चित्रपट साहित्य

आओ की कोई ख्वॉब बुने…!

Written by shekhar patil

आज साहिरचा जन्मदिवस. आपले आयुष्य समृध्द करणार्‍यांपैकी हा एक. कविता आणि गीत या दोन्ही प्रकारांमध्ये समान ताकदीने सृजन करणारा अन् याहूनही महत्वाची बाब म्हणजे आयुष्य आपल्याच धुंदीत जगणारा एक मनस्वी, कलंदर.

उर्दूतील ‘तरक्कीपसंद’ अर्थात प्रगतीशील लेखकांच्या चळवळीत साहिरचे नाव कधी काळी आघाडीवर होते. अर्थात विचारांमधील मार्क्सवाद हा त्याच्या सृजनात नक्कीच उमटला तरी तो पोथिनिष्ठ नव्हता. प्रचारकी थाटाचे काव्य कधी त्याने स्त्रवले नाही. मात्र ‘जला दो इसे, फुंक डालो ये दुनिया…’ सारख्या जळजळीत शब्दांत शोषितांविषयीचा कळवळा त्याच्याइतक्या समर्थपणे कुणी मांडलाही नाही. त्याने जीवनाचे विविध रंग आपल्या सृजनातून इतक्या कुशलतेने चित्रीत केलेय की कुणीही थक्क झाल्याशिवाय राहत नाही. साहिर आयुष्यात नेमका कधी आला ते कळले नाही. मात्र आल्यानंतर पुर्णपणे झपाटून टाकले. खरं तर तो गालिब वा फैजच्या तोडीचा महाकवी नव्हे. उर्दूतील अनेक मान्यवरांची प्रतिभादेखील सरस आहेच. पण साहीर म्हणजे साहीरच! विशेषत: आपल्या भाव जीवनाशी एकरूप हिंदी चित्रपटसृष्टीत गीतकारांना खर्‍या अर्थाने सन्मान मिळवून देण्याचे काम त्याने केले. गुरूदत्त हे हिंदी सिनेसृष्टीला पडलेले एक स्वप्न होते. त्यांच्या यशात साहिरचा वाटा कुणी नाकारू शकणार नाही. संगीतकारापेक्षा एक रूपया जास्त मानधन घेत त्यांना सन्मान मिळवून देणारा हा मनस्वी गीतकार अकालीच काळाच्या पडद्याआड गेला. अर्थात अवघ्या ५९ वर्षांच्या आयुष्यकाळात त्याने आपल्या प्रतिभेने गझल, कविता, मुक्तछंद, गीत, शेर आदी विविध प्रकार लिलया हाताळले. अनेक दिग्गज संगीतकारांसोबत साहिरने काम केले. मात्र खय्याम यांच्यासोबत त्याची काव्यशक्ती चांगलीच बहरली. यश चोप्रा यांच्या ‘कभी कभी’ हा या दोन महान कलावंतांच्या प्रतिभेचे अत्युच्च शिखर होते. यात साहिरचे शब्द आहेत…‘कल और आयेंगे मुझसे बेहतर कहनेवाले…तुमसे बेहतर सुननेवाले’’ मात्र काळ कितीही बदलला तरी साहिरचे शब्द अजर..अमर राहतील यात शंका नाहीच.

साहिरच्या जन्मदिवसालाच ‘जागतिक महिला दिवस’ असल्याचा योगायोगही किती अफलातून आहे बघा. पुरूषाच्या जीवनात स्त्री ही माता, भगिनी, प्रेयसी, सहचारिणी आदी विविध रूपांमध्ये येत असते. साहिरच्या काव्यात ही रूपे अत्यंत विलोभनीय स्वरूपात आली आहेत. याला त्याच्या आयुष्यातील घटनांचीही किनार आहे. अत्यंत खडतर स्थितीत साहिरला त्याच्या आईने वाढवले, शिकवले. याचमुळे आपल्या जमीनदार बापाविषयी त्याच्या मनात कायमची अढी तर राहिलीच पण तो मातृभक्त बनला. आईची त्याने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सेवा केली. प्रेयसी म्हणूनही त्याच्या आयुष्यात अनेक महिला आल्या. एके काळी अनेक स्त्रीयांसोबची त्याची मैत्री गावगप्पांना आमंत्रण देणारी ठरली. मात्र खरे प्रेम मिळविण्यात तो अपयशी ठरला. साहिरवर जीवापाड प्रेम करणार्‍या अमृता प्रितम यांनी आपल्या या नात्याला विलक्षण हळूवारपणे जगासमोर मांडले आहे. कुणी महिला आपल्या अयशस्वी प्रेमाला इतक्या आसुसलेपणाने दर्शवत नाही. मात्र हा बंडखोरपणा अमृताजींकडे होता. दुर्दैवाने एका सुंदर वळणावर हे नाते संपले. यानंतर साहिरचे नाव गायिका सुधा मल्होत्रा यांच्याशी जुळले. खरं तर हे त्याचे एकतर्फी प्रेम होते. सुधा मल्होत्रा यांनी कधी याला प्रतिसादही दिला नाही. हीच व्यथा जणू काही त्यांच्या ‘जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला…’ या गीतातून व्यक्त झाली.

