Featured चालू घडामोडी

अटळ शोकांतिका

Written by shekhar patil

अनेक निवडणुकांमध्ये अमुक-तमूक नेता वा पक्ष हरल्यानंतर त्यांचे समर्थक त्यांच्या विरोधकांना तुमच्या विजयापेक्षा आमच्या पराजयाची चर्चा अधिक असल्याचे सांगत स्वत:ची समजूत काढत असतात. काही प्रसंगी हा दुर्दम्य आशावाद असतो तर काही वेळेस ‘गिरे भी तो टांग उपर’ असे दाखविण्याची केविलवाणी धडपड! मात्र काहींचा पराभव हा आपल्याला अस्वस्थ करत असतो. मणिपूरची ‘आयर्न लेडी’ म्हणून ख्यात असणार्‍या आणि आपल्या लोकांसाठी तब्बल सोळा वर्षापर्यंत उपोषण करणार्‍या इरोम शर्मीला यांना अवघी ९० मते मिळाल्यानंतर व्यक्त होणारी हळहळ ही याच प्रकारातील आहे. मात्र तिच्या पराभवाचे अनेक कंगोरे तपासून पाहिले असता वास्तवाची जाणीव न ठेवल्याने व विशेष करून पाळेमुळे मजबूत नसल्यामुळे त्यांच्यावर ही अवस्था ओढवली असल्याचे दिसून येत आहे.

खरं तर कोणतीही निवडणूक जिंकणे ही बाब सोपी नाही. यासाठी कला आणि विज्ञान यांचा अफलातून आणि कुणालाही न उलगडलेला संगम आवश्यक असतो. यात येनकेन प्रकारे लोकांना आपलेसे करण्याची ‘कला’ तर यासाठीच्या हुकमी ‘ठोकताळ्यां’चे विज्ञान आहे. मात्र या सर्वांना धुडकावून लावणार्‍या काही घटना आपले समाजमन अक्षरश: अनाकलनीय असल्याची प्रचिती दर्शवतात. यामुळे अवघ्या जगाला ‘यू कॅन विन’चा गुरूमंत्र देणारे शिव खेरा हे निवडणुकीत आपली अनामत रक्कमही वाचवू शकत नसल्याची धक्कादायक बाब समोर येते. अनेक दुय्यम दर्जाचे चित्रपट वा दूरचित्रवाणी कलावंत पटकन निवडून येत असल्याचा आपण पाहिले आहे. मात्र दुसरीकडे देव आनंद यांच्यासारख्या सुपरस्टारच्या राजकीय पक्षाची हास्यास्पद स्थिती होत असल्याची बाबही आपण अनुभवली आहे. खरं तर अशी अनेक उदाहरणे आहेत. आपल्या कारकिर्दीत कर्तव्यदक्षतेमुळे ख्यात असणारे सनदी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध चळवळींमध्ये आपले आयुष्य अर्पण करणारे लोक, राजकारणाला प्रामाणिकतेचा आयाम देण्याचा भाबडा आशावाद बाळगणारी मंडळी आदींचा निवडणुकीच्या रणांगणात सातत्याने पराभव होत असल्याचे आपल्याला दिसून येते. अलीकडच्या काळात चळवळीतून राजकारणात यशस्वीपणे ‘एंट्री’ केलेल्यांमध्ये केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांचा समावेश होतो. भ्रष्टाचारविरोधी चळवळीला एका राजकीय पक्षात परिवर्तीत करण्याचे काम बर्‍यापैकी कुशलतेने त्यांनी केलेय. अर्थात त्यांचा मार्गदेखील वाटतो तितका सोपा नाहीच. तर दुसरीकडे अनेक चळवळी जोमात आल्यानंतर काहींना पदे मिळत असली तरी मातब्बर पक्ष त्यांना काही काळातच पध्दतशीरपणे गुंडाळत असल्याची उदाहरणेही आपल्यासमोर आहे. महाराष्ट्रात ‘स्वाभीमानी शेतकरी संघटने’च्या चळवळीतून राजू शेट्टी यांच्यासारखा नेता आणि त्यांचा पक्ष उदयास आला असला तरी भाजपने अगदी मुरब्बीपणे त्यांच्यात फुटीचे बिजारोपण केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. वास्तविक पाहता देशातील अनेक राजकीय पक्ष हे चळवळीतूनच जन्माला आली आहेत. यात स्वातंत्रयुध्दातील आंदोलनात सहभागी असणार्‍या काँग्रेसची राजकीय वाटचाल आपल्यासमोर आहेच. स्वातंत्रोत्तर कालखंडात विशेषत: भाषावर प्रांतरचनेवरून सुरू झालेल्या संघर्षात अनेक राज्यांमध्ये उदयास आलेल्या चळवळींनी अस्मितेवर आधारित राजकीय पक्षांना जन्म दिला. उदाहरण द्यावयाचे तर तामिळनाडूतील दोन्ही प्रमुख पक्ष हे द्रविड चळवळीतून उदयास आले आहेत. नक्षलबारीतल्या उद्रेकाने पश्‍चिम बंगालमधील डाव्यांच्या प्रदीर्घ राजवटीसाठी अनुकुलतेचे काम केले. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाचा इंदिराजींची राजवट उलथून लावण्यासाठी विरोधी पक्षांना लाभ झाला. राजीवजींच्या सरकारविरोधात नारा बुलंद करणार्‍या व्हि.पी. सिंग यांनी लोहिया आणि जयप्रकाश यांचा वारसा सांगणार्‍या समाजवादी विचारधारेला राजकीय स्वरूप प्रदान केलेे. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कालखंडात मंडल विरूध्द कमंडल या विचारधारांवर आधारित चळवळी उभ्या राहिल्या. यातील ‘मंडल’ हे समाजवादी विचारधारेच्या विविध शाखांना तर ‘कमंडल’ हे अर्थातच भाजपला लाभदायक ठरले. आजही या दोन्ही चळवळींचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. आंध्रातील तेलगू तर महाराष्ट्रातील मराठी अस्मितांच्या चळवळींनी ‘टिडीपी’, शिवसेना, मनसे आदी पक्ष उदयास आले. तर अलीकडेच तेलंगणाच्या अस्मितेला चंद्रशेखर राव यांनी पध्दतशीरपणे एका राजकीय पक्षात परिवर्तीत केले. कांशिराम यांनी विविध चळवळींमधूनच ‘बहुजन समाज पक्षा’चा राजकीय मार्ग शोधला. तर दुसरीकडे दलीत पँथर आणि नामांतराच्या चळवळीने महाराष्ट्रातील दलीत समाजातून अनेक नेते उदयास आले. वर्तमानाचा विचार करता मराठा, पटेल, जाट, गुर्जर आदी समाजांच्या आंदोलनांमध्ये राजकीय विचारधारांचे बिजारोपण होण्याची शक्यता दिसून येत आहे. उर्वरित राज्यांमध्येही विविध आंदोलनांमधून राजकीय पक्ष उदयास आल्याची अनेक उदाहरणे आहेत. यामुळे चळवळ ही राजकीय वाटचालीसाठी पूरक ठरत असल्याचे स्पष्ट आहे. मात्र आता ही बाब वाटते तितकी सोपी नाही.

