चालू घडामोडी विज्ञान-तंत्रज्ञान

अब्जाधिशांमधील तरूणोदय

Written by shekhar patil

‘फोर्ब्स इंडिया’ने जाहीर केलेल्या देशातील धनाढ्य मान्यवरांच्या यादीत दोन नावांच्या समावेशाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. ते आहेत फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन आणि बिन्नी बन्सल.

‘फोर्ब्स इंडिया’ने जाहीर केलेल्या देशातील धनाढ्य मान्यवरांच्या यादीत बहुतांश नावे अपेक्षित असणारीच आहेत. मात्र यातील दोन नावांच्या समावेशाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. ते आहेत फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स पोर्टलचे संस्थापक सचिन आणि बिन्नी बन्सल.

तिशीच्या मध्यावर असणारे दोन्ही बन्सल हे अब्जाधिशांच्या यादीतील सर्वात तरूण आहेत. सचिन आणि बिन्नी हे दोघेही चंदीगडचे आणि एकाच शाळेत शिकलेले असले तरी ते एकमेकांचे नातेवाईक नाहीत. (अनेकदा त्यांचा ‘बंधू’ म्हणून उल्लेख होतो ही बाब अलाहिदा.) २००५च्या सुमारास आयआयटीतून पदवी मिळवल्यानंतर दोघेही अमेझॉनमध्ये नोकरीला सोबत होते. या काळात भारतातील ई-कॉमर्स हे प्राथमिक स्वरूपात होते. मुळातच यातील ‘बी-टू-सी’ या सर्वात यशस्वी मॉडेलमध्ये थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी नसल्याने परकीय कंपन्या या क्षेत्रात जम बसवू शकल्या नव्हत्या आणि कुणा भारतीयाने यातील खरी संधी शोधली नव्हती. याच वातावरणात नोकरीला रामराम ठोकत या जोडगोळीने २००७ साली फ्लिपकार्ट हे ई-पोर्टल सुरू केले. त्यांचे प्रारंभी फक्त पुस्तक विक्रीचे ध्येय होते. सुरवातीला त्यांना खूप अडचणी आल्या. मात्र यातून मार्ग काढत त्यांनी काही महिन्यांमध्येच पुस्तक विक्रीत तर जम बसवलाच पण अन्य वस्तूंच्या विक्रीसही प्रारंभ केला.

भारतात ई-पेमेंट प्रणाली कधीपासून अस्तित्वात असली तरी बहुतांश भारतीय याचा वापर करण्यास शक्यतो टाळतात. नेमकी हीच बाब भारतातील ई-कॉमर्समध्ये मोठा अडथळा असल्याचे मानले जात होते. मात्र भारतीयांच्या या मानसिकतेवर बन्सल जोडगोळीने अफलातून तोडगा शोधला जो त्यांच्यासाठीच नव्हे तर आपल्या देशातील ई-कॉमर्सच्या क्षेत्रातील खर्‍या अर्थाने ‘गेम चेंजर’ ठरला. त्यांनी भारतीय पोस्ट खात्याच्या ‘व्हिपीपी’ अर्थात डिलीव्हरी मिळाल्यानंतर संबंधीत पार्सलचे मुल्य पोस्टमनला देण्याच्या पध्दतीला व्यावसायिक तत्वावर अगदी अचूकरित्या विकसित केले. यातूनच क्रांतीकारक अशी ‘कॅश ऑन डिलीव्हरी’ ही प्रणाली अस्तित्वात आली. यानंतर काय झाले तो इतिहास आपल्यासमोर आहे. आता ही पध्दत इतकी प्रचलित झालीय की अमेझॉन आणि ई-बे सारख्या परकीय कंपन्यांनीही याचा अवलंब केला आहे. भारतीयांना ऑनलाईन खरेदीची खर्‍या अर्थाने सवय लावण्यापासून ती संस्कृती विकसित करण्याचे काम ‘फ्लिपकार्ट’ने केले हे कुणी अमान्य करणार नाही.

