क्रीडा चालू घडामोडी

आता लेकीच तारणहार

साक्षी वा पी.व्ही. सिंधूच नव्हे तर या ऑलिंपीकमध्ये दीपा कर्माकर, ललिता बाबर आदींना पदक मिळाले नसले तरी त्यांनी आपल्या खेळाने कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली आहेत.

ऑलिंपीकमधील भारतीय चमूची सुमार कामगिरी विनोदाचा विषय झालेला असतांनाच साक्षी मलिक या तरूणीने कुस्तीत कांस्यपदक जिंकून तर पी.व्ही. सिंधूने उपांत्य फेरीत धडक मारल्यामुळे या अपयशाच्या गडद अध्यायाला चंदेरी किनार लाभली आहे असे म्हणणे सार्थ ठरणार आहे.

दहावी, बारावीच नव्हे तर इतरही परिक्षांचा निकाल लागल्यानंतर आपण बहुतांश प्रसंगी ‘पुन्हा मुलींचे वर्चस्व’ या आशयाच्या बातम्या प्रसारमाध्यांमध्ये वाचत असतो. महिलांनी केव्हाच बौध्दीक क्षेत्रात पुरूषांना जोरदार टक्कर दिलेली असतांना आता ऑलिंपीकमध्ये साक्षी मलिकचे तेजस्वी यश नव्या युगाची नांदी ठरो हीच कोट्यवधी भारतीयांची अपेक्षा आहे. भारतीय समाजातील सरंजामशाहीचे अत्यंत टोकाचे प्रतिक म्हणून हरियाणातील जाट समुदाय ओळखला जातो. पुरूषप्रधान समाजव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देणार्‍या या समाजात कन्या जन्माला येणे म्हणजे जणू काही अपशकुनच समजला जातो. यामुळे या समाजातील मुलींचे प्रमाण हे देशात सर्वात कमी आहे. यामुळे त्यांच्यात अनेक सामाजिक समस्यादेखील निर्माण झाल्या आहेत. मात्र याच समुदायातील सायना नेहवाल आणि आता साक्षी मलिक यांच्यासारख्या कन्यांनी आपल्या तेजस्वी कामगिरीने अवघ्या जगाला दिपवून टाकले आहे. खुद्द सायना नेहवाल हिने आपण समाजात ‘नकोशी’ असल्याने भोगाव्या लागलेल्या वेदना जाहीरपणे बोलून दाखविल्या आहेत. या पार्श्‍वभुमिवर जाट कन्यांचे यश हे अधिक उज्ज्वल भासणारे आहे. माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग हा अलीकडच्या काळात अतिशय सारगर्भ ट्विट करण्यासाठी ख्यात झाला आहे. आज सकाळीच त्याने “पुरा भारत इस बात का साक्षी है, जब कोई बहोत मुश्कील है; तो देश की लडकीया ही मालिक है!” हे केलेले ट्विट साक्षीच्या यशाला अगदी समर्पकरित्या व्यक्त करणारे ठरले आहे. आणि हो साक्षी वा पी.व्ही. सिंधूच नव्हे तर या ऑलिंपीकमध्ये दीपा कर्माकर, ललिता बाबर आदींना पदक मिळाले नसले तरी त्यांनी आपल्या खेळाने कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली आहेत.

