विज्ञान-तंत्रज्ञान

अदभूत विश्‍व ‘डिजीटल ड्रग्ज’चे…!

सुमधुर आवाजाची भुरळ न पडणारा विरळच! पावसाची रिपरिप, गर्जणारा सागर, अवखळ वार्‍याचे संगीत, पक्षांचा किलबिलाट, जलप्रपाताचा धीरगंभीर तर निर्झराचा निर्मळ आवाज आदींनी आपण भावविभोर होतो. निसर्गातील या किमयेला मानवाने संगीताच्या साच्यात बसविण्याचे प्रयत्न केले. अभिजात ते पॉप आणि लोकगीते ते संगणकीकृत संगीताचा मूळ हेतू हा मानवी मनाला स्पर्श करणे हाच असतो. मेंदूवरील संगिताच्या परिणामाविषयी मानवाला प्राचीन काळापासून ज्ञान आहे. विविध धार्मिक विधींमध्ये संगीत हा अविभाज्य घटक असतो. काही पंथांनी तर संगितातील दिव्यतेवरच मुख्य भर दिला. आधुनिक काळातील विविध प्रकारच्या मनोचिकित्सेतही याला महत्वाचे स्थान आहे. आता तर ध्वनीचा औषध व एवढेच नव्हे तर अंमली पदार्थ म्हणून विपुल प्रमाणात उपयोग करण्यात येत असल्याने दिसून येत आहे. याला ‘डिजिटल ड्रग्ज’ असे नाव देण्यात आलेले आहे. गेल्या आठवड्यात विज्ञान-तंत्रज्ञानावर लिखाण करणार्‍या जगविख्यात स्तंभलेखिका किम कोमेंदो यांनी या क्षेत्रातील अत्यंत भयावह पैलू जगासमोर आणला आहे. यामुळे ‘डिजिटल ड्रग्ज’ विषयी कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मानवाच्या प्रत्येक अनुभुतीशी मेंदुतील एक लहर संबंधीत असते. झोपेत असतांना मेंदू विशिष्ट फ्रिक्वन्सीवर असतो. जागृतावस्थेत वेगळी, दारू पिल्यावर भिन्न तर गहन ध्यानातही मेंदू विशिष्ट लहरींवर स्थिर झालेला असतो. यामुळे बाह्य रितीने मेंदूतल्या लहरी ‘फिक्स’ करून आपणास हवी तशी अनुभुती शक्य असल्याचे शास्त्रज्ञांच्या कधीच लक्षात आले होते. या अनुषंगाने संगीत हे परिणामकारक ठरू शकते;

छायाचित्र आंतरजालावरून साभार.

