विज्ञान-तंत्रज्ञान

अशी असेल अँड्रॉईड ‘एन’ !

गुगलने जगभरातील डेव्हलपर्ससाठी आपल्या अँड्रॉईड या ऑपरेटींग सिस्टीमची ‘एन’ ही आगामी आवृत्ती खुली केली आहे. यामुळे प्रत्यक्षात ही प्रणाली सादर होण्याआधीच थोडेफार तांत्रिक कौशल्य असणारे याचा वापर करू शकणार आहेत. अर्थात यात नेमके कोणते फिचर्स आहेत? याचा उलगडाही यामुळे झाला आहे.

गुगलने जगभरातील डेव्हलपर्ससाठी आपल्या अँड्रॉईड या ऑपरेटींग सिस्टीमची ‘एन’ ही आगामी आवृत्ती खुली केली आहे. यामुळे प्रत्यक्षात ही प्रणाली सादर होण्याआधीच थोडेफार तांत्रिक कौशल्य असणारे याचा वापर करू शकणार आहेत. अर्थात यात नेमके कोणते फिचर्स आहेत? याचा उलगडाही यामुळे झाला आहे.

खरं तर गुगलने यावेळेस आपल्या अँड्रॉईडच्या ताज्या आवृत्तीला सादर करतांना एका परंपरेला तोडलेदेखील आहे. आधी सर्व प्रणालींच्या आधुनिक आवृत्ती या गुगलच्या ‘आय/ओ’ परिषदेत सादर करण्यात येत होत्या. यावेळी मात्र या परिषदेच्या आधीच याचा ‘प्रिव्ह्यू’ सादर करण्यात आला आहे. यासोबत गुगलने प्रथमच अँड्रॉईडचा ‘बीटा प्रोग्रॅम’ही लॉंच केला आहे. यामुळे ‘एन’ प्रणालीवर चालणारे स्मार्टफोन येण्याआधीच कुणीही आपल्या स्मार्टफोनवर याचा वापर करू शकतील. सध्या गुगलचे नेक्सस या मालिकेतील निवडक स्मार्टफोन्स आणि गुगलचेच ‘पिक्सल्स सी’ या टॅबलेटवर नवीन आवृत्ती वापरणे शक्य आहे. यासाठी संबंधीत उपकरण धारकाला मात्र ‘अँड्रॉईड बीटा’ या उपक्रमांतर्गत लॉगीन करावे लागणार आहे. या प्रणालीत खाली नमुद केल्याप्रमाणे नाविन्यपुर्ण फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

* मल्टी विंडो सपोर्ट- अँड्रॉईड ‘एन’ची खासियत म्हणजे यात युजर एकचदा दोन विंडो वापरू शकणार आहे. म्हणजे कुणीही आपल्या स्मार्टफोनवर एकचदा आजूबाजूला अथवा वर-खाली याप्रकारे दोन वेगवेगळे ऍप वापरू शकेल. याशिवाय या दोन विंडोंचा आकार कमी-जास्त करण्याची सुविधादेखील यात देण्यात आली आहे. तर अँड्रॉईड ‘एन’युक्त टिव्ही सेटमध्ये ‘पिक्चर इन पिक्चर’ हे फिचरदेखील यामुळे वापरता येईल. अर्थात मल्टीटास्कींगसाठी ही प्रणाली अतिशय उत्तम ठरणार आहे.

* अद्ययावत नोटिफिकेशन्स:- अँड्रॉईड ‘एन’ या आवृत्तीमध्ये अद्ययावत नोटिफिकेशन्सची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. अर्थात कोणत्याही मॅसेंजरवर थेट न जाता नोटिफिकेशन्समधूनच उत्तर देता येईल. तसेच ग्रुप मॅसेजेसला एकत्रीत करून याचे वर्गीकरण करणे अथवा आर्काईव्ह/डिलीट करणेदेखील शक्य होणार आहे.

* बॅटरीचा कमी वापर:- गुगलने मार्शमॅलो आवृत्तीमध्ये बॅटरीचा कमी वापर करण्यासाठी ‘डोझ’ हे फिचर दिले होते. यात स्मार्टफोनचा वापर होत नसतांना बॅटरीचा कमी वापर होत असतो. एन’ आवृत्तीमध्ये याला अधिक कार्यक्षम करण्यात आले आहे. यामुळे आता स्मार्टफोनचा वापर होत असतांनाही ‘डोझ’ सक्रीय राहणार आहे. अर्थात मल्टीटास्कींग करूनही बॅटरीचा मर्यादीत वापर होणार आहे.

* अँड्रॉईड टिव्ही:- अँड्रॉईड ‘एन’ या आवृत्तीवर चालणार्‍या टिव्हीमधील कार्यक्रमांचे रेकॉर्डींग करून ते पुन्हा पाहण्याची सुविधा आता युजर्सला मिळणार आहे. अर्थात ही आवृत्ती टिव्ही शौकिनांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे.

सुधारित सेटींग- अँड्रॉईडच्या आगामी आवृत्तीमध्ये सुधारित सेटींगची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. या अंतर्गत आपल्याला स्मार्टफोनच्या विविध फंक्शन्सची सहजगत्या सेटींग करणे शक्य आहे. तसेच यात ‘क्विक सेटींग’ची सुविधादेखील प्रदान करण्यात आलेली आहे.

* अन्य फिचर्स:- अँड्रॉईड ‘एन’मध्ये ‘मल्टी लोकल सपोर्ट’ देण्यात आला आहे. याच्या मदतीने स्मार्टफोनधारक अगदी सुलभपणे दोन भाषांचा वापर करू शकतो. यात ‘अँड्रॉईड फॉर वर्क’ हे फिचर अधिक सुरक्षित करण्यात आले आहे. यात नंबर ब्लॉक’ करण्याच्या प्रणालीचा विस्तार करण्यात आला आहे. यामुळे एखादा क्रमांक ब्लॉक केल्यानंतर त्यावरून स्मार्टफोनधारकाला फक्त फोनच येणार नसून एसएमएसही ‘ब्लॉक’ होणार आहेत. तसेच यात नवीन ‘कॉल स्क्रिनिंग’ हे फिचरदेखील प्रदान करण्यात आले आहे. गुगलने आधीच आपल्या ‘क्रोम’ या ब्राऊजरमध्ये ‘डाटा सेव्हींग’ची सुविधा दिली आहे. याचा आता विस्तार करण्यात आला असून यामुळे युजरचा इंटरनेट डाटा कमी प्रमाणात खर्च होणार आहे. तर यात ‘इमर्जन्सी इन्फो मेन्यू’देखील देण्यात आला आहे. यावर संबंधीत युजरचे नाव, पत्ता, संपर्काचा अन्य क्रमांक आदींची माहिती असेल. अपघातासह अन्य अकस्मात दुर्घटनांमध्ये याचा उपयोग होऊ शकतो.

अँड्रॉईडची ‘एन’ आवृत्ती गुगलच्या आगामी ‘आय/ओ’ परिषदेत सादर होणार असून तेव्हाच याच्या नावाचाही उलगडा होणार आहे. मात्र गुगलने या प्रणालीचा ‘प्रिव्ह्यू’ सादर केल्यामुळे ही प्रणाली अतिशय उत्तमोत्तम फिचर्सनी सज्ज, गतीमान आणि लवचिक असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे.

About the author

shekhar patil

Leave a Comment