Featured राजकारण

असली आणि नकली

आधी उत्तरप्रदेशातील मतदारसंघाच्या वाटपावरून उडालेला गोंधळ मिटत नाही तोच माजी परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी अपक्ष लढण्याचा पवित्रा घेऊन भाजपला पेचात टाकले आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ म्हणून तोरा मिरवणार्‍या भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह उफाळून आला आहे. आधी उत्तरप्रदेशातील मतदारसंघाच्या वाटपावरून उडालेला गोंधळ मिटत नाही तोच माजी परराष्ट्रमंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते जसवंतसिंह यांनी अपक्ष लढण्याचा पवित्रा घेऊन भाजपला पेचात टाकले आहे.

खरं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर जवळपास प्रत्येक राजकीय पक्षाला बंडाळीने ग्रासले आहे. सर्वांच्याच इच्छा-आकांक्षा पुर्ण करणे शक्य नसल्याने ही बा तशी अपेक्षितच मानली जाते. मात्र भाजपमधील सावळागोंधळ हा या सर्वांहून वेगळा असून याला अनेक आयाम आहेत. प्रारंभी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघावरून घोळ निर्माण झाला. देशात नरेंद्र मोदी यांची ‘हवा’ असल्याचे वातावरण भारतीय जनता पक्षातर्फे निर्माण करण्यात आले आहे.jaswant-t1 यात तथ्य किती हे तर निकालानंतरच कळणार आहे. मात्र मोदी यांनी उत्तरप्रदेशातून निवडणूक लढविल्यास त्याचा पक्षाला लाभ होणार असल्याचे गणित भाजपच्या धुरिणांनी मांडले आहे. यासाठी उत्तरप्रदेशची निवड करण्यात आली. मात्र मोदी यांनी नेमके कुठून लढावे याबाबत तोडगा निघत नव्हता. यासाठी अखेर वाराणसी आणि लखनऊ या दोघांपैकी एका जागेहून त्यांनी लढावे अशी सुचना समोर आल्यानंतर भाजपमध्ये ठिणगी पडली. वाराणसी हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असला तरी येथून सातत्याने निवडून येणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी मतदारसंघ सोडतांना कटकट केली. हक्काचा मतदारसंघ सोडून दुसरीकडून निवडून येणे हे खूप कठीण असल्याचे त्यांना चांगलेच ज्ञात असल्याने त्यांनी हा पवित्रा घेतला. वरकरणी जोशी यांनी मोदींसाठी मतदारसंघ सोडण्याचा आव आणला तरी त्यांच्या समर्थकांनी आपला रोष वारंवार प्रकट केला. वाराणसी येथे मोदी आणि जोशी समर्थकांमध्ये पोस्टर युध्ददेखील रंगले. यातच या मुद्यावरून केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली तसेच पक्षाध्यक्ष राजनाथसिंह आणि जोशी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची माहितीदेखील समोर आली. हे होत असतांना लखनऊ मतदारसंघावरूनही वाद समोर आले.

भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंग हे यापुर्वी उत्तरप्रदेशातील गाझियाबाद मतदारसंघातून निवडून आले आहेत. यावेळी मात्र दिल्लीला लागूनच असणार्‍या गाझियाबादमध्ये ‘आप इफेक्ट’ची धास्ती घेऊन त्यांनी लखनऊ मतदारसंघातून लढण्याची इच्छा प्रकट केली. येथून निवडून येणारे लालजी टंडन यांनी ‘भलेही मोदी यांच्यासाठी आपण जागा सोडू पण इतरांसाठी नाही’ असा पवित्रा घेतला. यामुळेदेखील वाद झाले. अखेर श्रेष्ठींच्या इच्छेनुसार मुरलीमनोहर जोशी आणि लालजी टंडन यांनी नरेंद्र मोदी आणि राजनाथसिंग या आपल्या नेत्यांसाठी मतदारसंघ सोडले तरी त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. यातच ज्येष्ठ नेते जसवंतसिंह यांनी थेट पक्षश्रेष्ठींवरच शरसंधान केले. जसवंतसिंह म्हणाले की, भाजपवर सध्या डुप्लिकेट लोकांचा ताबा आहे. पक्षामध्ये सध्या असली कोण आणि नकली कोण हेच समजेनासे झाले आहे. या खर्‍या खोट्यांमधील फरक करणे आवश्यक असल्याची तोफ त्यांनी डागली. मावळत्या लोकसभेत जसवंत सिंह पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग मतदारसंघाचे अपक्ष व नंतर भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून प्रतिनिधीत्व करत होते. भाजपमधील पुन्हा प्रवेशानंतर आता बाडमेरमधून शेवटची निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती; पण, पक्षाने त्यांना नाकारले. २००९पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भारताच्या फाळणीसंबंधी लिहिलेल्या पुस्तकावरून उठलेल्या वादावरून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. सिंह यांचे उपद्रवमुल्य जाणूनही पक्षाने त्यांच्या या संभाव्य बंडखोरीला फारसे महत्त्व दिलेले दिसत नाही. मात्र त्यांनी पक्षातील मूळचे आणि उपरे असा नवाच वाद उभा केला आहे. हा पक्षाच्या सच्च्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारा आहे.

देशभरात आयाराम-गयारामची चलती सुरू असतांना भाजपमध्येही मोठ्या प्रमाणात येणार्‍यांचा ओघ वाढत आहे. पक्षात आयत्या वेळी येणार्‍यांना उमेदवारी मिळत असेल तर निष्ठावंतांनी काय करावे? हा प्रश्‍न उरतोच. यालाच जसवंतसिंह यांनी वाचा फोडली आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या हीना गावित या भाजपमध्ये डेरेदाखल झाल्यात. या पाठोपाठ विख्यात पत्रकार एम.जे. अकबरही दाखल झाले. काल तर वादग्रस्त श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिक यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यावरून गोंधळ उडाल्यानंतर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळदेखील भाजपवर आली. यातून पक्षाची मोठ्या प्रमाणात नाचक्की झाली. कधी काळी भाजपचे ‘थिंक टँक’ असणारे गोविंदाचार्य यांनी पक्षाचा मुखवटा वाजपेयी असले तरी चेहरा अडवाणी असल्याचे सुचक वक्तव्य केले होते. यानंतर ‘चेहरा आणि मुखवटा’ ही संज्ञा राजकारणात प्रचलित झाली. आता जसवंतसिंह यांनी शोधलेली ‘असली आणि नकली’ ही नवीन उपमा कितपत खरी आणि कितपत खोटी ठरते हे तर काळच ठरविणार आहे. मात्र त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा निरर्थक नाहीच. कोणत्याही राजकीय पक्षाला जीवंत ठेवण्यात हातभार लावलेले कार्यकर्ते वा नेत्यांना डावलून फक्त ‘इलेक्टीव्ह मेरिट’ लक्षात घेत तिकिटे वाटप करण्यात येत असतात. आता जसवंतसिंह यांनी भाजपातील ही दुटप्पी भुमिका समोर आणली असली तरी गल्ली ते दिल्लीच्या राजकारणात हा प्रकार सर्रास घडतो हे विसरून चालणार नाही. प्रत्येक राजकीय पक्ष ‘असली आणि नकली’च्या जाळ्यात अडकलाय हेदेखील तितकेच खरे!

About the author

shekhar patil

Leave a Comment