आपल्या आजवरच्या वाटचालीत ‘फ्लिपकार्ट’ने अनेक अडथळ्यांवर मात केली. यात अगदी सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी अनेकदा बंगळुरू शहरात अनेकदा स्वत: ‘डिलीव्हरी बॉय’सोबत काम केले. त्यांनी ग्राहकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याला प्राधान्य दिले. याचेच फळ फ्लिपकार्टला मिळून या कंपनीचा अवाढव्य विस्तार झाला. यथावकाश त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपला विस्तार केला. फ्लिपकार्टने ‘मिंत्रा’ या यशस्वी ऑनलाईन फॅशन वस्त्रांच्या पोर्टलला अधिग्रहीत केले. याचप्रमाणे त्यांनी स्वत:ची लॉजिस्टीक प्रणाली व स्टोअर्स तयार केलेत. सद्यस्थितीत ‘फ्लिपकार्ट’ ही सिंगापुर येथे नोंदणी असलेली कंपनी आहे. अनेकदा या कंपनीचा आयपीओ येणार असल्याची चर्चा होते. गेल्या आठवड्यातच या कंपनीच्या ‘डब्ल्यू एस रिटेल’ या उपकंपनीला मुख्य कंपनीता सामावून घेण्यात आले आहे. परिणामी पुढील वा फार तर २०१७ साली फ्लिपकार्ट भांडवल बाजारात पदार्पण करून आपल्या भविष्यकालीन विस्ताराकडे मोठे पाऊल टाकणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. यातच ‘फोर्ब्स’च्या यादीत सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी ८६ वे स्थान पटकावून ‘फ्लिपकार्ट’ची यशोगाथा पुन्हा एकदा स्पष्टपणे अधोरेखित केली आहे.

भारतीय ई-कॉमर्सचे क्षेत्र आता मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. वर नमुद केल्याप्रमाणे सद्यस्थितीत भारतात थेट विदेशी गुंतवणुकीला मर्यादीत परवानगी आहे. मात्र अमेझॉन आणि अलीबाबासारख्या या क्षेत्रातील अवाढव्य कंपन्या ही अट शिथील करण्यासाठी जोरदार लॉबिंग करत आहेत. ही परवानगी मिळल्यास मात्र फ्लिपकार्टला खर्‍या अर्थाने तगडे आव्हान मिळणार आहे. सध्या या कंपनीची स्नॅपडीलशी मोठ्या प्रमाणात स्पर्धा असली तरी फ्लिपकार्ट यात निर्विवादपणे आघाडीवर आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बन्सलद्वयीने जाणीवपुर्वक आपल्या व्यवसायाच्या विस्ताराच्या योजना हाती घेतल्या आहेत. या अनुषंगाने ‘मिंत्रा’ कंपनीची वेबसाईट बंद करून फक्त स्मार्टफोन ऍप्लीकेशनच्या मदतीनेच व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला आहे. फ्लिपकार्टची वेबसाईटही बंद होणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले असले तरी अद्याप हा निर्णय प्रलंबित आहे. अर्थात आपले मोबाईल ऍप्लीकेशन मोठ्या संख्येने डाऊनलोड करण्याठी त्यांनी जाणीवपुर्वक प्रयत्न केलेच. आज या कंपनीचा बहुतांश व्यवसाय हा मोबाईलवरूनच येत असतो. सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी अनेक मिथके उद्ध्वस्त केलीत. एक तर व्यवसायासाठी कोणताही पुर्वानुभव नसतांना त्यांनी तरूण वयातच मोठे यश संपादन केले आहे. याचप्रमाणे कधीकाळी ऑनलाईन खरेदी फक्त महानगरांमधूनच होईल असा समज असतांना त्यांनी देशाच्या कान्याकोपर्‍यात ई-कॉमर्स संस्कृती रूजविली. आज फ्लिपकार्टचा बहुतांश व्यवसाय हा जिल्हा, शहरे आणि गाव पातळीवरून होत आहे. यासाठी लॉजिस्टीकला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत म्हणून फ्लिपकार्टने भारतीय पोस्ट खात्याशी करार केला आहे. पोस्टाचे देशात तब्बल दीड लाख कार्यालये असून या वृहद जाळ्याचा उपयोग करण्याचे चातुर्य बन्सल यांनी दाखविले आहे. म्हणजे एका बाजूने काळाचा वेध घेत मोबाईल शॉपिंगला प्राधान्य देतांना त्यांनी पोस्ट खात्याच्या जाळ्याचा वापर करण्याचे कौशल्यही दाखविले. अर्थात मरणपंथास लागलेल्या पोस्ट खात्याला यातून नवसंजीवनी मिळाली हेदेखील नाकारता येणार आहे. याचसोबत त्यांनी व्यवसायाच्या नवनवीन संधीदेखील शोधल्या. अनेक उत्पादने ही ‘एक्सक्लुझिव्ह’ पध्दतीने ‘फ्लिपकार्ट’वरून लॉंच करण्यात येत असतात. याचप्रमाणे अनेकदा ते आपल्या ग्राहकांना घसघशीत सुटदेखील देतात. याचसोबत ग्राहककेंद्रीत पॉलिसीमुळे ‘फ्लिपकार्ट’ एक विश्‍वासार्ह ब्रँड बनलेला आहे.

