चालू घडामोडी विज्ञान-तंत्रज्ञान

आत्ममुग्धतेतील विकृती

तंत्रज्ञानाचा वापर हा दुधारी तलवारीसारखा आहे. याच प्रकारे ‘सेल्फी’ अर्थात स्वत:ने स्वत:चे काढलेले छायाचित्र या प्रकाराची भयावहता अधोरेखित करणार्‍या काही घटना आपल्या भोवती घडत आहेत.

तंत्रज्ञानातील काही बाबींचा वापर हा दुधारी तलवारीसारखा आहे. उपयुक्तता तर आहेच पण आपल्या स्वत:ला इजा पोहचण्याचीदेखील भिती असते. याच प्रकारे ‘सेल्फी’ अर्थात स्वत:ने स्वत:चे काढलेले छायाचित्र या प्रकाराची भयावहता अधोरेखित करणार्‍या काही घटना आपल्या भोवती घडत आहेत. सोशल मीडियाने तुम्हा-आम्हा सर्वांना घट्ट विळखा घातला आहे. प्रत्येक क्षणाचे अपडेटस् जगाला देण्याचा हव्यास वाढीस लागत आहे. यात सारासारविवेक सर्रास गुंडाळून ठेवण्यात येत आहे. यातून वाढीस लागणारी मनोरूग्णता आणि त्यातून होणार्‍या दुर्घटना जगाच्या कान्याकोपर्‍यात घडत आहेत. परवाच नागपुरातील सात तरूण होडीत सेल्फी काढण्याच्या नादात जीव गमावून बसले. यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जगातील पहिला सेल्फी.

जगातील पहिला सेल्फी.

खरं पाहिले तर सेल्फी काढणे हे मानवाच्या आदीम प्रवृत्तीशी सुसंगत असेच आहे. आपले प्रतिबिंब मानवाला खुप आवडते. अगदी प्राचीन काळात पाण्यात मानव डोकावून पाहत होता. सुमारे आठ हजार वर्षांपासून आरसा हा मानवी संस्कृतीचा अविभाज्य घटक बनला आहे. तो आपल्या भाव जीवनाशी एकरूप झाला आहे. आरशावर आसक्ती नसणारा विरळाच. आता आरशासमानच मानवी जीवनाला वेड लागलेय ते सेल्फीचे! हा शब्द अलीकडेच प्रचलित झाला असला तरी या छायाचित्रांचा प्रकार हा खूप जुना आहे. म्हणजे फोटोग्राफीचे तंत्रज्ञान बाल्यावस्थेत असतांनाही या प्रकारची छायाचित्रे काढण्यात आली आहेत. आजच्या तब्बल १७५ वर्षांपुर्वी अर्थात १८३९ साली जगातील पहिला सेल्फी काढल्याची नोंद आहे. या वर्षाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात फिलाडेल्फियातल्या रॉबर्ट कॉर्नेलियस हा ३० वर्षीय तरूण त्या काळात असणार्‍या कॅमेर्‍याचे लेन्स काढून कॅमेर्‍याच्या समोर जाऊन बसला. अर्थात त्या काळातील कॅमेरे इतके हळू प्रोसेसिंग करत की त्याला यासाठी जराही धावपळ करावी लागली नाही. यानंतर पाच मिनिटांनी त्याचे छायाचित्र काढण्यात आले. हाच जगातील पहिला ‘सेल्फी’ असल्याचे मानले जाते. तेव्हापासून विविध प्रकारांनी असल्या प्रकारची छायाचित्रे काढण्यात आली. विसाव्या शतकाच्या पुर्वार्धात आरशात विशिष्ट कोनातून उभे राहून स्वत:चे छायाचित्र काढण्याची पध्दती लोकप्रिय झाली. तर उत्तरार्धात टायमरयुक्त कॅमेरे तयार करण्यात आले. एका अर्थाने फोटोग्राफी तंत्रज्ञानाच्या उदयापासूनच सेल्फी काढण्यात येत आहेत. मात्र या प्रकाराला खरी लोकप्रियता मिळाली ती एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी. २००२ साली ‘एबीसी ऑनलाईन’ या ऑस्ट्रेलियन इंटरनेट फोरमवर सर्वप्रथम सेल्फी हा शब्द अवतरला. यानंतर काही वर्षातच हा शब्द लोकप्रिय झाला.