या संकल्पनेनुसार करण्यात आलेल्या संशोधनातून ‘डिजीटल ड्रग्ज’ ही संकल्पना उदयास आली. ‘डिजिटल ड्रग्ज’ समजून घेण्याआधी त्यामागील तत्वाचे आकलन होणे आवश्यक आहे. १८३९ साली जर्मन शास्त्रज्ञ हेन्रीक विल्यम डोव्ह यांनी ‘बायनॅऊरेल इफेक्ट’ शोधून काढला. मानवाच्या दोन कानांमध्ये दोन विविध वारंवारितेचे (फ्रिक्वेन्सी) ध्वनी ऐकवले असता त्यांच्यातील फरकाचा तिसरा ‘बीट’ तयार होतो. याचा मेंदूवर थेट परिणाम होत असल्याचे प्रतिपादन डोव्ह यांनी केले होते. त्या काळातील तुटपुंज्या सुविधेमुळे ते यावर सखोल संशोधन करु शकले नाही. विज्ञान जगतासाठीही हा विषय काहीसा गुढच राहिला. १९७३ साली गेरॉल्ड ओस्टर या शास्त्रज्ञाने ‘सायंटिफिक अमेरिकन’ या नियतकालिकातील आपल्या प्रबंधात या विषयाचा अत्यंत सखोल आणि व्यापक आयाम मांडताच प्रचंड खळबळ उडाली. यात त्यांनी ‘बायनॅऊरेल बीटस्’वर अतिशय सखोल असे विवेचन केले होते. त्यांनी स्टीरिओ हेडफोनच्या मदतीने दोन कानांमध्ये वेगवेगळ्या फ्रिक्वेनसीचे ध्वनी ऐकवले असता ‘बायनॅऊरेल बीटस्’ तयार होत असल्याचे दाखवून दिले. यानंतर मेंदूमध्ये ‘फ्रिक्वेन्सी फॉलोइंग रिस्पॉन्स’ या तत्वानसार प्रक्रिया घडून येत असते. या ‘बीट’नुसार मेंदूची फ्रिक्वेन्सी बदलत असल्याचेही त्यांना दिसून आले. याचा अर्थ असा की, बाह्य उपचाराने मेंदूच्या कार्यप्रणालीवर परिणाम करणे शक्य असल्याचे यातून दिसून आले. ही बाब अत्यंत महत्वाची होती. ओस्टर यांनी कंपवात (पार्किन्सन) झालेल्या एका रुग्णाला हे ध्वनी ऐकवले असता एक आठवड्यापर्यंत त्या रुग्णाला याचे आकलन झाले नाही. यानंतर मात्र त्यांच्या मेंदूने याला स्विकारले. याशिवाय त्या रुग्णावर याचे अनुकुल परिणाम झाल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले.
मानवाला होणारे ध्वनीचे आकलन आणि मेंदूची कार्यप्रणाली समल्यावर ‘बायनॅऊरेल बीटस्’ची परिणामकारकता समजू शकते. मानवाला २० हर्टझ् ते २० हजार हर्टझ् इतकी फ्रिक्वेन्सी असणारा कोणताही ध्वनी ऐकू येतो. याच्या विपरीत मेंदूची दिवसभरातील विविध अवस्थांमध्ये ० ते ३० हर्टझ् इतकी वारंवारीता असते. याचाच अर्थ असा की मेंदूच्या कामकाजावर प्रभाव टाकण्यासाठी याच ‘फ्रिक्वेन्सी रेंज’चा ‘बीट’ हवा. आपल्या विविध ‘मूडस्’शी संबंधीत फ्रिक्वेन्सीची माहिती या लेखातील कोष्टकात देण्यात आलेली आहे. समजा आपल्याला अत्यंत प्रगाढ निद्रेचा ‘इफेक्ट’ हवा आहे. यासाठी संगीताचा एक ट्रॅक १०० हर्टझ्चा असल्यास दुसरा १०४चा घ्यावा लागेल. यातून चार हर्टझ्चा ‘डेल्टा बीट’ तयार होईल. मेंदूमध्ये ही संख्या निद्रेशी संबंधित असल्याने हे संगीत ऐकणार्‍या व्यक्तीला प्रगाढ निद्रेचा अनुभव येईल. हाच प्रयोग विविध फ्रिक्वेन्सीवर करता येणे शक्य असल्याचे प्रतिपादन ओस्टर यांनी आपल्या प्रबंधात केले होते.

या अभिनव संशोधनामुळे शास्त्रीय जगतात बर्‍याच अंशी खळबळ उडाली होती. काळानुरुप या क्षेत्रात अत्यंत सखोल अध्ययन करण्यात आले. याचा मानसोपचार तज्ञांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला. आज अनेक मानसिक रोगांनी मानवाला ग्रासले आहे. या सर्व मनोविकारांवर यशस्वीपणे मात करण्यासाठी ‘बायनॅऊरेल बीटस्’ उपयुक्त असल्याचे दिसून आले. १९७०च्या दशकाच्या शेवटी ‘वॉकमन’ वापरात येताच या क्षेत्रात अभुतपूर्व क्रांती घडून आली. यापूर्वी अशा स्वरुपाच्या थेरपीसाठी चिकित्सकाकडे जावे लागतहोते. ‘वॉकमन’ हेडफोनच्या मदतीने अगदी वैयक्तीक पातळीवरही अशा स्वरुपाच्या संगीताचा आस्वाद घेणे सहजशक्य झाले. इंटरनेटच्या आगमनानंतर तर हा प्रकार अजूनच फोफावला. याचे ‘डिजिटल ड्रग्ज’ म्हणून नामकरण करण्यात आले.