आज भारतातील ई-कॉमर्सचे क्षेत्र उड्डाण घेण्याच्या तयारीत आहे. दररोज नवनवीन विक्रेते आणि ग्राहक याकडे वळत आहेत. अगदी समाजातील शेवटच्या घटकालाही ही लहर कवेत घेण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र हा काळ आव्हानांचाही आहे. गुगल, फेसबुक, ट्विटर आणि व्हाटसऍपसारख्या कंपन्या त्यांच्याकडील अजस्त्र माहितीचा स्त्रोत व विशेषत: त्यांच्या ‘युजर्स बेस’चा उपयोग ई-कॉमर्ससाठी कसा करता येईल? यावर सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहेत. विशेषत: फेसबुक तर छोट्या व्यावसायिकांना पेजच्या माध्यमातून ऑनलाईन ओळख प्रदान करण्याच्या प्रयत्नात आहे. लवकरच आपल्याला फेसबुकचे पेज हे एका व्हर्च्युअल शोरूममध्ये परिवर्तीत झालेले दिसणार आहे. याहूनही महत्वाची बाब म्हणजे फेसबुक व ट्विटरच्या न्यूजफिड तसेच गुगल सर्च रिझल्टमधून विविध उत्पादने थेट खरेदी करण्याची सुविधा मिळण्याची सिध्दतादेखील झालेली आहे. अर्थात बन्सलद्वयीने यावर मात करण्यासाठी प्रयत्नदेखील सुरू केले आहे. अलीकडच्या काळात फ्लिपकार्टवर ‘इमेज सर्च’ची सुविधा दिलेली आहे. तसेच ‘पिंग’च्या माध्यमातून ‘इन ऍप’ चॅटींगची सुविधादेखील मिळालेली आहे. म्हणजे यातून फ्लिपकार्टच्या युजर्ससाठी मॅसेंजर विकसित होणार आहे. एका अर्थाने बदलत्या काळाची आव्हाने पेलण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

‘फोर्ब्स’ने जाहीर केलेल्या देशातील पहिल्या १०० अब्जाधिशांच्या यादीत माहिती तंत्रज्ञानाशी संबंधीत अनेक जण आहेत. पहिल्या पाचमध्येच अजीम प्रेमजी यांचा समावेश असून याचसोबत शिव नादर, नारायणमुर्ती, नंदन नीलकेणी यांच्यासारख्या आयटी कंपन्यांच्या संचालकांचाही यात समावेश आहे. मात्र ई-कॉमर्समधील फक्त सचिन आणि बिन्नी बन्सल यांचाच यात समावेश आहे. भारतात ई-कॉमर्समधील प्रचंड संधी पाहता येत्या काळात दोन्ही बन्सलच्या संपत्तीत झपाट्याने वाढ होण्याचे संकेत आहेत. म्हणजे केंद्र सरकारने काही वर्षे ई-कॉमर्सबाबतची निती कायम ठेवल्यास चाळीशी ओलांडत असतांना बन्सलद्वयी अब्जाधिशांच्या यादीत पहिल्या दहामध्ये दाखल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. एका अर्थाने ते अमेझॉनचे जेफ बेझोस व अलीबाबाचे जॅक मा यांच्याप्रमाणे यशाच्या पायर्‍या चढू शकतात. व्यवसायाचा कोणताही वारसा नसतांना, भांडवलाची चणचण असतांना आणि महत्वाची बाब म्हणजे आयटीतली सुखासीन नोकरी असतांनाही त्यांनी एक स्वप्न पाहिले आणि त्याला अनुसरून परिश्रमही घेतले. एका ‘स्टार्टप’ कंपनीला अब्जावधींची उलाढाल करणार्‍या व्यवसायात परिवर्तीत करण्याची देदीप्यमान कामगिरी त्यांनी करून दाखविली आहे. भारताचा आयटी आणि ई-कॉमर्सचाच नव्हे तर कार्पोरेट इतिहास लिहला जाईल त्यात अवघ्या पस्तीशीतील या दोन्ही ‘सेल्फ मेड’ धनाढ्यांना त्यात अवश्य मानाचे स्थान मिळेल. अर्थात अब्जाधिशांच्या यादीतला हा तरूणोदय आयटीतल्या अन्य हुरहुन्नरी आंत्रप्रुनर्सलाही दीपस्तंभासमान येत्या कित्येक वर्षांपर्यंत प्रेरणा देत राहणार आहे.

About the author

shekhar patil

Leave a Comment