Featured चालू घडामोडी राजकारण

आता प्रियंकावर मदार

प्रियंका यांना आपल्या आजीची जागा घ्यावयाची असल्यास त्यांच्या उपयोगात फक्त गांधी हे नाव पडणारे नाही हे आजच त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. याचसोबत गलथान कारभाराचा कळस गाठलेले कॉंग्रेसजनही प्रियंकाच्या मदतीने पुन्हा सत्तारूढ होण्याचे स्वप्न पाहतात यातून त्यांची अगतिकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करून आपला आक्रमक पवित्रा दाखवून दिला आहे. यातून त्या राजकारणात सक्रीय होणार असल्याचा भाबडा आशावाद कॉंग्रेसजनांना लागला असला तरी प्रियंकांची खरी धडपड मोदींच्या झंझावाताने घायकुतीस आलेले बंधू राहूल आणि भ्रष्टाचाराचे शिंतोळे उडालेले पतीराज रॉबर्ट वधेरा यांचा बचाव करण्यासाठी असल्याचे कुणापासून लपून राहिलेले नाही.

सार्वत्रिक निवडणुकीच्या आजवर झालेल्या सर्व टप्प्यांमध्ये नागरिकांनी उत्स्फुर्तपणे मतदान केले आहे. सर्वसाधारणपणे मतदानाचा वाढलेला टक्का हा सत्ताधार्‍यांच्या विरोधात जातो असे मानले जाते. यामुळे वाढीव मतदानाची संयुक्त पुरोगामी आघाडी व पर्यायाने कॉंग्रेसलाही धडकी भरली आहे. यातच निवडणुकीपुर्वीच कॉंग्रेसने हार मानल्याचे त्यांच्या नेत्यांच्या देहबोलीवरून दिसून येत आहे. यामुळे राहूल गांधी यांचा अपवाद वगळता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभादेखील होतांना दिसत नाहीत. PRIYANKAअर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमतही मिळू शकते असे संकेत मिळताच कॉंग्रेसी नेते खडबडून जागे झाले आहेत. अद्याप देशातील १९४ जागांवरील मतदान बाकी असल्याने मोदींचा उधळलेला वारू रोखण्यासाठी खेळी करण्यात येत आहे. या अनुषंगाने कॉंग्रेसने पुरक जाहीरनामा प्रसिध्द करून मागास मुस्लीमांना आरक्षण देण्याचे गाजर दाखविले आहे. कालपासूनच सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हेदेखील प्रचारात सक्रीय झाले आहेत. याचा अर्थ असा की भाजपला बहुमतापासून रोखून तिसर्‍या आघाडीची मोट आवळत त्यांना बाहेरून विनाशर्त पाठींबा देण्याची खेळी करण्यासाठी कॉंग्रेसी नेते सरसावल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. या सर्व गदारोळात प्रियंका गांधी या गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका करतांना दिसून येत आहेत.

