त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी महाभारताच्या कालखंडातही इंटरनेट व उपग्रह असल्याचे केलेले वक्तव्य हे अपेक्षित आणि त्यांच्या विचारधारेशी सुसंगत असेच आहे. तात्पुरती खिल्ली उडवण्याच्या पलीकडे यामुळे यावर फारसा काथ्याकुट करण्याइतका हा विषय महत्वाचा नाही. मात्र एकीकडे गतकालाचे गुणगान करावयाचे आणि दुसरीकडे ‘अच्छे दिन’ अजून येणार असल्याचे स्वप्न दाखवायचा दुटप्पीपणा या मंडळीला किती बेमालूमपणे साधता येतो याचे नवल वाटण्याशिवाय राहत नाही.
मानवी जीवनातील जवळपास प्रत्येक आयामावर अत्यंत मार्मिक भाष्य करणार्या ओशोंनी ‘प्रीस्ट अँड द पॉलिटिशीयन्स- द माफिया ऑफ द सोल’ या ग्रंथातून राजकारणी आणि पुरोहितांवर कडाडून आसूड ओढले आहेत. या दोन्ही घटकांनी मानवाचे जितके शोषण केले, तितकी हानी कुणीही केली नसल्याचे त्यांनी यातून समर्पक उदाहरणांचे दाखले देत, आणि अर्थातच प्रखर तर्कशक्तीने मांडले आहे. त्यांच्या मते धर्माचार्य हे गतकालाचे गुणगान करत मानवाला भिती दाखवतात. तर राजकारणी हे उज्ज्वल भविष्याचे स्वप्न दाखवत लोकांचा मूर्ख बनवतात. अर्थात श्रध्दाळूंसाठी स्वर्ग हा भूतकाळात तर उर्वरित जनतेसाठी भविष्यकाळात असल्यामुळेच ही सर्व गफलत होत असते. यामुळे पृथ्वीतलावरील काही लोक भूतकाळात तर काही भविष्यकाळात जगतात. फार थोड्यांनाच वर्तमानाचे भान असते. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यात अंतर असल्यास भिन्न कालखंडांच्या विचारधारांमध्ये संघर्ष होत नाही. यामुळे सर्वसामान्यांना त्रासदेखील होत नाही. तथापि, धर्म आणि राजकारणाची सरमिसळ ही विचीत्र घटनांना जन्म देत असते. सध्याच्या कालखंडातही हीच अडचण आल्याचे दिसून येत आहे.
मुळातच, बिप्लब देब यांच्याआधी त्यांच्याच पक्षाच्या अनेक नेत्यांनी गतकालाचे गुणगान केले आहे. अलीकडचे काही संदर्भ तपासून पाहिले असता खुद्द पंतप्रधान मोदींनी प्राचीन भारतात प्लॅस्टीक सर्जरी अस्तित्वात असल्याचे छातीठोकपणे सांगितले आहे. यासाठी त्यांनी गणपतीचे उदाहरण दिले. खरं तर गणपतीच्या जन्मासाठी ते प्लॅस्टीक सर्जरी नव्हे तर ‘ट्रान्सप्लान्ट’चे समर्पक उदाहरण सुचवू शकले असते. मात्र आता त्यांना सांगणार कोण? एवढेच नव्हे तर कर्णाचा जन्म हा जनुकशास्त्रातील (जेनेटिक्स) अत्युच्च प्रणालीतून झाल्याचा निर्वाळादेखील त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे दावे मुंबईत आयोजित डॉक्टरांच्या एका कार्यक्रमात केले होते. आता खुद्द पंतप्रधानच अशी वक्तव्ये करत असतांना अन्य मंत्री मागे कसे राहतील? यानंतर काही महिन्यांपूर्वीच केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंग यांनी डार्वीनचा सिध्दांत खोटा असल्यामुळे तो शाळा व महाविद्यालयांमध्ये शिकवू नये असे वक्तव्य केले होते. तर त्यांचेच एक सहकारी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी वेदांमध्ये सर्व काही ज्ञान असून यात आईनस्टाईनच्या विश्वविख्यात सापेक्षदावादापेक्षाही अत्युच्च दर्जाच्या थेअरीज मांडल्याचा दावा केला. याला स्टीफन हॉकींग यांनीही दुजोरा दिल्याचे त्यांनी ठोकून दिले. पत्रकारांनी याचे संदर्भ मागितल्यानंतर ‘तुम्हीच हे सर्व शोधून घ्या’ असे सांगण्यास हे महोदय विसरले नाहीत. इंफाळ शहरात झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्येच हर्षवर्धन यांनी पाजळलेले ज्ञान वादाच्या भोवर्यात सापडले होते. याच्याही आधी भाजपच्याच अनेक नेत्यांनी असेच अचाट दावे केले होते. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तर हिसेनबर्ग या विख्यात भौतिकशास्त्रज्ञाचा ‘प्रिन्सीपल ऑफ अनसर्टेनिटी’ हा सिध्दांत वेदांवर आधारित असल्याचा दावा केला होता. यासाठी त्यांनी फ्रिजॉप काप्रा यांच्या ज्या ‘ताओ ऑफ फिजीक्स’ या पुस्तकाचा दाखल दिला होता, त्यातही असला दावा नव्हता हे विशेष. केंद्रात मोदी सरकार सत्तारूढ झाल्यापासून ज्योतीषशास्त्रालाही खर्या अर्थाने ‘अच्छे दिन’ आले आहेत. वादग्रस्त केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पाच वर्षात देशाच्या राष्ट्रपती असतील असे भाकीत त्यांच्या एका खासमखास ज्योतीष्याने जाहीरपणे केल्याची बाबही आपल्या स्मरणात असेलच. राजस्थान सरकारमध्ये मंत्री असणार्या वासुदेव देवनानी यांनी तर ‘गाय हा एकमात्र असा पशू आहे की, जो आत ऑक्सीजन घेतो आणि बाहेरदेखील ऑक्सीजनच सोडतो’ असे सांगून तमाम शास्त्रज्ञांची झोप आधीच उडवून टाकली आहे. तर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी भारतात लक्षावधी वर्षे आधीच अणुचाचणी झाल्याचे सांगून या सर्वांवर कडी केली होती. भाजप नेत्याच्या या दाव्यांना संघाशी संबंधीत काही मान्यवरांनी अलीकडच्या काळात जोड दिली आहे. मध्यंतरी गायीच्या शेणात मोबाईलच्या घातक उत्सर्जनाला आळा घालण्याची क्षमता असल्याचा दावा अखील भारतीय गोसेवा समितीच्या शंकर लाल यांनी केला होता. तर संघाच्या इंद्रेशकुमार यांनी गायीच्या शेणाने तयार करण्यात आलेले बंकर हे कोणत्याही बाँबपासून सुरक्षित असल्याचा दावादेखील केला होता. आता या सर्व मान्यवरांची मते पाहता, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी तर थोडे कमीच ‘फेकले’ असल्याचे दिसून येत आहे.
