पत्रकारिता

अस्तित्वासाठी धडपडणार्‍या वृत्तपत्राच्या अंतरंगात

साधारणपणे वर्तमानपत्राच्या कामकाजाविषयी सर्वसामान्यांना खूपच उत्सुकता असते. यातच एखाद्या जगविख्यात वर्तमानपत्राच्या अंतरंगामध्ये डोकावण्यास कुणाला आवडणार नाही?

साधारणपणे वर्तमानपत्राच्या कामकाजाविषयी सर्वसामान्यांना खूपच उत्सुकता असते. यातच एखाद्या जगविख्यात वर्तमानपत्राच्या अंतरंगामध्ये डोकावण्यास कुणाला आवडणार नाही? नेमकी हीच उत्सुकता लक्षात घेऊन अँड्रू रोस्सी या दिग्दर्शकाने ‘पेज वन-इनसाईड न्युयॉर्क टाईम्स’ या डॉक्युमेंटरीची निर्मिती केली आहे.

‘न्युयॉर्क टाईम्स’ची भव्य न्यूज रूम

‘न्युयॉर्क टाईम्स’ची भव्य न्यूज रूम


अँड्रू रोस्सी यांनी आपली ही संकल्पना ‘न्युयॉर्क टाईम्स’चे स्तंभलेखक डेव्हिड कार यांना सांगितली. त्यांनी ही बाब आपले कार्यकारी संपादक बिल केलर यांच्या कानावर टाकली. त्यांनी लागलीच याला परवानगी दिली. विशेष बाब म्हणजे चित्रीकरणाच्या कालखंडात हे वर्तमानपत्र आपले अस्तित्व टिकवण्यासाठी निकराचा प्रयत्न करत असते. ही धडपड या माहितीपणात अगदी ठळकपणे दर्शविण्यात आली आहे. २००८च्या अखेरीस अँड्रू रोस्सी हे आपल्या चमूसह ‘टाईम्स’मध्ये दाखल झाले. तब्बल चौदा महिने या वर्तमानपत्राच्या दैनंदिन कामकाजाचे चित्रीकरण त्यांनी केले. याचसोबत येथे काम करणार्‍या अनेक वरिष्ठ सहकार्‍यांशी वैयक्तीक वार्तालाप केला. काही दुर्मिळ फुटेजचाही त्यांनी वापर केला. यातूनच हा माहितीपट साकार झाला. यात साधारणत: १२-१३ महत्वाच्या घटनांना प्रामुख्याने स्थान देण्यात आले आहेत. यातील विविध घटनांच्या श्रुंखला एकसंघ नाहीत. म्हणजे वर्तमानकाळाविषयी कुणी टिपण्णी केली असतांना लागलीच भुतकाळात शिरून त्याचा संदर्भ जोडला जातो. यामुळे हा माहितीपट पाहण्यासाठी आपल्याला जगाच्या व विशेषत: अमेरिकेच्या आधुनिक इतिहासातील अनेक महत्वाच्या घडामोडींचे किमान प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे.

रोस्सी यांनी माहितीपटाचे चित्रीकरण सुरू करतांनाचा काळ हा ‘टाईम्स’साठी खूप कठीण असाच होता. एक तर अमेरिकन प्रिंट मीडियातील मातब्बर वर्तमानपत्रांना घरघर लागलेली होती. मुळातच उत्पादनाचा वाढलेला खर्च आणि जाहीरातींच्या प्रमाणात कपात झाल्यामुळे बहुतांश वर्तमानपत्रांसमोर अस्तित्वाचे संकट उभे राहिले होते. यातून अनेक विख्यात वर्तमानपत्रे बंद पडली. याच मार्गावर न्युयॉर्क टाईम्सही चालले होते. किंबहुना हे वर्तमानपत्र अखेरच्या उचक्या देत असल्याची जाहीर चर्चा अमेरिकेत रंगली होती. या अत्यंत खडतर कालखंडात या वर्तमानपत्राच्या सहकार्‍यांनी आपला लौकीक जपत यातून कसा मार्ग काढला हे रोस्सीच्या कॅमेर्‍याने अचूकपणे टिपले आहे.