‘मायस्पेस’ या प्रारंभीच्या काळातील सोशल नेटवर्कींग साईटचे अपयश मोठ्या प्रमाणात चर्चीले गेले. इंटरनेटच्या इतिहासात ही महत्वाची घटना मानली जाते. अर्थात ‘मायस्पेस’ अयशस्वी झाले तरी सेल्फी छायाचित्रे स्वत:च्या प्रोफाईलवर लावण्याचा ट्रेंड मात्र याच साईटने सुरू केला. यथावकाश फेसबुकची घोडदौड सुरू झाली ती आजवर अबाधित आहे. स्मार्टफोनच्या आगमनानंतर व्हाटसऍप, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट आदी ऍप्लीकेशन्सनी धमाल उडवली. अर्थात सेल्फीचीही धमाल सुरू झाली. ‘आयफोन-फोर’ आणि ‘सॅमसंग गॅलेक्सी’ या स्मार्टफोन्समध्ये समोरील बाजूने कॅमेरा आल्यानंतर तर हे खुळ जगभरात पसरले. आज कोणत्याही स्मार्टफोनमध्ये सेल्फी घेण्यासाठी समोरच्या बाजूला असणारा कॅमेरा हा उत्तम प्रतिचा असणे आवश्यक मानले जाते. काही स्मार्टफोन्स तर खास याच्याचसाठी तयार करण्यात आले आहेत. तसेच उत्तम अँगल मिळावा म्हणून खास ब्ल्यु-टुथ कनेक्टीव्हिटी असणार्‍या स्टीक आता वापरण्यात येत आहेत. एवढेच नव्हे तर ड्रोन्सच्या मदतीने सेल्फी काढण्याचे तंत्रही विकसित करण्यात आले आहे. आता याचे प्रकारही पडले आहेत. म्हणजे कुणी कुत्र्यासोबत छायाचित्र काढतोय, कुणी जीममध्ये, कुणी दारूची झिंग चढल्यानंतर, कुणी सेलिब्रिटीजसोबत, कुणी मागच्या बाजूने तर कुणी ‘टॉपलेस’ आता व्यक्ती तितक्या प्रकृती यानुसार याचेही अनेक प्रकार पडले असून यात नवनवीन प्रकारांची भर पडतच आहे. बरं असल्या प्रकारच्या छायाचित्रांची भुरळ ही विविध स्तरांमधील लोकांना पडली आहे. रावापासून ते रंकापर्यंत प्रत्येकाला ‘सेल्फी’ काढण्याची घाई झालीय. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासारख्या जगातील सर्वाधीक शक्ती हातात असणार्‍या व्यक्तीलाही याचा मोह आवरला जात नाही. आपल्याकडे मोदींचा मतदान केल्यानंतरचे ‘ते’ छायाचित्र भलतेच गाजले होते. विविध क्षेत्रांमधील सेलिब्रिटीजपासून ते सर्वसामान्य माणसेही याच्याच प्रेमात पडले आहेत. आता या छायाचित्रांसाठी उत्तमोत्तम स्मार्टफोन, वेबकॅम आदी उपलब्ध आहेत. यावर प्रोसेस करून याला तातडीने शेअर करण्यासाठी सोशल साईट/ ऍप्लीकेशन्सही आहेत. मात्र याच्या अतिरेकाने अनेक विकृतींनाही आमंत्रण मिळाले आहे.

आपल्या काकाच्या मृतदेहासोबत सेल्फी काढणारा तरूण.

आपल्या काकाच्या मृतदेहासोबत सेल्फी काढणारा तरूण.