मिथके आणि वास्तव यांच्यातील फरक हा अगदी प्राथमिक पातळीवरील बुध्दीमत्ता आणि तर्कशक्ती असणार्यांना सहजपणे समजू शकतो. अचाट कल्पनारम्य अशी मिथके पृथ्वीच्या कान्याकोपर्यात आढळून येतात. तर जगातील प्रत्येक धर्म, संप्रदाय अथवा मतप्रवाहांमध्येही हाच प्रकार आढळून येतो. यातून काय घ्यावे आणि काय सोडून द्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तथापि, फक्त आणि फक्त भूतकाळच चांगला होता असे म्हणणारी मंडळी फक्त हिंदूमध्येच नाहीय. तर ख्रिस्तपूर्व वा इस्लामपूर्व सारेच काही अंधकारमय होते असे मानणारेदेखील बिप्लब देब आणि त्यांच्या कंपूप्रमाणेच कल्पनेच्या जगात विहार करत आहेत. या मंडळीप्रमाणेच अनेक ख्रिस्ती, इस्लामी, बौध्द, ज्यू विद्वानदेखील गतकाळात आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाचे संदर्भ शोधतात. किंबहुना तेव्हाचा काळ हा आतापेक्षा प्रगत असल्याचा दावा करतात तेव्हा हसू आल्यावाचून राहत नाही. भूतकाळातच सारेच काही त्याज्य आहे असेही नाही. प्राचीन धर्मविचार, नितीशास्त्र, तत्वज्ञान, ज्योतीषशास्त्र, स्थापत्यशास्त्र, काव्य-शास्त्र-नृत्य-संगीतादी कला आदींसह अनेक क्षेत्रांमध्ये आपले पूर्वज अतिशय प्रगत होते. यामुळे आजदेखील आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. यात वावगे नाहीच. भारतीय संस्कृतीत तर अगदी परम अस्तिकतेपासून ते कट्टर नास्तिकतेपर्यंत आणि द्वैतापासून ते अद्वैतापर्यंतचे अनेक परस्परविरोधी विचार जन्मलेच नाहीत तर मान्यताप्राप्तही झाले. अनेक परस्परविरोधी विचार, समूह आणि घटकांना सामावून घेणार्या संस्कृतीच्या तेजोमय वारश्याचा आपणास नक्कीच अभिमान आहे. मात्र आजच्या अत्यंत प्रगत अवस्थेतील विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्राचीन काळाशी बादरायण संबंध जोडण्याचे प्रयत्न हे विनोदाच्या पलीकडे जाणार नाहीत. याऐवजी आपल्या नेत्यांना धुमसत्या वर्तमानावर लक्ष केंद्रीत करणे अधिक उपयुक्त नव्हे का? कारण त्यांनी स्वप्न दाखविलेले ‘अच्छे दिन’ अद्याप आले नाहीत. यावर भाष्य न करता गतकालाचे गुणगान कशासाठी ?
मानवी जीवनाला भौतिकरित्या सुखी करणारी सर्व साधने ही गत दोन-तीन शतकांपासून सुरू असणार्या अविरत वैज्ञानिक अध्ययनातून अस्तित्वात आलेली आहेत. यातून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अनेक शाखा तयार झाल्या असून त्या सातत्याने उत्क्रांत होत आहेत. ही सर्व प्रक्रिया पुराव्यांसह जगासमोर आहे. याचे व्यवस्थित डॉक्युमेंटेशन आहे. मात्र सबळ पुराव्यांचा आधार नसणार्या बाबींना उच्च दाखविण्याची केविलवाणी धडपड आणि यासाठी विज्ञानाच्या कसोटीचा घेतलेला आधार घेणे गैर आहे. प्राचीन भारताची महत्ता ही वेगळ्या निकषावर तर आजच्या युगाची ही वेगळ्या निकषावर श्रेष्ठ आहे. भारतीय संस्कृतीच्या उज्ज्वल वारशामुळे आपला अंतर्भाग समृध्द झालाय तर विज्ञान-तंत्रज्ञानामुळे आपले भौतिक जीवन सुखी झाले आहे. यात गल्लत करण्याचा प्रकार हा भंपकपणात गणला जाणार आहे. याऐवजी दोन्हींचा वापर करून अंतर्बाह्य समृध्द जीवन जगणे केव्हाही उत्तम!