडच्या काळात सूफी गायनाला अमाप लोकप्रियता मिळाली आहे. चित्रपटांमध्ये खुद्द उस्ताद नुसरत यांच्यासह त्यांचा पुतण्या राहत फतेह अली खान, कैलाश खेर आदी मंडळींमुळे हा प्रकार लोकप्रिय झालाय. याशिवाय, साबरी बंधू, आबीदा परवीन, आदी मातब्बरांह अन्य काही गायकांनीही सुफीयाना कलाम लोकप्रिय केलाय. मात्र यात आजही अव्वल आहेत उस्ताद नुसरत फतेह अली खान. त्यांची डझनवारी गाणी लोकप्रिय आहेत. यात दमादम मस्त कलंदर, तुम एक गोरखधंदा, किन्ना सोना, ये जो हलका सुरूर आदींचा समावेश आहे. मात्र सूफी विचाराची परिपुर्ण अभिव्यक्ती अल्लाहू मध्येच आहे. अलीकडेच पिएर ऍलन बॉड यांचे उस्तादजींच्या जीवनावर ‘व्हाईस ऑफ फेथ’ या नावाने पुस्तक आले आहे. मी ते अद्याप वाचले नसले तरी मला याचे नाव फार समर्पक वाटले. खरंच नुसरतजींचा आवाज हा ‘श्रध्देचा’ आहे. सूफी उपमेचा वापर करायचा झाल्यास ‘रूहानी’! अर्थात त्यांची अल्लाहबाबतची ही आळवणी ही माझ्या मते आत्म्याची आर्त हाकच आहे.

अल्लाहू संपुर्ण गीत

मालि-उल-मुल्क लाशरीका लाहू
वाहदा हू ला इलाहा इल्लाहू
शम्स तबरेज गर खुदा तलबी
खुशबू ख्वान ला इलाहा इल्लाहू

क्युनका मसजूद है माबूद है तू
हर शय तेरी शाहीद के मशहूद है तू
हर एक के लब पर है तरी हम्द-ओ-सना
हर सोज मे हर साज मे मौजूद है तू

तेरे ही नाम पे सब इप्तिदा है
तेरे ही नाम पे सब इंतेहा है
तेरी हम्द-ओ-सना अल्हमदुलील्लाह
की तू मेरे मुहंमद का खुदा है

अल्ला हू अल्ला हू अल्ला हू
अल्ला हू अल्ला हू अल्ला हू

ये जमी जब ना थी ये जहा जब ना था
चांद सुरज ना थे आसमॉं जब ना था
राज-ए-एक भी किसी पर अयां जब ना था
तब ना था कुछ यहा था मगर तू ही तू

अल्ला हू अल्ला हू अल्ला हू
अल्ला हू अल्ला हू अल्ला हू

पहुचे मैराज मे अर्श पर मुस्तफा
जब ना माबूद-ओ-बंदे मे पर्दा रहा
तब मलाईक ने हजरत से झुक कर कहा
सारी माखलूक मे हकनुमा तू ही तू

अल्ला हू अल्ला हू अल्ला हू
अल्ला हू अल्ला हू अल्ला हू

क्यू पिया इब्न-ए-हैदर ने जाम-ए-फना
खाल खिचवाई तबरेज ने क्यू भला
दर पे चढकर मन्सूर ने क्या कहा
सब बनाता खिलौने ला रहा तू ही तू

अल्ला हू अल्ला हू अल्ला हू
अल्ला हू अल्ला हू अल्ला हू

हर शय तेरी जमाल की आईना दार है
हर शय पुकारती है तू परवरदिगार है

अल्ला हू अल्ला हू अल्ला हू
अल्ला हू अल्ला हू अल्ला हू

तेरी रूबीयत की अदा का कमाल है
तू रब-ए-कायनात है, तू लाजवाल है

तू जो हर आन नयी शाम दिखा देता है
दिदा-ए-शौक को हैरान बना देता है
डाली डाली तेरी तकलीक के गुन गाती है
पत्ता पत्ता तेरी कुदरत का पता देता है

अल्ला हू अल्ला हू अल्ला हू
अल्ला हू अल्ला हू अल्ला हू

ला ईलाहा तेरी शान या वाहदाहू
तू खयाल-ओ-तकद्दुस तू है आरजू
आंख की रोशनी दिल की आवाज तू
था भी तू! है भी तू‘ होंगा भी तू ही तू!

अल्ला हू अल्ला हू अल्ला हू
अल्ला हू अल्ला हू अल्ला हू

खालिक-ए-कुल है तू इस मे किया गुप्फगू
सारे आलम को है तेरी ही जुस्तजू
तेरी जलवागिरी है अयान चार सू
ला शरीका लाहू मालिक-ए-मुल्क तू

अल्ला हू अल्ला हू अल्ला हू
अल्ला हू अल्ला हू अल्ला हू

nusrat1

About the author

shekhar patil

Leave a Comment