प्रियंका गांधी यांच्यात इंदिराजींची छवी दिसत असल्याने त्यांना राजकारणात सक्रीय करण्याची कॉंग्रेसी नेत्यांची मागणी जुनी आहे. तशा त्या सार्वजनिक जीवनात आपली माता आणि बंधूंसोबत अनेकदा वावरतात. त्यांनी आजवर अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघात प्रचारही केला आहे. मात्र या दोन मतदारसंघाच्या बाहेर त्यांना अद्याप संधी देण्यात आलेली नाही. यामागे अनेक कारणे आहेत. मात्र राहूल पंतप्रधान बनण्याआधीच प्रियंकाला राजकारणात ‘लॉंच’ केल्यास चुकीचा संदेश जाण्याची भिती आहे. यातून राहूल यांच्या मर्यादा मान्य करण्यासारखेही होईल. एका अर्थाने ‘भलेही एक पंचवार्षिक वाट पहायची पण राहूल पुर्णत: अपयशी झाल्याशिवाय प्रियंकाला राजकारणात आणू नये’ अशी सोनियांची व्यूहरचना असल्याचे दिसत आहे. मात्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडणार्‍या प्रियंकाची या वेळची शैली ही आतिशय आक्रमक वाटत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उठण्याआधीच भारतीय जनता पक्ष हा सोनियांचे जावई रॉबर्ट वधेरा यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. वढेरा यांना हरियाणा सरकारने अब्जावधी रूपयाची जमीन कवडीमोलाने दिल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या पार्श्‍वभुमीवर गत काही दिवसांपासून भाजप नेत्यांनी वढेरा यांच्या गैरव्यवहाराचा मुद्दा लावून धरला आहे. नरेंद्र मोदी यांनी यावरून हल्लाबोल केला तरी वढेरा यांच्यावर न्यायालयीन तरतुदीनुसार कारवाई करण्याचा संयत इशारा दिला. मात्र उमा भारती यांच्यासारख्या अन्य भाजप नेत्यांनी मात्र वढेरा यांना तुरूंगात पाठविण्याच्या वल्गना केल्या. यातच आंतराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये अवघ्या तीन वर्षात दहा लाखाचे ३०० करोड रूपये करण्याचा रॉबर्ट यांचा ‘प्रताप’ छापून येताच पुन्हा खळबळ उडाली. अर्थात आपल्या पतीवरील हल्ल्याच्या प्रतिकारासाठी प्रियंका धावून आल्या. या टीकास्त्रामुळे व्यथित होत त्यांनी वैयक्तीक बाबींना राजकारणात आणू नये असा अनाहुत सल्लादेखील देऊन टाकला. हे होत असतांना त्यांचे बंधू आणि त्यांचे सहकारी हे उथळपणे मोदी यांच्या ‘वैयक्तीक’ जीवनातील घटनेवर आगपाखड करत असल्याच्या त्या सोयिस्कर विसरल्या. अर्थात भावनेला हात घालण्याचा पवित्रा उपयोगात पडत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी मोदींवर जोरदार टीका करण्यास प्रारंभ केला आहे.

प्रियंका या निवडणुकीतही रायबरेली आणि अमेठी मतदारसंघाबाहेर जाण्याची शक्यता धुसर आहे. खरं तर गांधी घराण्याच्या या बालेकिल्ल्यात त्यांना वेळ दवडण्याचे काही एक कारण नाही. मात्र या कालखंडात अगदी कॉर्नर सभेतही केलेल्या वक्तव्यांना व्यापक प्रसिध्दी मिळेल हे हेरून त्या चतुराईने मीडियाचे व पर्यायाने देशाचे लक्ष आकर्षित करत आहेत. यातून कॉंग्रेसला फार मोठ्या प्रमाणात लाभ होईल असे आज तरी वाटत नाही. निव्वळ घराण्याच्या पुण्याईने जनतेच्या ह्दयात घर करता येत नाही तर त्यासाठी जनहिताच्या मुद्यांना हात घालावा लागतो. याचमुळे सर्वसाधारण घरात जन्माला आलेल्या नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांचे म्हणणे ऐकण्यासाठी तुफान गर्दी होते तर भ्रष्टाचाराने कलंकीत झालेल्या कॉंग्रेसी नेत्यांकडे जनता पाठ फिरवत आहे. याचमुळे आज बंधू व नवर्‍याची पाठराखण करण्यासाठी प्रियंकांना आपल्याच बालेकिल्ल्यात राणा भीमदेवी थाटाच्या गर्जना कराव्या लागत आहेत. मात्र प्रियंका यांना आपल्या आजीची जागा घ्यावयाची असल्यास त्यांच्या उपयोगात फक्त गांधी हे नाव पडणारे नाही हे आजच त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. याचसोबत गलथान कारभाराचा कळस गाठलेले कॉंग्रेसजनही प्रियंकाच्या मदतीने पुन्हा सत्तारूढ होण्याचे स्वप्न पाहतात यातून त्यांची अगतिकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

About the author

shekhar patil

Leave a Comment