मेरे ख्वाबों के झरोकों को सजाने वाली
तेरे ख्वाबों में कहीं मेरा गुज़र है कि नही
पूछकर अपनी निगाहों से बतादे मुझको
मेरी रातों की मुक़द्दर में सहर है कि नही

या प्रश्‍नाचे उत्तरही कदाचित साहिरला आयुष्यात कधी मिळाले नाही. हे वैफल्य त्याने सृजन, सिगरेट आणि मद्यात विसरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. याचमुळे तो तसा अकालीच गेला.

साहिरची एक नितांतसुंदर कविता ही कविच्या मनोदशेचे समर्थ चित्रण करणारी आहे. यातील-

आओ कि कोई ख़्वाब बुने कल के वास्ते
वरना ये रात आज के संगीन दौर की
डस लेगी जान-ओ-दिल को कुछ ऐसे कि जान-ओ-दिल
ता-उम्र फिर न कोई हसीं ख़्वाब बुन सकें

या प्रारंभीच्या ओळी भयाण वास्तवावर मात करण्यासाठी संवेदनशील मनाची धडपड व्यक्त करणार्‍या नव्हेत काय? अर्थात प्रत्येक जण आपापल्या परीने उज्ज्वल उद्याची आस बाळगत स्वप्नांची साथसंगत करतच असतो. नेमकी हीच बाब साहिरच्या शब्दस्पर्शाने अजरामर झाली आहे.

आज साहिर जाऊन ३५ वर्षे झाली असली तरी मानवी मुल्यांचा जयघोष करणारे त्याचे काव्य आजही टवटवीत वाटते. ते काळाच्या कठोर कसोटीवर टिकणारे ठरले आहे. खुद्द साहिरने ‘कभी कभी’त ‘मै पल दो पल का शायर हू’ म्हणत सृजनाच्या क्षणभंगुरतेची कबुली दिली होती. मात्र काळ बदलला…वेळ बदलली…समाजमुल्येही बदललेत तरी साहिरची सर कुणाला नाही हीच त्याची महत्ता.

आज जागतिक महिला दिनानिमित्त साहिरची अत्यंत गाजलेली कविता-

औरत ने जनम दिया मर्दों को,
मर्दों ने उसे बाजार दिया
जब जी चाहा कुचला मसला,
जब जी चाहा धुत्कार दिया॥

तुलती है कहीं दीनारों में,
बिकती है कहीं बाजारों में
नंगी नचवाई जाती है,
ऐय्याशों के दरबारों में
ये वो बेइज्जत चीज है जो,
बंट जाती है इज्जतदारों में ॥

मर्दों के लिये हर जुल्म रवां,
औरत के लिये रोना भी खता
मर्दों के लिये लाखों सेजें,
औरत के लिये बस एक चिता
मर्दों के लिये हर ऐश का हक,
औरत के लिये जीना भी सजा॥

जिन होठों ने इनको प्यार किया,
उन होठों का व्यापार किया
जिस कोख में इनका जिस्म ढला,
उस कोख का कारोबार किया
जिस तन से उगे कोपल बन कर,
उस तन को जलील-ओ-खार किया ॥

मर्दों ने बनायी जो रस्में,
उनको हक का फरमान कहा
औरत के जिन्दा जल जाने को,
कुर्बानी और बलिदान कहा
किस्मत के बदले रोटी दी,
उसको भी एहसान कहा ॥

संसार की हर एक बेशर्मी,
गुर्बत की गोद में पलती है
चकलों में ही आ के रुकती है,
फाकों में जो राह निकलती है
मर्दों की हवस है जो अक्सर,
औरत के पाप में ढलती है ॥

औरत संसार की किस्मत है,
फिर भी तकदीर की हेती है
अवतार पैगंबर जनती है,
फिर भी शैतान की बेटी है
ये वो बदकिस्मत मां है जो,
बेटों की सेज पे लेटी ॥

औरत ने जनम दिया मर्दों को,
मर्दों ने उसे बाजार दिया
जब जी चाहा कुचला मसला,
जब जी चाहा धुत्कार दिया ॥

About the author

shekhar patil

Leave a Comment