चर्चा करतांना ब्रूस हेडलमन आणि डेव्हिड कार.

चर्चा करतांना ब्रूस हेडलमन आणि डेव्हिड कार.


खरं तर वर्तमानपत्र/नियतकालीक, वृत्तवाहिनी वा एकाद्या वृत्तसंस्थेसाठी ‘बीट’ हा प्रकार जुना आहे. सर्वसाधारणपणे मोठ्या संस्थांमध्ये स्थानिक घडामोडींपासून ते इंटरनॅशनल डेस्कपर्यंत जबाबदार्‍या वाटून दिलेल्या असतात. ‘न्युयॉर्क टाईम्स’मध्ये २००८ या वर्षापासून ‘मीडिया डेस्क’ तयार करण्यात आला. यात दस्तुरखुद्द ‘टाईम्स’सह सर्व माध्यमांमध्ये होणार्‍या घडामोडी टिपणार्‍या पारंगत पत्रकारांचा समावेश करण्यात आला. रोस्सीने याच विभागावर लक्ष केंद्रीत केले असता अनेक घटनांक्रमातून ‘टाईम्स’ची अस्तित्वाची झुंज जगासमोर आली.

मीडिया डेस्कचे कार्यकारी संपादक ब्रूस हेडरमन हे असले तरी स्टार रिपोर्टर आणि स्तंभलेखक डेव्हिड कार हा या विभागाचा खरा आधारस्तंभ असतो. आपल्या तारूण्यात अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यानंतर त्यातून बाहेर आलेला अन् आपल्या दोन्ही मुलांचे पत्नीविना संगोपन करणारा हा हाडाचा पत्रकार आपल्या खोल आवाजात अनेक घटनांवर तिरकस व क्वचितप्रसंगी शिवराळ भाषेत टिपण्णी करतो. अनेकदा तो समोरच्यांना फटकळपणे गप्प करतो. त्याला ब्रूस हेडरमन पुरेपुर स्वातंत्र देतो. या विभागात रिचर्ड पेरेज-पेना यांच्यासह दोन तरूण सहकारीदेखील असतात. यात टेक्नोसॅव्ही ब्रायन स्टेल्टरचा समावेश असतो. महत्वाची बाब म्हणजे तो पहिल्यांदा ब्लॉगींगच्या माध्यमातून प्रसिध्द झाल्यानंतर मेनस्ट्रीम पत्रकारितेत आलेला असतो.

टेक्नोसॅव्ही ब्रायन स्टेल्टर

टेक्नोसॅव्ही ब्रायन स्टेल्टर

सर्वसाधारणपणे ‘टाईम्स’चे तमाम सहकारी सोशल मीडिया सक्रीय असले तरी ब्रायनला यात विशेष गती असते. रोस्सी चित्रीकरण करत असलेला काळ हा वर्तमानपत्रांसाठी संक्रमणाचा कालखंड असतो. एक तर ट्विटर आणि फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कींग साईटस्ची लोकप्रियता वाढलेली असली तरी आता त्या पारंपरिक प्रसारमाध्यमांना सक्षम पर्याय म्हणून समोर येत असतात. अनेक ब्लॉगर्स, न्यूज ऍग्रिकेटर्स, युट्युबसारखी क्रांतीकारी आणि सर्वव्यापी मोफत साधने ही वर्तमानपत्रांसमोर मोठी आव्हाने उभी करू पाहतात. बदलत्या हवेचा रोख हा ब्रायन डोळसपणे अनुभवतो आणि यातून आपणही बदलायला हवे हे आपल्या वरिष्ठांना पटवून देतो. त्यांच्यासोबत ‘वॉर रिपोर्टर’ बनण्याचे स्वप्न पाहणारा टिम अरँगो हा उत्साही तरूणही असतो. मीडिया डेस्कवरील या सर्व सहकार्‍यांसह ‘टाईम्स’च्या अन्य विभागांमधील कर्मचार्‍यांवर रोस्सीचा कॅमेरा फिरतो. यातून आपल्यासमोर या वर्तमानपत्राच्या संस्कृतीचे अनेक कंगोरे उलगडत जातात. या माहितीपटात आपल्याला सुरवातीलाच ‘न्युयॉर्क टाईम्स’सारख्या अजस्त्र व्याप असणार्‍या वर्तमानपत्राच्या अंतरंगाची झलक मिळते. यात या वर्तमानपत्राच्या विशालकाय ‘न्यूजरूम’पासून ते अत्याधुनिक छपाईची यंत्रणा पाहून आपण थक्क होतो.