कुणी कितीही नाकारो-सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या अतिवापराने मानसिक विकार वाढीस लागले आहेत. याला सेल्फीचाही अपवाद नाही. याचा विपुल प्रमाणात वापर करणे ही एक प्रकारची मनोरूग्णता असल्याचे मानले जात आहे. जगभरात अशा अनेक घटना घडतांना आपल्याला दिसून येत आहेत. गेल्या महिन्यातच श्रीलंकेच्या जाफना शहरातील उदाई राय या तामिळ युवकाने आपल्या काकाच्या मृतदेहासोबतचा सेल्फी सोशल साईटवर अपलोड केल्यामुळे खळबळ उडाली होती. एखाद्याच्या मृत्युचे असे उथळ प्रदर्शन का? असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. मात्र आपण त्यांच्या मृत्युमळे दु:खी झालो असल्याने याचे प्रदर्शन करण्यात गैर काय? असा प्रतिप्रश्‍न उदाईने केला होता. अर्थात फेसबुकवरून त्याने हे छायाचित्र काढून टाकले तरी यामुळे नवीन वादाला तोंड फुटले. गेल्याच आठवड्यात अमेरिकेतील इसाक मार्टीनेझ या वेटरच्या खांद्याला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. अमेरिकेत ९११ या क्रमांकावर डायल करून रूग्णवाहिकेसह तातडीची सेवा मिळते. मात्र या पठ्ठ्याने गोळी लागल्यानंतर रूग्णवाहिका बोलावण्याआधी आपल्या स्मार्टफोनमधून रक्तबंबाळ अवस्थेत असतांनाही हसर्‍या चेहर्‍याने स्वत:चे छायाचित्र काढून ते ‘स्नॅपचॅट’द्वारे आपल्या मित्रांना पाठविले. यावरच न थांबता रूग्णालयात दाखल होईपर्यंत त्याने आपले ‘स्टेटस’ अपडेट केले. ब्रिटनमधील डॅनी बोमन या युवकाने स्वत:चे परिपुर्ण छायाचित्र काढण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतले. दररोज सुमारे दहा तास आणि दोनशे सेल्फीज घेऊनही समाधान न झाल्यामुळे त्याने चक्क आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच उपचार मिळाल्याने तो वाचला तरी या प्रकाराने ब्रिटीश समाजमन चिंतीत झालेय. अरे चांगला फोटो निघाला नाही म्हणून आत्महत्या? काय म्हणणार यावर…अर्थात अशा स्वरूपाच्या दुर्घटना शेकडोंनी घडल्या आहेत. सांगणार तरी किती?

गोळी लागल्यानंतर सेल्फी काढणारा बहाद्दर...

गोळी लागल्यानंतर सेल्फी काढणारा बहाद्दर…

आज सेल्फी हा ‘ट्रेंड’ आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीने त्याला २०१३ सालीच ‘वर्ड ऑफ द इयर’चा सन्मान देत अधिकृत मान्यता दिलीय. अत्याधुनिक डिजीटल युगात सेल्फी हा स्वत:ला प्रोजेक्ट करण्याचा सर्वात सोपा तितकाच परिणामकारक घटक बनलाय. सेल्फीज प्रत्येक ठिकाणी काढल्या जात आहेत. जमीनीवर, आकाशात, पाण्यात, अवकाशात, सरकारी कार्यालयात, खासगी जागेत, प्राणी संग्रहालयात, स्मशानात, क्रिडांगणांवर असे कोणतेही स्थान नसेल जेथे ‘सेल्फी’ काढले जात नाही. भविष्यात व्हिडीओ सेल्फीज, पॅनारॉमीक सेल्फीज आदींचे युग येण्याची भाकित करण्यात आलेली आहेत. ‘ऑग्युमेंटेड रिऍलिटी’, ‘व्हर्च्युअल रिऍलिटी’, ‘वेअरेबल्स’, ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ आदी तंत्रज्ञान या प्रकाराला कुठल्या कुठे नेवून ठेवणार आहेत. मात्र याचा वापर विवेकानेच करणे आवश्यक आहे. अन्यथा सेल्फी आणि त्याच्या हव्यासातून येणारी विकृती आणि यातून घडणार्‍या दुर्घटना टाळता येणे अशक्य आहे.

पहा निवडक चित्रविचीत्र सेल्फीज…

selfie12

selfie11

selfie10

selfie9

selfie8

selfie7

selfie5

selfie2

About the author

shekhar patil

Leave a Comment