क्रीडा

आता रंगणार खरा मुकाबला !

‘आयसीसी’ने फलंदाजी करणार्‍या संघाला मिळणारा ‘पॉवर प्ले’ रद्द करत या नियमात बदल करून गोलंदाजांचा दिलासा दिला आहे. यामुळे क्रिकेट खर्‍या अर्थाने रंगतदार होण्याची शक्यता आहे.

क्रिकेट हा खरं तर फलंदाजांचा खेळ म्हणून ख्यात झाला आहे. आजही महान क्रिकेटपटूंच्या नावांमध्ये बहुतांश बॅटसमनचीच नावे येतात. गोलंदाजास आधीच दुय्यम स्थान असतांना काही नियम त्यांच्या मुळावर येत होते. यापैकी एक म्हणजे ‘पॉवर प्ले’ होय. आता मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ‘आयसीसी’ने फलंदाजी करणार्‍या संघाला मिळणारा ‘पॉवर प्ले’ रद्द करत या नियमात बदल करून गोलंदाजांचा दिलासा दिला आहे. यामुळे मैदानावर फलंदाजांइतकीच गोलंदाजांनाही संधी मिळणार असल्याने क्रिकेटचा खेळ खर्‍या अर्थाने रंगतदार होण्याची शक्यता आहे.

सत्तरच्या दशकाच्या प्रारंभी आंतरराष्ट्रीय पातळीवर एकदिवसीय क्रिकेट सामने सुरू झाले. प्रारंभी साठ षटकांचे सामने आयोजित करण्यात आले. १९७५ पासून याचा विश्‍वचषकही सुरू झाला. असे असले तरी यातील बहुतांश सामने तसे रटाळच होत असत. यातील एका सामन्यात ‘लिटील मास्टर’ सुनील गावस्कर यांनी तब्बल ६० षटके खेळून काढत नाबाद ३६ धावा केल्याचा अनोखा विक्रमही केला. नाही म्हणायला व्हिवीयन रिचर्डसारख्या फलंदाजांनी या सामन्यांमध्ये काही प्रमाणात तरी रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र असे असूनही म्हटला तेवढा परिणाम साधला जात नव्हता. यातच हरहुन्नरी ऑस्ट्रेलियन उद्योगपती कॅरी पॅकर यांच्या ‘वर्ल्ड सेरीज’मध्ये एक अनोखा नियम लागू करण्यात आला. यात कोणत्याही गोलंदाजी करणार्‍या संघाला सुरवातीच्या षटकांमध्ये ३० यार्ड सर्कलमध्ये बहुतांश खेळाडू उभे करावा असा नियम होता. यात पहिल्या १५ षटकांमध्ये रिंगणाबाहेर फक्त दोन क्षेत्ररक्षक ठेवण्याची अट घालण्यात आली होती. यानंतर उर्वरित षटकांमध्ये या सर्कलबाहेर पाच क्षेत्ररक्षक ठेवता येत होते. यामुळे यातील सामन्यांमध्ये धावांचा रतीब पडण्यास सुरूवात झाली. अर्थात या सामन्यांना उदंड प्रतिसाद मिळू लागला. यथावकाश ‘पॅकर सर्कस’ संपुष्टात आली तरी एक दिवसीय आंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये हाच नियम लागू करण्यात आला. अर्थात याचा अत्यंत अनुकुल परिणाम दिसून येत धावांचे प्रमाण वाढत ‘वन-डे’ची लोकप्रियताही वाढली.

नव्वदच्या दशकात क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आला. यामुळे हा खेळ अजून रंजक अर्थात प्रेक्षणीय करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. परिणाम १९९६चा विश्‍वचषक सुरू होण्याआधी ‘पॉवर प्ले’च्या नियमात अजून एक बदल करत दोन क्षेत्ररक्षकांना कॅचिंग पोझिशनमध्ये म्हणजेच १५ यार्डच्या आत उभे राहणे बंधनकारक करण्यात आले. अर्थात हा बदल फलंदाजांच्या पथ्यावर पडला. याच विश्‍वचषकात श्रीलंकेच्या सनत जयसुर्या आणि रोमेश कालुवितरणा या जोडीने ‘पॉवर प्ले’च्या पहिल्याच १५ षटकांमध्ये जोरदार टोलेबाजी करत झटपट धावसंख्या उभारण्याचा ट्रेंड आणला. या षटकांमध्ये बाऊंड्रीवर फक्त दोन क्षेत्ररक्षक असल्याचा फायदा उचलत त्यांनी उंच फटके मारण्यास प्रारंभ केला. श्रीलंकेने हा विश्‍वचषक पटकावला. यात या जोडीने चांगली सुरवात करून दिल्याचा मोठा वाटा होता. यथावकाश प्रत्येक क्रिकेट संघाने हीच रणनिती आखली. आता तर वन-डे सामन्यात विजय मिळवण्याचा हा राजमार्ग मानला जातो.