माहितीपटाच्या प्रारंभीच्या काळात ‘न्युयॉर्क टाईम्स’च्या संभाव्य दिवाळखोरपणाबाबत खूप चर्चा होत असते. २००९च्या सुरवातील टाईम्सच्या जाहिरात महसुलात तब्बल ३० टक्क्यांची घट होते तेव्हा याबाबतची चिंता अजूनच वाढते. सर्वसामान्य नागरिकांसमोर माहितीचे अन्य पर्याय एकचदा खुले झालेले असतात. यातच ज्युलिअन असांज या तेव्हापर्यंत फारशा ज्ञात नसणार्‍या हॅकरने तयार केलेल्या वेबसाईटवर इराकमधील व्हिडीओ अपलोड केल्यावर खळबळ उडते. यात अमेरिकन सैनिक चुकीने १२ नागरिकांचा बळी घेत असल्याचे दर्शविण्यात आलेले असते. या व्हिडीओची खासियत म्हणजे कोणतेही वर्तमानपत्र वा न्यूज चॅनलला मध्यस्थी म्हणून वापर न करता याला थेट युटुयुबवर टाकण्यात आलेले असते. यात अमेरिकन सैनिकांची चूक स्पष्ट दिसत असली तरी सुमारे अर्ध्या तासांचा हा व्हिडीओ १२ मिनिटांइतका संपादित करून टाकलेला असतो. यामुळे अपलोड करणार्‍यांचा हेतू फक्त अमेरिकन सैनिकांची चुकी दाखविण्याचा असल्याचा निष्कर्ष काढला जातो. मात्र या स्टोरीला महत्व दिले जाते. यातून इंटरनेटचे सर्वव्यापी अस्तित्व विद्यमान प्रसारमाध्यमांसाठी धोक्याची घंटा असल्याचेही दिसून येते. या व्हिडीओबाबत ज्युलियन असांजशी ब्रायन स्टेल्टर संपर्क साधतो तेव्हा तो आपण थोड्या प्रमाणात पत्रकार पण कट्टर ‘ऍक्टीव्हिस्ट’ असल्याचा दावा करतो. पत्रकारिता हे फक्त साधन असल्याचे ठासून सांगतो. यानंतर ‘टाईम्स’च्या सकाळच्या दहा वाजेच्या बैठकीत या विषयावर संगोपांग चर्चा होते. खरं तर या वर्तमानपत्रात सकाळी साडेदहा आणि सायंकाळी चार वाजेच्या संपादकीय विभागाच्या बैठकींमध्ये उद्याच्या पान क्रमांक एकवर कोणत्या बातमीला आणि का स्थान द्यावे? यावर सखोल चर्चा होते. याच बैठकीत संबंधीत व्हिडीओबाबत सखोल चर्चा होते. विकीलिक्सचा हेतू अमेरिकन सैनिकांची चुकी दाखविण्याचा असला तरी ‘न्युयॉर्क टाईम्स’च्या पहिल्या पानावर या बातमीला स्थान मिळते. विकीलीक्सला ‘टाईम्स’ची गरज नसल्याचे बिल केलर म्हणतात तेव्हा बदलांची अपरिहार्यता ठळकपणे अधोरेखित होते. सत्तरच्या दशकात ‘टाईम्स’नेच जगासमोर सर्वप्रथम व्हिएतनाम युध्दाशी संबंधीत कागदपत्रे जगासमोर आणली होती. हा गुप्त दस्ताऐवज डॅनियल एल्सबर्ग या अधिकार्‍याने ‘टाईम्स’ला दिलेला असतो. अर्थात यासाठी तब्बल २२ महिन्यांचा कालावधी लागगलेला असतो. आज विकीलीक्स एखादा गुप्त व्हिडीओ सहजपणे जगभरातील सर्व नागरिकांना दिसेल अशा पध्दतीने अगदी मोफतपणे अपलोड करू शकते ही बाब काळ आणि या अनुषंगाने तंत्रज्ञानात झालेला बदल दर्शविते.