भारताच्या ऑलिंपीकमधील अतिसुमार कामगिरीमागे अनेक बाबी आहेत. यासाठी अगदी आंतरराष्ट्रीय मानकाशी सुसंगत अशा पायाभूत सुविधांच्या अभावांपासून ते क्रीडा संघटनांमधील भ्रष्टाचारापर्यंतची अनेक कारणे आपल्याला सांगता येतील. मात्र महिलांचा विचार करता त्यांना या सर्वांसोबतच पुरूषी जाचाच्या अनेक भयावह प्रकारांना तोंड द्यावे लागते. मध्यंतरी उघडकीस आलेले महिला हॉकी संघाचे ‘सेक्स स्कँडल’ हे या भयंकर प्रकारातील हिमनगाचे टोक मानावे लागणार आहे. राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकाविरूध्द ३१ खेळाडूंनी लेखी तक्रार करूनही या प्रकरणाचे पुढे काय झाले याचा देशवासियांना थांगपत्ताच लागला नाही. हॉकीच नव्हे तर अन्य विविध खेळांमध्ये अनेक गरीब कुटुंबांमधील तरूणींचा समावेश असून त्या तर बिचार्‍या याबाबत आवाजदेखील उठवू शकत नाहीत. यातच आपला समाज जणू काही हे होणारच या मानसिकतेचा असल्यामुळे कुणाला याचे गांभिर्यदेखील वाटत नाही ही शोकांतिका आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाची माजी कर्णधार सोना चौधरी हिने धाडस दाखवत या संतापजनक प्रकारांचा पर्दाफाश केला आहे. फुटबॉल संघाच्या कोचसह क्रीडा संघटनेचे पदाधिकारी व अधिकारी शारिरीक शोषण करतील भितीने आपल्या बहुतांश सहकारी आपण समलैंगिक अर्थात ‘लेस्बीयन’ असल्याचे मुद्दाम भासवत असल्याची बाबही तिने जगासमोर आणल्यामुळे खळबळ उडाली होती. आता इतक्या भयंकर वातावरणात राहणार्‍या तरूणी मैदानावरील आव्हानांचा प्रतिकार तरी कशा करणार? अनेकदा या बाबी चव्हाट्यावर आल्या तरी काही काळ चर्वण होण्यापलीकडे काहीही उपाय करण्यात येत नाहीत. या पार्श्‍वभुमिवर असंख्य अडथळ्यांवर मात करत कुणी मल्लेश्‍वरी, सायना, मेरी आणि आता साक्षी व सिंधूसारख्या तरूणी जेव्हा यश मिळवतात तेव्हा त्यांना खरंच मानाचा मुजरा करावासा वाटतो. त्यांच्या यशासमोर नतमस्तक व्हावेसे वाटते. कारण त्यांनी फक्त मैदानावरच प्रतिस्पर्ध्यांविरूध्द बाजी मारलेली नसते तर खेळण्यासाठी घराबाहेर पडण्यापासून भारतीय पुरूषी अहंकाराला त्या पुरून उरलेल्या असतात. प्रश्‍नार्थक चेहरे, कुजकट टोमणे, वखवखलेल्या नजरा, बदनामकारक कुजबूज आणि थेट शारिरीक शोषणासाठी टपून असणार्‍या प्रवृत्तींवर त्यांनी मात केलेली असते.

विख्यात पत्रकार आकार पटेल यांनी रिओ ऑलिंपीकमधील अपयशाबाबत विश्‍लेषण करतांना एक उत्तम मुद्दा मांडला आहे. त्यांच्या मते कुणा बाह्य घटकांमुळे नव्हे तर ऐदी, सुस्त, सरंजामी व सर्वात महत्वाचे म्हणजे श्रमाला अजिबात थारा व सन्मान नसणार्‍या संस्कृतीमुळेच भारत ऑलिंपिकसह अन्य आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये नेहमी भुईसपाट होत असतो. आता याच संस्कृतीतील सर्वात शोषित घटक असणार्‍या भारतीय महिलाच देशाच्या लज्जारक्षणासाठी पुढे सरसावल्या आहेत ही बाबदेखील आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. तेव्हा सेहवाग म्हणतो त्यात काय चुकीच आहे? होय…भारताच्या कन्याच आता या देशाच्या क्रीडा क्षेत्राच्या(ही) तारणहार आहेत. या युगांतराला आपण सर्वजण ‘साक्षी’ आहोतच.

sakshi_malik

About the author

shekhar patil

Leave a Comment