‘आयसीसी’ने एकविसाव्या शतकात या नियमात अजून बदल केला. यानुसार पहिल्या दहा षटकात अनिवार्यपणे ‘पॉवर प्ले’ कायम ठेवण्यात आला. यानंतर फलंदाजी करणारा व गोलंदाजी करणार्‍या संघाला प्रत्येकी पाच षटकांच्या ‘पॉवर प्ले’ निवडण्याची मुभा देण्यात आली. परिणामी ११ ते ५०व्या षटकांच्या दरम्यान हे दोन्ही संघ आपल्याला अनुकुल स्थिती पाहून हवा तेव्हा ‘पॉवर प्ले’ निवडू शकत होते. अर्थात एकदा याचा निर्णय घेतल्यानंतर लागोपाठ पाच षटके त्याच पध्दतीने खेळणे भाग होते. यातच ४१ ते ५० षटकांदरम्यान ३० यार्डाच्या सर्कलबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षक उभे करण्याची मुभा होती. याचा एकदिवसीय सामन्यांवर अत्यंत व्यापक परिणाम झाला. यामुळे फलंदाजांची बाजू अत्यंत भक्कम झाली. तब्बल २० षटके बाऊंड्री मोकळी झाल्यामुळे फलंदाज टोलेबाजी करून धावांचा वर्षाव करू लागले. आधी तीनशे धावांचा टप्पा खूप मोठा मानला जात असे. तो आता खूप कमी वाटायला लागला. चारशेचा टप्पाही फलंदाजांना सोपा वाटायला लागला. मात्र यात मरण झाले ते गोलंदाजांचे!

 ‘पॉवर प्ले’नुसार लावलेले क्षेत्ररक्षण- छायाचित्र आंतरजालावरून साभार


‘पॉवर प्ले’नुसार लावलेले क्षेत्ररक्षण- छायाचित्र आंतरजालावरून साभार

क्रिकेटमध्ये खरं तर अलीकडच्या काळात गोलंदाजांचे आधीच खूप हाल होते. भारतीय उपखंडात तर गोलंदाजांचा अक्षरश: कस काढणार्‍या ‘पाटा’ खेळपट्टया तयार करण्यात येतात. खेळपट्टीवर गवत तर कधी दिसतच नसल्याचे जलद गोलंदाजांना जराही लाभ मिळत नाही. तसेच फिरकीसाठीही फारशी अनुकुल स्थिती नसते. आधीच गोलंदाजांच्या बाऊन्सर्सवर मर्यादा टाकण्यात आली आहे. यातच अत्यंत संथ खेळपट्टया आणि ‘पॉवर प्ले’सारख्या अन्यायकारक नियमांमुळे जवळपास प्रत्येक सामन्यात धावांचा जोरदार वर्षाव होऊ लागला तरी यातून क्रिकेटचा निखळ आनंद लोप पावत असल्याची प्रतिक्रिया अलीकडे उमटू लागली होती. यामुळे फलंदाजधार्जिण्या ‘पॉवर प्ले’च्या नियमात बदल करण्यासाठी भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीने केलेल्या शिफारसीवरून ‘पॉवर प्ले’मधील अन्यायकारक तरतुदी काढून टाकण्यात आल्या आहेत. नवीन नियमानुसार फलंदाजी करणार्‍या संघाला मिळणारा ‘पॉवर प्ले’ हद्दपार करण्यात आला आहे. तसेच ४१ ते ५० षटकांमध्ये रिंगणाबाहेर चारऐवजी पाच क्षेत्ररक्षक उभे करता येणार आहे. तसेच कॅचिंग पोझिशनवरील दोन क्षेत्ररक्षकांची अटही शिथिल करण्यात आली आहे. या माध्यमातून आता गोलंदाजांना बर्‍याच प्रमाणात दिलासा मिळणार आहे. अर्थात याच्यासोबत गोलंदाजांना भलेही परिपुर्ण पोषक नसल्या तरी किमान अनुकुल खेळपट्टया तयार करण्याची आवश्यकता आहे. सध्या खेळपट्टी कशी असावी? याचा निर्णय घेण्याचे अधिकार संबंधीत मैदानाचे व्यवस्थानक व पर्यायाने यजमान देशाच्या संघाला आहे. यातही ‘आयसीसी’ने दखल देत किमान गोलंदाजांना अनुकल अशा खेळपट्ट्या तयार करण्याची मार्गदर्शक तत्वे जारी करणे गरजेचे आहे. असे झाल्यास फलंदाज व गोलंदाजांना समसमान संधी मिळेल. पर्यायाने आपण क्रिकेटचा निखळ पध्दतीने आनंद लुटू शकू. अर्थात खेळपट्टयांमध्ये सुधारणा होईल तेव्हा होईल; आता ‘पॉवर प्ले’चा जाचक नियम हटल्याने क्रिकेटच्या मैदानावर फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये खरा सामना रंगणार हे निश्‍चित.

क्रिकेटच्या निखळ आनंदासाठी गोलंदाजांनाही समान संधी हवीच!- छायाचित्र आंतरजालावरून साभार

क्रिकेटच्या निखळ आनंदासाठी गोलंदाजांनाही समान संधी हवीच!- छायाचित्र आंतरजालावरून साभार

About the author

shekhar patil

Leave a Comment