दरम्यान, ‘सीएनएन’ ही संस्था ‘व्हाईस’ या तुलनेत लहान असणार्‍या मात्र खळबळजनक गौप्यस्फोटांसाठी विख्यात असणार्‍या नियतकालीकाशी हातमिळवणीचे प्रयत्न सुरू करते. यावर आपल्या स्तंभामध्ये भाष्य करण्यासाठी डेव्हिड कार ‘व्हाईस’च्या संस्थापकांना भेटतो. याप्रसंगी ते आपण नव्या युगाची भाषा करतो असा दावा करतो तेव्हा डेव्हिडची सटकते व तो त्या दोघांना अक्षरश: झापतो. तुम्ही आफ्रिकन देशांमधील खळबळजनक घटना जगासमोर आणि असले तरी तेथील नरसंहाराची भयावहता ‘टाईम्स’ने अनेकदा समोर आणल्याचे सांगून तो त्यांना निरूत्तर करतो. यानंतर तो यावर परखड भाष्य करतो हे सांगणे नकोच. याच कालखंडात अमेरिकेतील सर्वात मोठ्या केबल कंपन्यांपैकी एक म्हणून विख्यात असणारी ‘कॉमकास्ट’ ही कंपनीदेखील आपल्या भवितव्याविषयी साशंक असते. तरूणाईचा ओढा ऑनलाईन व्हिडीओजकडे असल्याने केबल व्यवसाय धोक्यात येईल अशी जाणीव असल्याने ही कंपनी ‘एनबीसी’ या समुहाशी हातमिळवणीचा प्रयत्न करत असल्याची गुप्त माहिती टिम अरँगोला मिळते. यातून नव्या तंत्रज्ञानाचा सर्वच प्रसारमाध्यमांनी धसका घेतल्याचे निदर्शनास येते. दरम्यान, ब्रायनमुळे डेव्हिड कार हादेखील ट्विटरसारख्या सोशल मीडियाचा सपाटून वापर करू लागतो. क्षणाक्षणाला घडणार्‍या घटना ट्विटरच्या माध्यमातून जगासमोर तर येतातच पण यावर लोकांच्या प्रतिक्रियादेखील तात्काळ समजत असल्याचे डेव्हिडच्या लक्षात येते. हे होत असतांना अनेक नाऊमेद करणार्‍या घटना घडत असतात. ‘टाईम्स’ कोणत्याही क्षणाला बंद पडणार अशी स्थिती येते. यातच ‘टाईम्सच्या भवितव्यावर आधारित एका परिसंवादात डेव्हिडला पाचारण करण्यात येते. यावेळी ‘न्यूजर डॉटकॉम’ या संकेतस्थळाचा संस्थापक मायकेल वुल्फ हा ‘टाईम्स’ची हेटाळणी करण्याचा प्रयत्न करताच तो चवताळून उठतो. कथित न्यूज ऍग्रिगेटर्स साईटस् या आमच्यासारख्यांच्या बातम्यांविना पोकळ असल्याचे तो दाखवून देतो. अर्थात नव्या माध्यमाला कितीही टाळले तरी त्याची महत्ता कमी होत नाही. यातूनच ‘टाईम्स’ची संपादकीय मंडळी विकिलीक्सशी सहकार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतात.