खर तर राजकीयदृष्ट्या देश एका संक्रमणावस्थेतून जात आहे. एका बाजूला भाजपची देशव्यापी अस्तित्वाच्या दिशेने घोडदौड सुरू असून दुसरीकडे कधी काळी देशव्यापी असणार्‍या काँग्रेसला लागलेली ओहोटी लागल्याचे दिसून येत आहे. भाजपने सत्ता सांभाळतांनाच प्रखर विरोधकांना कोणतेही स्थान उरणार नसल्याची योग्य ती काळजी घेतली आहे. यामुळे भाजप सत्तेत असतांनाही आक्रमक भूमिका घेऊ शकतो. महाराष्ट्रात सत्तेवर असूनही या पक्षाच्या आमदारांनी कर्जमाफीसाठी केलेली घोषणाबाजी ही याच प्रकारातील आहे. भाजपने अतिशय चतुराईने सत्ताधारी आणि कोणत्याही क्षणाला आंदोलनासाठी तयार असणारे विरोधक या दोन्ही भूमिका काबीज केल्या आहेत. याचप्रमाणे अरविंद केजरीवालही सातत्याने हाच पवित्रा घेत आहेत. या पार्श्‍वभूमिवर इरोम शर्मिला यांनी प्रदीर्घ काळापर्यंत आपल्या लोकांच्या मागणीसाठी लढा दिला. त्याला जगभर प्रसिध्दीदेखील मिळाली. मात्र या लढ्याला एका मोठ्या जन आंदोलनात परिवर्तीत करण्यात त्या अयशस्वी ठरल्या. यामुळे याचा राजकीय लाभ त्यांना मिळणार नसल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. या निकालामुळे यावर शिक्कामोर्तब केले इतकेच !