आज इंटरनेटवर ‘डिजिटल ड्रग्ज’शी संबंधित विपुल सामग्री उपलब्ध आहे. यात नवीन संशोधन, लेख, विचारांची देवाण-घेवाण करणारे समूह, डाऊनलोड करता येणारे संगीत आदींचा समावेश आहे. मेंदूच्या विविध ‘मूडस्’साठी संगीताचे खास प्रकार (याला I-doze अथवा I-dose असे म्हटले जाते) आता विकसित करण्यात आलेले आहेत. या डोसेसची परिणामकारकता कुणीही अनुभवू शकते. काही कंपन्यांनी या संगीताच्या सीडीज व्यावसायीक पातळीवर उपलब्ध केलेल्या आहेत. बर्‍याच साईटस्वर तर हे संगीत एमपीथ्रीच्या स्वरुपात मोफत उपलब्ध आहे. काही विकारांवर मात करण्यासाठी ‘डिजिटल ड्रग्ज’ हे मानवाला अत्यंत उपयुक्त ठरु शकते. आज मानवाचे बहुतांशी विकार हे सायकोसोमॅटिक अर्थात शरीर आणि मन या दोघांशी संबंधित असल्यावर शास्त्रज्ञांचे मतैक्य आहे. याचाच अर्थ असा की, प्रत्येक रोगाचा मानवी मनावर पर्यायाने मेंदूवर परिणाम होतच असतो. यावर मात करण्यासाठी आवश्यक त्या ‘बायनॅऊरेल बीटस्’ने युक्त ‘डिजिटल ड्रग्ज’ अत्यंत उपयुक्त ठरु शकतात. आधुनिक युगातील तणावाने मानवाची झोप हिरावून घेतली आहे. आज जगभर सुखदायक निद्रेसाठी दरवर्षी अब्जावधी डॉलर्स मूल्याच्या औषधांचा वापर करण्यात येत आहे. हा उपाय मात्र वरवरचा असून या ‘ट्रॅक्विलायझर्स’ प्रकारच्या गोळ्यांचे व्यसन जडण्याचा धोका असतो. अत्यंत गाढ निद्रेसाठी डेल्टा (०.५ ते ४ हर्टस्) या प्रकारचा ‘बीट’ असणारे संगीत उपयुक्त ठरु शकते. फक्त एक तासभर अशा स्वरुपाचे संगीत ऐकल्याने चार तासाची स्वप्नरहित गाढ निद्रा घेतल्याचा अनुभव बर्‍याच जणांना येतो. परिणामी ‘नॉन मेडिसिनल ट्रॅक्विलायझर्स’ म्हणून ‘डिजिटल ड्रग्ज’ उपयुक्त ठरु शकतात. याच्याशी संबंधीत पीझीझ (pzizz) हे उपकरण बर्‍यापैकी लोकप्रिय झाले आहे. अनिद्रा, नैराश्य, तणाव, आत्मविश्‍वासाचा अभाव, भग्न व्यक्तीमत्व आदींवर याच्या मदतीने उपचार शक्य असल्याचेही दिसून आले आहे. याशिवाय ग्रहणशक्ती, आकलनक्षमता व सृजनशक्ती वाढवण्यासाठीही याचा वापर करण्यात येत आहे. काही शास्त्रज्ञांनी तर अतिंद्रिय शक्तींचा विकास करणारे संगीत तयार केल्याचा दावा केला आहे. ‘डिजिटल ड्रग्ज’चे आध्यात्मिक उपयोग कोष्टकात दिलेले आहेत. या सर्व बाबी मानवाला उपकारक असल्या तरी किम कोमेंदो यांनी मात्र याची काळी बाजूही जगासमोर आणली असून आता सर्वांसाठी तोच चिंतेचा विषय बनला आहे.