विकीलिक्स हे पहिल्या टप्प्यात ९२ हजार तर दुसर्‍या टप्प्यात अडीच लाख गुप्त संदेश चव्हाट्यावर आणते. प्रारंभी विकीलिक्स फक्त इंटरनेटवर सामग्री टाकते. मात्र याचा व्यापक परिणाम होण्यासाठी छापील प्रसारमाध्यमांना हाताशी धरल्याशिवाय पर्याय नसल्याचे ज्युलियन असांजच्या लक्षात येते. यातून विकीलिक्सची माहिती ही इंटरनेटवरील त्यांच्या वेबसाईटसह अमेरिकेतील ‘न्युयॉर्क टाईम्स’, ब्रिटनमधील ‘गार्डियन’ ही दैनिके आणि जर्मनीतील ‘डेर स्पिगल’ या साप्ताहिकामधूनही प्रकाशित करण्यात येते. पारंपरिक आणि नवमाध्यमांमधील मैत्रीचा हा फॉर्म्युला भलताच गाजतो. अर्थात यामुळे अमेरिकेत ‘टाईम्स’वर टिकेची झोडही उठविण्यात येते. अमेरिकन सरकारची नाचक्की करणारी गुप्त कागदपत्रे उघड केल्यामुळे ‘टाईम्स’वर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणीदेखील करण्यात येते. यातून न्यू मीडियाची ताकद ‘टाईम्स’च्या कर्त्याधर्त्यांना येते. अर्थात या वर्तमानपत्राच्या अर्थिक स्थितीत सुधार न झाल्यामुळे १०० कर्मचार्‍यांची कपात करण्यात येते. हे सर्वजण साश्रुनयनांनी निरोप घेतात.

रोस्सीचा कॅमेरा ‘टाईम्स’चा प्रत्येक क्षण टिपतच असते. यातच एक अद्भुत घटना घडते. इराकमधून अमेरिकन सैन्य माघार घेणार असल्याची माहित ‘एनबीसी’ ही वाहिनी जाहीर करणार असल्याची कुणकुण ब्रायन स्टेल्टरच्या कानावर पडते. तो हेडलमनला याची माहिती देऊन याबाबत साडेसहाच्या वार्तापत्रात घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांना आत्मविश्‍वासाने सांगतो. आश्‍चर्याची बाब म्हणजे ‘एनबीसी’च्या साडेसहाच्या बातमीपत्रामध्ये इराकमधून अमेरिकन सैन्य माघार घेत असल्याचे वृत्त देण्यात येते. याप्रसंगी ते चक्क इराकमधून घरी परतणार्‍या सैनिकांचे फुटेजही दाखवतात तेव्हा ‘टाईम्स’ची संपादकीय मंडळी गार पडते. ‘एनबीसी’ने सैनिकांच्या माघारीची माहिती दिली असली तरी पेंटेगॉनतर्फे अधिकृत घोषणा करण्यात न आल्यामुळे या बातमीला दुसर्‍या दिवसाच्या अंकात स्थान मिळत नाही. या निर्णयामागे गेल्या दहा वर्षांमधील दोन घटनांचा संदर्भ असतो. इराकमध्ये सद्दाम हुसेन हा सामूहिक विनाशकारी अस्त्रे तयार करत असल्याची स्टोरी ज्युडिथ मिलर ही पत्रकार ‘टाईम्स’मध्ये प्रसिध्द केल्यावर प्रचंड खळबळ उडते. अगदी याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते. प्रत्यक्षात मात्र ही बातमी सपशेल खोटी असते. यामुळे ज्युडिथला अर्थातच बाहेरचा रस्ता दाखविला जातो. याचसोबत दुसर्‍या पत्रकाराच्या बातम्या आपल्या नावावर प्रसिध्द करणारा तसेच घटनास्थळी नसूनही तसे दर्शविणार्‍या जेसन ब्लेअरमुळेही ‘टाईम्स’च्या विश्‍वासार्हतेला तडा जातो. या दोघांपैकी ज्युडिथ मिलर ही आपली चूक कॅमेर्‍यासमोर खुल्या मनाने कबुलही करते हे विशेष!