इरोम शर्मीला यांनी भारतीय सैन्याला सर्वाधीकार प्रदान करणार्‍या ‘अफ्प्सा’ हा कायदा रद्द करण्यासाठी तब्बल सोळा वर्षापर्यंत उपोषण केल्याचे जगाचे त्यांच्याकडे लक्ष आकृष्ट झाले होते. मध्यंतरी माकपा व तृणमूल काँग्रेस तर अलीकडे भाजप आणि काँग्रेस पक्षाने त्यांना राजकारणात येण्यासाठी ऑफर दिली होती. मात्र त्यांनी कोणत्याही पक्षासोबत न जाता स्वतंत्र वाट चोखाळण्याचा केलेला प्रयत्न सपशेल फसला. मुळातच मणिपूरमधील फुटीरतावादी गटांना धार्मिक, जातीय, भाषिक व वांशिक संघर्षाची किनारदेखील आहे. काहींना स्वतंत्र राष्ट्र हवे तर काहींना स्वतंत्र राज्य. तर शर्मीला यांच्यासारख्यांची मागणी ‘अफ्प्सा’ रद्द करण्याची आहे. परिणामी अवघ्या जगभरात तिचा लढा कौतुकाचा विषय बनला तरी सुरवातीचा अपवाद वगळता मणिपूरमध्ये तिला एकमुखी पाठींबा मिळाला नाही. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात उपोषण सोडतांना तिचे हे नैराश्य ठसठशीतपणे अधोरेखित झाले होते. उपोषण आटोपल्यानंतर तिने विवाह करून संसार करण्याचा निर्णयदेखील जाहीर केला होता. मात्र तिचा आयर्लंडमध्ये वास्तव्यास असणारा प्रियकर डेसमंड हादेखील तिच्या या पराजयाला कारणीभूत ठरल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी नमूद केले आहे. डेसमंड हा ‘आपला’ नसल्याची चर्चा मणिपूरातील कान्याकोपर्‍यात झाली. याचा तिला फटका बसला. यातून तिने थेट मुख्यमंत्री इबोबी सिंग यांना आव्हान दिले. मात्र यासाठी आवश्यक असणारे ‘कॅडर’, प्रचार यंत्रणा आणि अर्थातच पैशांसह अन्य सुविधा नसल्याने तिचा दारूण पराभव झाला. कधी काळी मेरी कोम हिच्याप्रमाणेच मणिपुरी जनतेने आपली शूर कन्या म्हणून तिला डोक्यावर घेतले असले तरी तिला राजकीय वास्तवाने जोरदार धक्का दिला आहे.

इरोमचा पराभव हा चळवळीचा अथवा चळवळीत झोकून देणारांचा पराभव नक्कीच नाही. मात्र चळवळीला वास्तवाचे भान नसल्यास आणि विशेष करून राजकीयदृष्ट्या आवश्यक असणारी पूर्वतयारी न केल्यास काय दुर्गती होते ? याचे उदाहरण यातून आपल्याला दिसून आले आहे. चळवळी आधीही होत्या, भविष्यातही राहतील. यातून नवनवीन नेतृत्वही उदयास येईल. मात्र चळवळ आणि राजकारण हे दोन स्वतंत्र मार्ग असल्याची भेदक जाणीव इरोम शर्मिला हिच्या दारूण पराभवाने करून दिली आहे. शेवटी इरोमच्या अस्वस्थ करणार्‍या पराभवामुळे मला अवचितपणे शायर मुनव्वर राणा यांचा कलाम आठवला.

शरीफ़ इंसान आखिर क्यों इलेक्शन हार जाता है
किताबों में तो लिक्खा है की रावन हार जाता है

जुड़ी हैं इससे तहज़ीबें सभी तस्लीम करते हैं
नुमाइश में मगर मिट्टी का बरतन हार जाता है

मुझे मालूम है तूमनें बहुत बरसातें देखी है
मगर मेरी इन्हीं आँखों से सावन हार जाता है

अभी मौजूद है इस गाँव की मिट्टी में खुद्दारी
अभी बेवा की गैरत से महाजन हार जाता है

अगर एक कीमती बाज़ार की सूरत है दुनिया
तो फिर क्यों काँच की चूड़ी से कंगन हार जाता है

जनाब मुनव्वर राणा यांनी शेवटी प्रचंड आशावाद व्यक्त केला असला तरी यातील पहिले दोन शेर हे भयाण वास्तवाला दर्शविणारे आहेत. शेवटी जग हे ‘काय दिसते’ यावरच भुलत असते. इरोम शर्मिलाच्या पराभवाच्या निमित्ताने हे वास्तव सर्वांनी स्वीकारावे हेच उत्तम.

About the author

shekhar patil

Leave a Comment