आता काही कंपन्या आणि इंटरनेटवरील समूह हे ‘बायनॅऊरेल बीटस्’च्या मदतीने चक्क अंमली पदार्थाची झिंग आणणार्‍या संगीताची निर्मिती करत असल्याचे दिसून आले आहे. याचाच अर्थ असा की, विशिष्ट प्रकारचे संगीत ऐकल्यावर अल्कोहोल, मरिजुआना, हेराईन वा अफूची ‘किक’ बसू शकते. इंटरनेटवरील काही संकेतस्थळांवर या प्रकारचे संगीत अगदी मोफत उपलब्ध आहे. काही ठिकाणी तर अगदी लैगिक संबंधाची अनुभूती देणारे संगीत उपलब्ध आहे. या संदर्भात जगभर जागृती झालेली नसल्याने कायद्यात याविषयी काहीही तरतूद करण्यात आलेली नाही. अंमली पदार्थ बाळगणे अथवा याचा वापर करणे हा जगातील सर्व देशांमध्ये गुन्हा असला तरी असाच परिणाम देणार्‍या संगीताविषयी कायदे करण्यात आलेले नाहीत. परिणामी आगामी कालखंडात संगीतावर आधारित व्यसनांची संख्या वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे अल्पवयीन अथवा पौगंडावस्थेतील मुलांना याचा विळखा बसण्याची जास्त भिती आहे.
‘डिजिटल ड्रग्ज’च्या निमित्ताने तंत्रज्ञानाचा वापर हा सुजाणतेनेच करायला हवा हे प्रकर्षाने अधोरेखीत झाले आहे. कोणताही नवा शोध वा तंत्रज्ञान हे निरपेक्ष असते. याचा योग्य वापर करणे मात्र मानवाच्याच हातात असते. ‘डिजिटल ड्रग्ज’च्या माध्यमातून मानवजातीला शारिरीक आणि मानसिक विकारांसाठी एक अत्यंत उपयुक्त उपचारप्रणाली मिळण्याची शक्यता आहे. मात्र ही बाब मेंदूशी संबंधित असल्याने याचा प्रयोग जपूनच करायला हवा.

मेंदूतील विविध तरंग
विविध फ्रिक्वेन्सीचा मेंदूवर होणार्‍या परिणामाला विशिष्ट नावे देण्यात आलेली आहेत. यात विविध फ्रिक्वेन्सीमुळे मेंदूवर खाली नमूद केल्याप्रमाणे परिणाम होतो.
स्थिती             फ्रिक्वेन्सी                    परिणाम
डेल्टा             ०.५-४ हर्टज्                 प्रगाढ निद्रा
थेटा               ४-८ हर्टज्                  निद्रापूर्व अवस्था
अल्फा         ८-१३ हर्टज्               शिथिल पण जागृतावस्था
बीटा          १३-३० हर्टज्                       जागृतावस्था
गॅमा           ३० पेक्षा जास्त               अत्यंतिक जागृतावस्था

आध्यात्मिक आयाम

ध्यानाची क्षमता आणि मानवी चेतना वाढवण्यासाठी ‘डिजिटल ड्रग्ज’ अत्यंत उपकारक आहेत. यासाठी मेंदूला योग्य त्या ‘सूचना’ देण्याची सुविधा याद्वारे उपलब्ध झाली आहे. ध्यानावस्थेत प्रगती करण्यासाठी ‘बायनॅऊरेल बीटस्’युक्त संगीताच्या विपुल सीडीज तयार करण्यात आलेल्या आहेत. या संगीताच्या मदतीने टेलीपॅथी, शरिराबाहेरचा प्रवास, दुसर्‍यांच्या मनातील विचार ओळखणे, विविध चक्रांना उर्जा प्रदान करत त्यांना जागृत करणे. पूर्वजन्मातील स्मृती जागवणे, संमोहन आदी बाबीदेखील शक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन’ अर्थात सृजनशील कल्पनाचित्रे रंगविणे अथवा आपल्याला हवे तसे स्वप्न पाहणेही (ल्युसिड ड्रीम) यामुळे शक्य झाले आहे. या संदर्भात जगभर अत्यंत सखोल पातळीवर संशोधन करण्यात येत आहे. याकडे आध्यत्मिक क्षेत्राचेही लक्ष लागल्याचे दिसून येत आहे.

(प्रसिद्धी दिनांक १७ ऑगस्ट 2009)

About the author

shekhar patil

Leave a Comment