या माहितीपटाचे चित्रीकरण सुरू असतांनाच ‘आयपॅड’ अवतरतो. स्टीव्ह जॉब्स त्याच्या खास शैलीत ‘आयपॅड’ लॉंच करतो तेव्हा स्टेल्टरच नव्हे तर डेव्हीडही रोमांचित होतो. आता मीडियाचे भवितव्य टॅब्लेटमध्ये असल्याची भाकिते होत असतांना डेव्हिडला आयपॅडचा इंटरफेस आणि विशेषत: वाचण्यासाठीची सुलभपणा चांगलाच भावतो. यातून आपल्याला वर्तमानपत्राची आठवण होत असल्याचे नमुद करण्यास तो विसरत नाही. इतक्यात डेव्हिड कारच्या गुप्त स्त्रोतांकडून त्याला ‘ट्रिब्यून’ या मातब्बर मीडिया समुहातील गैरप्रकार कानावर येतात. वास्तविक पाहता या समुहाकडे ‘शिकागो ट्रिब्यून’, ‘लॉस एंजल्स टाईम्स’, ‘ओरलँडो सेंटीनल’, ‘द सन’, ‘न्यूज डे’ आदी एकाहून एक सरस वर्तमानपत्रे असतात. मात्र आत्ममग्न आणि बढाईखोर स्वभावाचा सॅम झेल या उद्योगपतीच्या हातामध्ये गेल्यानंतर या समुहाचे वाटोळे होते. या क्षेत्राशी कोणताही संबंध नसतांना निव्वळ नफ्याकडे पाहण्यामुळे हा समूह दिवाळखोरीच्या टोकावर येऊन पोहचतो. दरम्यान, संचालक मंडळ इन्सेन्टीव्हच्या नावावर कंपनीची लुट करतात. यासोबत या समुहातील लैंगिक अत्याचाराचे प्रकरणही डेव्हीडला ज्ञात होते. तो यावर सणसणीत स्टोरी करतो. यातून त्याला कायदेशीर कारवाईच्या भितीसह अनेक मार्गांनी धमकावण्यात येते तरी तो याला भिक घालत नाही. अर्थातच काही दिवसांतच ‘ट्रिब्यून’ समुहाचे दिवाळे निघते आणि या समुहाचा मुख्य कार्यकारी अधिकारी सँडी मायकल याला राजीनामा देणे भाग पडते. अर्थातच डेव्हिड कारच्या धडाकेबाज रिपोर्टींगला सर्वजण सलाम करतात. माहितीपटाच्या शेवटच्या टप्प्यात टिम अरँगोचे वॉर रिपोर्टर बनण्याचे स्वप्नही साकार होते. त्याला ‘टाईम्स’तर्फे इराकमध्ये पाठविण्यात येते. तेथे बगदादामध्ये तो ब्युरो चीफ बनतो. ‘टाईम्स’च्या तेजस्वी परंपरेनुसार २०१० सालीदेखील या वर्तमानपत्राचे पुलित्झर पुरस्कारांवर वर्चस्व राहते. याचवेळी कार्यकारी संपादक बिली केलर हे लिखाणास पुर्णवेळ मिळावा म्हणून निरोप घेत असतांना हा माहितीपट संपतो.

खरं तर न्यूज चॅनल्ससह विविध उपग्रह वाहिन्यांमुळे मुद्रीत प्रसारमाध्यमे लयास जातील अशी भिती विसाव्या शतकाच्या शेवटी व्यक्त करण्यात आली होती. मात्र विश्‍वासार्हतेमुळे छापील माध्यमे टिकून राहिली. अर्थात सायबरविश्‍वासतील सोशल साईटसारख्या नवीन माध्यमांनी मात्र छापील आणि इलेक्ट्रॉनिक या दोन्ही माध्यमांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. सोशल मीडिया हा इंटरऍक्टीव्ह असून यावर कुणीही आपले मत मांडू शकतो. या मताला वजन असल्यास त्याला मान्यताही मिळू शकते. ही डॉक्युमेंटरी सुरू होण्याचा कालखंड हा याच प्रकारातील आहे. इथपावेतो अमेरिकेसह जगातील विविध भागांमध्ये अनेक ब्लॉगर्स हे पत्रकारांपेक्षाही विख्यात झालेले होते. पारंपरिक प्रसारमाध्यमे ब्लॉगकडे बातमीचा स्त्रोत म्हणून गांभिर्याने पाहू लागले होते. यातच फेसबुक आणि ट्विटरची लोकप्रियताही वाढलेली होती. एक तर ही माध्यमे अत्यंत सुलभ, सर्वव्यापी आणि वापरण्यास अत्यंत सोपी असल्याने बातमीसाठी लोकांना वर्तमानपत्रांची वाट पाहण्याची बाब लोप पावण्याकडे चालली होती. नेमक्या याच काळात ‘न्युयॉर्क टाईम्स’च्या संपादकीय मंडळीने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा झपाट्याने स्वीकार केला. या डॉक्युमेंटरीत यातील काही भाग आला आहेच. यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे ‘टाईम्स’ने आपल्या ऑनलाईन आवृत्तीला अत्यंत आकर्षक आणि अद्यायावत बनविले. यावर व्हिडीओजचे प्रमाण वाढविले. याचसोबत वाचकांना आपल्या साईटवरील कंटेंट वाचण्यासाठी आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय खूप धाडसी असा होता. इंटरनेटवरील बहुतांश मजकूर मोफत असतांना ‘टाईम्स’चे वाचक यासाठी पैसे मोजतील काय? याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली. मात्र आश्‍चर्याची बाब म्हणजे वाचकांनी या योजनेला उदंड प्रतिसाद दिला. आज सुमारे दहा लाख प्रतींचा खप असणार्‍या ‘न्युयॉर्क टाईम्स’च्या ऑनलाईन आवृत्तीचे तब्बल साडेसहा लाख वर्गणीदार आहेत ही बाब या योजनेचे यश सांगण्यासाठी पुरेशी आहे. ‘टाईम्स’च्या या योजनेचा कित्ता नंतर अनेक वर्तमानपत्रे वा नियतकालिकांनी गिरवला. अर्थात यात ‘टाईम्स’ला सर्वाधीक यश आले कारण त्यांनी काळाची पावले आधीच ओळखली होती. अर्थात अमेरिकाच नव्हे तर जगाच्या कोणत्याही भागातील वर्तमानपत्राला काळाची पावले ओळखणे गरजेचे असल्याचे या डॉक्युमेंटरीतून अधोरेखित होते.

सायबर माध्यमातील साधनांनी प्रिंट मीडियाची कंबर आधीच मोडली आहे. आता तर मोबाईलचे सुपरफास्ट युग आले आहे. व्हाटसऍपसारखे असंख्य ऍप्लीकेशन्सन पत्रकारितेच्या पारंपरिक साच्याला मोडीत काढत आहेत. याचा मुद्रीत माध्यमांवर नेमका काय परिणाम होणार याची आपण कल्पना तरी करू शकतो का?

पहा या डॉक्युमेंटरीचा ट्रेलर…

(सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार)

About the author

shekhar patil

Leave a Comment